श्री सद्गुरू स्तवन

जयजय श्री गुरु माउली । तुझ्या कृपेची जीवा सावली ।

तुजवीण न कोणी वाली । भव तप्ता या ।।१।।

तू नारी नरासि अभेद । सर्वात्मरूप आनन्दकन्द ।

तुज भजता विषय छन्द । नासोनि जाये ।। २ ।।

जयजयाजी श्री सदगुरु । भवाब्दीचे तु सुदॄढ तारु ।

मज या पाववी पैलपारु । अनाथनाथा ।। ३ ।।

अज्ञान निशीच्या अंती । निजात्मरूपेची तुझी प्राप्ति ।

तू चित्सुखसूर्य दिनराती । प्रकाशसी स्वप्रभे ।। ४ ।।

‘मी, माझे’ हे दयाळा । नुरवोनिप्रतिपाळी बाळा ।

उपेक्षा करू नेणसी कृपाळा । शरणागतासि ।। ५ ।।

माझे शरीर इंद्रियें प्राण । सकळ वासनेसह हें मन ।

ससर्व बुद्धि ही जाण । अर्पियली तुज ।।६।।

तू शुद्ध बुद्ध सच्चिदानंद । निष्कलंक निर्लेप अभेद ।

स्वरुप बोधे नाशिसी खेद । शरणागतचा ।। ७ ।।

मज दिना अभय द्यावे । माया निर्मुक्त मज करावे ।

भवभय घालुनी न्यावे । मज निजधामा ।। ८ ।।

बाधा कसलीहि मज नसावी । सकळ आपदा नष्ट व्हावी ।

निर्विघ्नपणेचि गा मज मिळवि । ब्रह्मपदी तुझ्या ।। ९ ।।

तू निराकार ब्रह्म निर्गुण । होसी बा साकार आणि सगुण ।

सदगुरुरुपे आले कळून । आम्हा सोडविण्या ।। १० ।।

जय जयाजी दिन दयाळा । घालवी संसार सुखाचा हा चाळा ।

मिळवि निजरूपी निर्मळा । शीघ्रचि आता ।।११।।\

माया अविद्येहुनि पर । जीवेश कल्पना विदुर ।

सृष्टिस्थितिलयादि वेव्हार । तुजमाजी नसे ।।१२ ।।

गुरुराया तू आमुचे स्वरुप । अरूप सुखसमुद्र अमुप ।

अद्वय तव चिद्रूपी ऐक्यरूप । आम्ही सर्वदा ।। १३ ।।

सदाचारे श्री गुरुभक्ति युक्त । नित्यपाठ करीता होई मुक्त ।

तेरा ओव्या या श्रीधरोक्त । भवदुःख विनाशिती ।। १४ ।।

जयजय रघुवीर समर्थ!!!

श्रीसीतारामचंद्रार्पणमास्तु

जय जय रघुविर समर्थ!!

श्री सद्गुरू समर्थ रामदास स्वामी महाराज कि जय!!

श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी महाराज कि जय!!!