श्री स्वामी सहजानंद अवधूत
rsz_shri_sahajananda_avadhuta_swamiji_1

 

श्री स्वामी सहजानंद अवधूत यांचे पूर्वाश्रमीचे नाव श्री नारायण हेगडे होते. त्यांचा जन्म कर्नाटक राज्यातील उत्तर कनडा या जिल्ह्यातील सिरसी तालुक्यातील जागणहळ्ळी येथे झाला. श्रीमत् प.प. सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी महाराजांच्या संन्यासी शिष्यांपैकी हे एक प्रमुख शिष्य होते. त्यांच्या आईचे नाव सौ. भागीरथी व वडिलांचे नाव श्री केशव हेगडे असे होते. ते आठ भावंडापैकी दुसरे होते. त्यांचे आई वडील अत्यंत धार्मिक वृत्तीचे होते व ते नित्य पुजा-अर्चा, पोथी-पुराण श्रवण व यक्षगान यात रस घेत असत. त्यामुळे सर्व भावंडे ही सुसंस्कारीत होती. ती सर्व मिळून त्यांच्या वडिलांसोबत शेतात काम करीत असे. त्यांचे कुटुंब संपूर्ण गावात एक आदर्श असे कुटुंब होते. ते जरी वडील व भावांसोबत शेतात राबत तरी त्यांचे मन सदैव अध्यात्म विचारात रमत असे. त्यांच्या वडिलांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी त्यांचे लग्न आल्माणे या गावातील ‘लक्ष्मी’ नावाच्या मुलीशी लावून दिले. त्यांच्या सासूबाईंचे नाव ‘सरस्वती’ असे असून त्यांनी नव विवाहित जोडप्यासाठी तट्टीकाय या गावात शेती करण्यास जमीन खरेदी करून दिली व पुढे श्री नारायण हेगडे तेथे कुटुंबासोबत राहू लागले. त्यांनी त्यांच्या वडिलांकडून सर्व धार्मिक व अध्यात्मिक संस्कार ग्रहण केले होते. त्यानुसार त्यांनी त्यांच्या नवीन घरात पूजाअर्चा, पोथीपुराण श्रवण, अतिथी सत्कार आदी सुरु केले. पुढे त्यांनी अध्यात्मिक व भौतिक जीवनात प्रगती सुरु झाली. १९३० साली त्यांना पहिले अपत्य झाले. त्याचे नाव त्यांनी ‘रामचंद्र’ असे ठेवले. बालपणात हि रामचंद्र त्याच्या वडिलांचे पुराण श्रवण करीत असे. पुढे त्यांना द्वितीय अपत्य झाले. त्याचे नाव ‘कमलाकर’ असे ठेवले. पुढे १९३५ साली कांजिण्या रोगाच्या साथीने त्यांचे वडील श्री केशव हेगडे यांचे निधन झाले. वडिलांची सेवा करतांना त्यांना हि या रोगाची लागण झाली. पुढे ते घरी परतल्यावर त्यांचा रोग त्यांची दोन मुले व पत्नी यांना हि झाला व त्यात धाकट्या मुलाचे व पत्नी चे निधन झाले. दोन दिवस त्यांच्या पत्नी चे शव तसेच पडून होते. रोग लागण होण्याच्या भीतीने कोणीहि अंतिम संस्कार करण्यास जवळ येत नव्हते. पुढे त्यांच्या आई सौ. भागीरथी आल्या व त्यांनी त्यांच्या पत्नीचे अंतिम संस्कार करण्यास मदत केली. त्यांची व त्यांच्या थोरल्या मुलाची काळजी घेतली. कांजिण्या रोगातून जरी श्री नारायण हेगडे पूर्णपणे बरे झाले तरी त्यांचा उजवा डोळा मात्र कायमचा निकामी झाला.\n\nपुढे श्री नारायण हेगडे यांनी पुनः पुराण वाचनादी सत्संग सुरु केला. लोक दूरदुरून पुराण श्रवण करण्यास येत असत व त्यांना ‘गुरुनाथ’ या नावाने ओळखु लागले. त्यांचा पुत्र रामचंद्र हा हि अध्यात्मात खूप रस घेत असे. लोक त्याला ‘रामनाथ’ म्हणून ओळखीत असत. पुढे ते १९४४ साली शिगेहळ्ळी ला गेले तेव्हा त्यांना श्रीमत प.प. सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी महाराजांचे दर्शन झाले. कांही दिवस श्री स्वामीजींची सेवा केल्यावर त्यांना तीव्र वैराग्य प्राप्त झाले. हे पाहून श्री स्वामीजींनी त्यांना मंत्रानुग्रह देऊन महावाक्याचा उपदेश केला व त्यांना नेलेमावू येथील देवीमणी मंदिरात तप करण्यास पाठविले. या मठाचे प्रमुख श्री पुरुषोत्तम नरसिंह भारती स्वामीजी हे देखील श्री स्वामीजींचेच शिष्य होते. श्री नारायण हेगडे यांनी अल्पावधीतच वेदांत अभ्यास व आत्मानुसंधान साधनेत खूप प्रगती केली. एके दिवशी त्यांनी त्यांचे यज्ञोपवीत तोडले व नदीत एक डूपकी मारून दिगंबर अवस्थेतच ते श्री क्षेत्र गोकर्णला गेले. तेथे काही वर्षे राहून परत येऊन श्री स्वामीजींचे दर्शन घेतले. त्यांची अध्यात्मातील अतिउच्च अवस्था पाहून श्री स्वामीजींनी स्वतः ची छाटी काढून त्यांच्यावर पांघरली व त्यांचे नामकरण ‘श्री स्वामी सहजानंद अवधूत’ असे केले. हि एका प्रकारे अनौपचारिक सन्यास दीक्षाच होती. पुढे त्यांनी नेलेमावू मठाचे श्री पुरुषोत्तम नरसिंह भारती स्वामीजींच्या कडून औपचारिक संन्यास दीक्षा घेतली. पुढे ते तीर्थयात्रे ला रवाना झाले व रामतीर्थ – होन्नावर, मंगळूर व काशी आदी ठिकाणी तप केले. काशी क्षेत्री ते स्मशानभूमीत राहून तप करीत. गोकर्णा प्रमाणे काशीतही त्यांना लोक ‘मौनी बाबा’ या नावाने ओळखीत. पुढे ते नेपाळ ला पायी गेले. हा प्रवास अत्यंत खडतर होता, डोंगर दऱ्यातून व घनदाट जंगलातून असा हा रस्ता होता. नेपाळ ला त्यांनी श्री पशुपतीनाथाचे दर्शन घेतले व तेथे अनेक संतांचा सत्संग झाला. नंतर ते तेथून हृषीकेश व अयोध्येला गेले व शेवटी सिरसी ला परत आले व तटगुणी नावाच्या ग्रामात ते श्री स्वामीजींचे पुनः दर्शन झाले. त्यांचे क्षीण झालेले शरीर पाहून श्री स्वामीजींनी त्यांना पुनः थोडे दिवस तीर्थयात्रा न करण्याची आज्ञा दिली. दोन महिने पूर्ण विश्रांती घेतल्यावर पुढे त्यांनी श्री स्वामीजींनबरोबर कन्याकुमारी ते काश्मीर अशी तीर्थयात्रा केली. जवळ जवळ सलग ५ वर्षे त्यांना श्री स्वामीजींचा सहवास लाभला. पुढे श्री स्वामीजींच्या आज्ञेने ते सिरसी तालुक्यातील कोळगेबीस ला आले व तेथे त्यांच्या भक्तांनी ८ महिन्याच्या आत एक आश्रम व मंदिर बांधून उभे केले व तेथेच ते पुढील अनेक वर्षे त्या भागातील गुरुभक्तांचे मार्गदर्शन करीत राहिले. लोक त्यांना ‘कोळगेबीस चा अवधूत’ म्हणून ओळखित. त्यांनी श्रीमत प प सदगुरू भगवान श्रीधर स्वामी महाराजांसाठी “शेष सिव्हासन” नावाचे एक भव्य सिव्हासन तयार केले. या सिव्हासनवर मागे तीन मुखे शेष कोरलेला असून सिव्हासनाच्या दोन्ही बाजूला सिंह मुख कोरलेले आहे. श्री सहजानंद अवधूत स्वामींनी या सिव्हासनवर त्यांचे गुरु श्रीमत प प सदगुरू भगवान श्रीधर स्वामी महाराज यांना बसवून त्यांची पूजा केली होती. हा सिव्हासन अजूनही कोळगेबीस आश्रमात आहे. त्यांचा जेष्ठ पुत्र रामचंद्र यांनी हि पुढे त्यांच्याकडून संन्यास दीक्षा ग्रहण केली व ते ‘श्रीमत् प.प श्री स्वामी रामानंद अवधूत ‘ म्हणून प्रसिद्ध झाले. अशा प्रकारे सर्व बंध मुक्त असलेले श्री. सहजानंद स्वामी अवधूत त्यांच्या अद्वितीय तपस्येने, त्यांच्या शिष्यांन प्रती असलेली उदारता व करूणा, त्यांची कठीण परिस्थितीशी सामना करण्याची पद्धती, त्यांची झटपट देशभ्रमण करण्याची पद्धती, त्यांचे आगळे दैदीप्यमान व्यक्तीमत्व, साधेपणा, व अखेर कोळगेबीस येथील आश्रमातील मोक्षप्राप्ती..! या गुणांनी त्यांच्या सर्व भक्तांना मोहीत केले होते.

जय जय रघुवीर समर्थ!!!