साधकाच्या हृदयीचे आर्त 
श्रींचे शिष्य ‘श्रीसदगुरूचरणरज’ लिखित

हे सदगुरू नाथा, महाराजा!!
दीनबंधू गुरूराजा!!
आनंद स्वरूपा, ज्ञानस्वरूपा, मोक्ष राजा!!
हे माऊली!!

आपल्या शिवाय मला ह्या जगात दुसरे कोण आहे? त्रिविध तापाने जर्जर झालेल्या या पामरावर आपली स्नेहार्द्र दृष्टी असू द्या. आपल्या दिव्य चरणांचा सतत सहवास द्या. मला आपलेसे म्हणा. मी अज्ञानी आहे, घोर अपराधी आहे. सत्य-असत्याचे ज्ञान होऊनही वृत्ती आवरत नाही. वासनांचा जोर शमत नाही. मी-मी, माझे-माझे म्हणत जन्म गेला. अहंकार छाये सारखा उभा आहे. मी काय करू ह्या सगळ्यांचा उपशम करण्यास मी केवळ असमर्थ आहे. कळते पण वळत नाही. आपण शरणागत वत्सल आहात. मी पामर शरणागत आहे. केवळ आपल्याशिवाय मला कोठे थारा आहे?? आपण करूणा निधान आहात, करुणेने माझ्याकडे पाहा. हे माऊली, रडुन रडुन डोळे थिजले तरी आपल्याला करुणा का येत नाही?? आपण भक्त कैवारी, दयासिंधू आहात तर मग ही उपेक्षा का? आता धीर धरवत नाही. मनाचा मवाळू, स्नेहाळू, कृपाळू, जनी दासपाळू हे ब्रीद सार्थ करा. त्या निरतिशय सोलीव सुखाचा अनुभव करून द्या. त्या अखंड आनंद स्वरूपाचे चिंतन करवून घ्या. ह्या सर्वांस मी असमर्थ आहे. त्या अनंत गुण समुद्राने विनटलेल्या आत्म स्वरूपाकडे आपणच मला सन्मुख केले ना? मग आता त्या स्वरूपाशी एकरूप होण्यास केवळ आपली कृपाच हवी आहे. आपण स्वतःच परम मंगलधाम आहात. या मंगलधामात मला ओढून घ्या. त्या नित्य, शांत, नित्यतृप्त, नित्यसिद्ध, नित्यानंद स्वरूपाशी एकरूप करून टाका. आपण सर्वांतर्यामी आहात. तर मग माझ्या हृदयातच सदगुरुशिवाय काय बरे असणार? हृदयस्थ कमळाचे आसन सदगुरुशिवाय रितेच आहे. आपले स्वरूप खरेतर निर्गुण निराकार असूनही केवळ माझ्यासारख्या पामरांच्या उद्धारापोटी आपण सगुण ब्रम्ह म्हणून प्रकट झालात. आपणच माझे शुद्ध स्वरूप आहात तर मग आपल्या ह्या आनंद स्वरूपाशी एकरूपता घडवून द्या. “आपल्यासारखे करिती तात्काळ। नाही काळवेळ तयालागि।” प्रारब्ध प्रतिबंधाचा आड आल्याने जर याला बाधा येत असेल तर ती जाण्यासाठी हृदयीचे आर्त आणिक तीव्र होण्यास आपणच कृपा करा. अनंत काळचा हा आत्मस्वरूपाचा विरह सहन होत नाही.

विरहाच्या अश्रूंच्या जागी मिलनाचे आनंदाश्रू यावेत हीच एकमेव इच्छा आहे.

या माझ्या निरंतर हाकेला आता तरी साथ द्या व माझे समाधान करा.