श्री सदगुरू स्तवन 
श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य सदगुरू भगवान श्री श्रीधर स्वामी महाराज रचित
(Many thanks to Mrs Sonali Upendra Dasare of Pune for sharing the doc file of this stotra)
।। श्री सदगुरू स्तवन ।।

स्वदातृत्व गुणें थोर थोर । जे देती ते निव्वळ असार ।
मिथ्या सुखसाधनाचा विस्तार । केवळ तेणें ।।१।।

नित्यसुखाचे भांडार । दे जो संपूर्ण साचार ।
नासूनि अनर्थ संसार । तो श्रेष्ठ सद्गुरु ।।२।।

जे कल्पनेहुनि पर । जे इंद्रियासी अगोचर ।
मी ब्रह्म ही स्मृतिहि असार । जेणें होये ।।३।।

ते निजरुप आपुलें । सच्चित्सुखघन बहु भले ।
दुजेविण स्वमात्र संचले । नित्य निर्विकल्प ।।४।।

ऐशिया स्वरूपाची ठेव । लाभे ज्या योगे स्वयमेव ।
तो सर्वश्रेष्ठ सद्गुरुराव । अनुपम्य सर्वदा ।।५।।

जरी सच्छिष्या कोणी पुसे । तुज षड्गुणैश्वर्य देता कैंसे ।
ईश्वरपदहि ज्या सदोष दिसे । तोचि सच्छिष्य ।।६।।

जेथे जीव ना तो ईश । दृश्य भासाचा लवलेश ।
माया अविद्याहि निःशेष । जया ठायीं ।।७।।

जेथे स्त्री-पुरुष कोण भाव । कैसा काममोहादिका वाव ।
जेथे अहं-ब्रह्म-स्फुर्तीचाहि भाव । निःशेष मावळे ।।८।।

अहं-ब्रह्म ऐसे जे स्फुरण । हेचि बहिर्मुखतेचे कारण ।
येथोनीच पुढें सकळ जाण । विस्मरवि स्वरुप ।।९।।

जे का दृष्टीस दिसे । जे का अंतरी भासे ।
विपरीतचि ते दावीतसे । निजरूपाहुनी ।।१०।।

सर्वा पूर्वील जे निर्मळ । निज निर्विकल्परूप केवळ ।
तेथे अहंब्रह्म स्फूर्ति ही निव्वळ । भ्रमरुप दावी ।।११।।

हीन रजरेताचे जें शरीर । याचा कोण विचार थोर ।
श्रवणादिके जें वाटे सार । तेंहि अन्यथारूप ।।१२।।

जेथें जाणपण सरे । सार दृश्यभास ओसरे ।
द्रष्टा ज्ञाता हि न उरे । तेचि निजरूप स्वभावें ।।१३।।

विरक्ति आणि ज्ञान । ज्ञानाचेंहि ते विज्ञान ।
यया विचारें समाधान । अखण्ड बाणे ।।१४।।

स्वरूपाची न होता भेटी । व्यर्थ साधनाची अटाअटी ।
निज अज्ञानें हिंपुटी । आपण होये ।।१५।।

जें का दृश्य दृष्टीस दिसे । जो कां भास मनास भासे ।
निमतां सर्वहि पूर्वीच असे । तेचि स्वरूप ।।१६।।

।। इति श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य सदगुरू भगवान श्रीधरस्वामी विरचित श्री सद्गुरु स्तवन संपूर्ण ।।