४५ वर्षांची ‘श्रीधर संदेश’ मासिके
(Scans of 45 years of ‘Shridhar Sandesh’ periodicals)
श्री सुधीर केशवराव मुळे, नाशिक यांनी ४५ वर्षांचे सर्व दुर्मिळ अंक उपलब्द करून दिल्याबद्दल तसेच 'श्री सदगुरूचरणरज' यांनी त्या सर्व अंकांचे स्कॅन्निंग करून या वेबसाईट ला उपलब्द करून दिल्याबद्दल ShridharSahitya.com या उभयतांचे ऋणी आहे.
प्रस्तावना
श्रीधर संदेश अंतरंग
दिव्य अनुभव – दिव्य चरित्र – दिव्य प्रसंग – दिव्य आठवणी व दिव्य वांड्मय
॥ श्री राम समर्थ श्रीधर ॥
अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज सच्चिदानंद सदगुरू श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य भगवान श्री श्रीधर स्वामी महाराज यांचा जयजयकार असो!!!
महान सत्पुरुषांचा जय जय कार हे मंगलाचरण असते. आम्हा सर्व गुरु बंधू-भगिनी, शिष्य, चाहते, प्रेमी, यांचे श्री भगवान श्रीधर स्वामी महाराजांचे चरणी कोटी कोटी प्रणाम!!
श्रीमत् भगवान श्रीधरस्वामी यांचे नाव मागील पिढीला चांगले माहित आहेच. मात्र नवीन पिढीला त्यांच्या दिव्य चरित्राची कार्याची ओळख व्हावी ह्या उद्देशाने नवीन तंत्रज्ञानाच्या द्वारे मराठी व हिंदी भाषिक यांच्या समोर महाराजांचे साहित्य आणण्याचा हा त्यांच्याच प्रेरणेने एक छोटासा प्रयत्न आहे.
श्रीगुरू दत्तात्रेयांचा अवतार व श्री समर्थ रामदासांचे अग्रगण्य शिष्य, भगवान श्रीधर स्वामी तपोनिष्ठ व धर्म परायण होते. त्यांच्या तपो वाणीतुन अमोघ दैवी शब्दात निघालेल्या प्रवचनांद्वारा लाखो लोकांना पावन केले. त्यांचा प्रत्येक शब्द ऐकणाऱ्याच्या हृदयात ठाव घेत असे, अंतःकरणाला प्रफुल्लित करीत असे व अंतरात विलक्षण आनंदाची अनुभूती देत असे. प्रगाढ पांडित्य, अगाध शास्त्र व्यासंग, प्रखर वैराग्य, दया-क्षमा-शांती इत्यादी संत लक्षणे, औदार्य, शुद्ध परमार्थी माणसाने बोध घ्यावा असे त्यांचे आदर्शभूत जिवन, सोप्या भाषेत परमार्थ पटवून देण्याची हातोटी, सिद्धावस्थेनंतरही निरंतर तपस्यारत राहिलेले, वैदिक धर्माची सुप्रतिष्ठा पुन्हा व्हावी याची विलक्षण तळमळ, कठोर आचार संपन्नता… इतक्या गोष्टी सहसा एकत्र पाहावयाला मिळत नाहीत. परंतु परम पूजनीय श्री स्वामी महाराजांच्या दैनंदिन जीवनात हे सर्व पैलू प्रकट दिसत असत. ज्यांचा प्रत्येक हालचालीत, प्रत्येक शब्दात, प्रत्येक दृष्टिक्षेपात शुद्ध परमार्थी माणसाने काही बोध घ्यावा अशा थोर योग्यतेचे श्रीस्वामीजी हे देवदुर्लभ सत्पुरुष होते. श्रीस्वामीजींची मातृभाषा मराठी होती तरीही संस्कृत, कानडी, हिंदी, इंग्रजी या चार भाषांतील प्रभुत्व अपूर्व होते.
भगवान श्रीधर दत्तावतारीच – श्री क्षेत्र गाणगापूर (लाड चिंचोळी) येथे श्री दत्त जयंतीच्या दिवशी, श्री दत्त जन्माच्या वेळीच
भगवान श्रीधरांचा जन्म झाला.
भगवानांच्या मातापित्यांची गाणगापूरला कठोर सेवा, तपश्चर्या व त्याचे फळ म्हणून श्रीदत्तात्रेयांनी
धर्मकार्यासाठी श्रीधर रुपाने जन्म घेतला.
अत्यंत बालवयात मोठ्या बंधूंच्या निधनानंतर शोक-संतप्त आईस आत्मानात्मविवेक सांगणे व आईचे
सांत्वन करणे हे साधारण मुलाचे काम नव्हे.
पुण्याच्या भावे स्कूल चे उद्घाटन श्री नारायण महाराज केडगावकरांनी श्रीधरांच्या हस्ते करविले,
त्यावेळी त्यांनी “आम्ही साक्षात्कारी मात्र श्रीधर अवतारी आहेत” असे उद्गार काढले.
श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत मध्ये श्रीपादांचे सख्ख्ये धाकटे भाऊ म्हणून भगवान श्रीधरांचा उल्लेख आहे.
अत्यंत लहान वयात ६ कठोर प्रतिज्ञा करून त्यांचे जीवनभर पालन करणे हे असामान्यत्वच.
लहानपणापासूनच अंगी दया, क्षमा, शांती, सत्य, सनातन धर्माचा जाज्वल्य अभिमान, परोपकारी वृत्ती
इत्यादी संत लक्षणे दिसून येणे हे विलक्षणच.
नाम चिंतामणी व श्रीगुरुचरित्राचे संशोधक कै. कामत यांचा ‘श्रीधर स्वामी हे दत्तावतारीच’ हा लेख अवश्य
वाचा.
शिगेहळ्ळी चे श्री गुरु शिवानंदांना भगवान श्रीधारांमध्ये विष्णुकलेचे दर्शन झाले.
असाच अनुभव चिन्मय मिशनचे श्री चिन्मयानंदांना आला.
विष्णुकला म्हणजे भगवंताचे स्वरूपच, म्हणूनच श्रीसमर्थांनी श्रीधारांना ‘भगवान’ ही पदवी दिली.
श्री गुरु शिवानंदांना श्री दत्तात्रेयांचा आदेश झाला – “श्रीधर नावाचे महायोगी दत्तांशेकरून विदेही
स्थितित असून अन्न पाण्यावाचून वंचित आहेत, ते तुमच्या आश्रमासमोरून जातील तेव्हा त्यांना बोलावून
आणून त्यांची योग्य ती व्यवस्था करा” (हि आठवण अवश्य वाचा).
योगिराज गुळवणी महाराजांनी भगवानांना त्यांच्या भेटीत विचारले आपण कोण आहात?? भगवान
श्रीधरांचे उत्तर – “मी ब्रह्म आहे!!” (श्रीधर चरित्र उन्मेष मध्ये हि आठवण वाचा)
महान सिद्धपुरूष श्री सत्य साईबाबा श्रीधरांच्या भेटीस वरदपुरला आले होते त्यांची आठवण कै.
गोविंदराव दीक्षितांनी सांगितलेली व कै. डॉ. भावे यांनी काव्यबद्ध केलेली आठवण अवश्य पाहा.
श्रीक्षेत्र गाणगापूरला श्रीनृसिंह सरस्वतींच्या अवताराला साडेतीनशे वर्षे झाली त्यावेळी अनेक दिवस भव्य
समारोह झाले, त्यात गाणगापूर क्षेत्री सात दिवस भगवान श्रीधरांनी ‘श्री गुरुदेव दत्त’ या मंत्रावर प्रवचने
केली. एका प्रसंगी “या स्थानाचा मालक मी आहे, दत्त दत्त म्हणतात तो मीच” असे उद्गार काढले. ह्याच
काळात भगवानांनी मंदिरात सकाळपासून संध्याकाळपर्यंत उभे राहून श्रीगुरुचरित्राचे एक दिवसाचे
पारायण केले. भगवानांचा प्रत्येक क्षण दिव्य तेने भरलेला असे.
वाराणशीला श्रीविश्वेश्वराच्या दर्शनास मंदिरात आले असता साक्षात श्रीविश्वेश्वर प्रगट होवून म्हणतात
“आपण व मी एकच असताना प्रत्यक्ष देहाने दर्शनास येण्याची तसदी का घेतली”?
अखंड नामस्मरण व अतीव दास्य भावाने केलेली श्री सज्जनगडावरील श्रीसमर्थांची भक्ती हीच श्रीधरांची
साधना. अत्यंत अल्प काळातच कठोर साधनेचे फळ म्हणून श्री समर्थांचा सगुण साक्षात्कार झाला.
‘तत्वमसि’ चा (महावाक्याचा) उपदेश झाला. त्याचवेळी श्रीसमर्थ आपल्या लाडक्या शिष्योत्तमाला म्हणाले
“तू भगवान आहेस, दक्षिणेकडे कार्यास जा”.
नंतरच्या साठच्या दशकामध्ये एका सेवेकर्याने भगवानांना “साधन काळात आपली भावस्थिती कशी
असे?” असा प्रश्न विचारला. भगवान श्रीधरांचे उत्तर – “अखंड अनुसंधान” अर्थात आत्मस्वरूपाचे
अनुसंधान होय, अशी भावस्थिती जन्मसिद्धांचीच असू शकते.
कन्याकुमारीला विवेकानंद रॉक वर तीन दिवस तीन रात्री निर्विकल्प समाधी स्थितीत बसले त्यानंतर
तेथील परधर्मीयांचा प्रभाव आपल्या तपोबलाने काढून टाकला, याच ठिकाणी नंतर विवेकानंद स्मारक
बनले.
चिनी आक्रमणावेळी भगवान श्रीधर बॉर्डर वर जाऊन आपल्या तपोबलाने बद्रीनारायण वरील येणारे
संकट दूर केले. दुसऱ्या दिवशी चीनने retreat केले. चीनची सेना मागे का फिरली ह्याचे
अमेरिकेलाही आश्चर्य वाटले. याचे व्यावहारिक कारण अद्याप कोणालाच सापडलेले नाही. खरोखरच
अदृश्य शक्तींना लॉजिक नसते हेच खरे.
होण्णावरच्या जंगलात एकांतात असताना तप झाल्यावर श्री ललितांबा प्रकट होऊन तिने भगवान
श्रीधरांच्या हातून आपल्या मंदिराची स्थापना केली. (पहा आठवण श्रीधर संदेश)
आठवणींच्या खजिन्यामध्ये भगवान श्रीधरांचे आजी-माजी भक्त शिष्य मंडळी यांच्या उल्लेखनीय
आठवणी अवश्य वाचा.
श्रीधर संदेश बाहेरील एक आठवण, श्री अजित कुलकर्णी ह्यांच्या श्रीधर चरित्रात आली आहे. कोड्चाद्री
च्या जंगलात तप पूर्ण झाल्यावर आद्य शंकराचार्यांनी योगिनी सह मिळून श्रीधरांचा सन्मान करून त्यांना
ब्रह्मासणावर बसविले व श्रीधरांच्या धर्म कार्यास सहाय्य करण्याचे सांगितले.
भगवानांची मराठी प्रवचने अत्यंत सोपी, बोधपूर्ण व प्रासादिक असून वाचकाच्या अंतःकरणाचा ठाव
घेणारी आहेत.
भगवानांची चरित्र त्यांनी स्वतः आत्माराम ब्रह्मचारी ह्या सेवेकऱ्यास निवेदन केले, ते श्रीधर संदेशामध्ये
आहे.
देवी-देवता व ऋषीमुनींनी भगवान श्रीधरांची जी स्तुती केली तोच महामंत्र ‘नमः शांताय’ हा होय.
देवी-देवतांच्या सांगण्यावरून (आमचे स्तोत्र करा) भगवानांनी अनेकानेक मराठी व संस्कृत स्तोत्र केली
आहेत व ती सर्व श्रीधर संदेश मध्ये आहेत.
“तीनवेळा ओंकार म्हणून श्रद्धेने मला हाक मारा मी धाऊन येइन” असे एका प्रसंगी भगवान म्हणाले.
“श्री स्वात्मनिरुपण व श्रीदत्तस्तवराज ह्यांचे ठरवून पारायण केल्यास माझे दर्शन होईल” असे भगवानांनी
सांगितले आहे. श्रीधर संदेश मध्ये मुळातूनच हे वाचावे.
जगतोद्धाराचे कार्य करण्याची तीव्र इच्छा होती त्यासाठी दीर्घ एकांत व तप चालले होते परंतु धर्मकार्यास
अनुकूल काळ नाही म्हणून श्रीरामाच्या व श्री समर्थांच्या आज्ञेवरून देहत्याग करून समाधी घेतली.
अनेकानेक मराठी प्रवचने, अनेकानेक (अर्थासह) संस्कृत स्तोत्रे, संस्कृत महाकाव्ये, पत्रे, आठवणींचा
खजिना, साधकांना मार्गदर्शन असे अनेक दिव्य विषयक श्रीधर संदेश मध्ये असून हे सर्व अंक पूर्णपणे
पहा अशी साग्रह विनंती आहे.
सर्वही भाषातून मिळून श्रीस्वामीजींचे सुमारे चाळीस लहान मोठे ग्रंथ आहेत. संस्कृत भाषेतून श्रीस्वामींचे काव्य साहित्य साधारण वीस हजार ओव्यांचे आहे. हजारोच्या संख्येने प्रवचने आहेत. शेकडो पत्रे आहेत. विशेषतः मराठी, संस्कृत व हिंदी साहित्य ‘श्रीधर संदेश’ यातून प्रसिद्ध झाले आहे. ते सर्व साहित्य पुनः सर्व मराठी भाविकांसमोर यावे या साठी हा प्रपंच.
१९६४ साली श्रीस्वामींच्या आज्ञेने ‘श्रीधर संदेश’ या मासिकाची सुरुवात नाशिक चे कै. डॉ. के. वी. मुळे यांनी केली. सुरुवाती पासूनच अनेकानेक अडचणी सोसून, आर्थिक पाठबळ नसतांनाही, गुरुभक्तांचे पाहिजे तसे पाठबळ नसतांनाही केवळ सदगुरूसेवा या निष्ठेने ‘श्रीधर संदेश’ प्रकाशनाचे कार्य डॉक्टर साहेबांनी शेवटच्या श्वासापर्यंत समर्थपणे चालू ठेवले. त्यांच्या निधनानंतर त्यांचे सुविद्य चिरंजीव गुरुबंधू श्री सुधीर केशव मुळे यांनी ‘श्रीधर संदेश’ चे प्रकाशनाचे कार्य संपादक या नात्याने यशस्वीरीतीने चालू ठेवले आहे.
भगवान श्रीधर स्वामींच्या दीर्घ सहवासात राहिलेले आजी-माजी महाराष्ट्रीयन रामदासी गुरुबंधूंनी श्रीस्वामींची वेळोवेळी झालेली प्रवचने, निरुपणे, स्तोत्रे, आठवणी इत्यादी साहित्य लिहून घेतले, जतन केले व कै. डॉक्टरसाहेबांना श्रीधर संदेश मध्ये छापण्यास दिले. आजमितीस श्रीस्वामींचे बरेचसे साहित्य श्रीधर संदेश मध्ये उपलब्ध आहे. श्रीस्वामींचे साहित्य जतन करणाऱ्या ह्या सर्व महान गुरु भक्तांचे व ते प्रकाशित करणाऱ्या कै. डॉक्टरसाहेबांचे आपणा सर्वांवर अनंतानंत उपकार आहेत.
या सर्व साहित्यामुळे श्री स्वामी महाराजांच्या वृद्ध भक्तांना पुनःप्रत्ययाचा आनंद होईल तसेच नवीन पिढीला श्री स्वामी महाराजांची ओळख पटून अध्यात्माची जिज्ञासा प्राप्त होईल व उपासना करण्याची प्रेरणा मिळेल अशी सदभावना आपण सर्वजण व्यक्त करूया.
॥ श्री भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय ॥
॥ श्रीसमर्थ रामदासस्वामी महाराज की जय ॥
॥ श्री रामचंद्र भगवान की जय ॥
॥ श्री महारुद्र हनुमान की जय ॥
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
(शब्दांकन – ‘श्रीसदगुरूचरणरज’)
