श्री निर्मलानंद स्वामी जी
rsz_img-20181102-wa0034

 

नमः श्रीनिर्मलानंद गुरवे सर्वसाक्षिणे ।
निर्मलब्रह्मचित्ताय सदानन्दानुभाविने ॥

श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्री निर्मलानंद स्वामीजींचा जन्म १९ एप्रिल १९३४ साली केरळातील कासारगोड जिल्ह्यातील पैवालीके ग्रामातील मालीवू या ठिकाणी झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव श्री तिमण्णा असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव श्री शंकर नारायण भट व आईचे नाव सौ. देवकी असे होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण पैवालीके येथे, माध्यमिक शिक्षण पुत्तूर येथे व उच्च विद्यालयीन शिक्षण उडुपी येथील पुर्णप्रज्ञा महाविद्यालय येथे झाले. ते कला शाखेतील पदवीधर झाले. लहानपणा पासून त्यांना ईश्वर उपासनेची आवड होती. त्यांचे वडील त्यांना वेदपाठ शिकवीत असत. ते २२ वर्षांचे असतांना त्यांना सर्व प्रथम श्रीमत् प.प. सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी महाराजांचे दर्शन घडले व त्यांची प्रवचने ऐकण्याचा योग आला. श्रीस्वामीजींची प्रवचने ऐकून ते खूप प्रभावित झाले व सर्वसंग परित्याग करून संन्यास आश्रम स्वीकारावा असे त्यांना सतत वाटू लागले. पुढे ते सिरसी तालुक्यातील कोळगेबीस (उत्तर कन्नड) येथील श्रीस्वामीजींचे शिष्य ब्रह्मैक्य प.पू. श्री सहजानंद अवधूत यांच्या सेवेत कांही दिवस राहिले. काही काळानंतर ते श्रीस्वामीजींच्या सेवेत आले व लवकरच त्यांना श्रीस्वामीजींकडून अनुग्रह झाला. त्यांनी श्रीस्वामीजींच्या समवेत अनेक तीर्थयात्रा केल्या. पुढे त्यांनी सन्यास दीक्षा घेतली व त्यापुढील २० वर्षे ते ‘परिव्राजक’ म्हणून भारतवर्षातील अगणित तीर्थ क्षेत्रांत भ्रमण केले, विशेषतः गंगा भागीरथीच्या तीरावर त्यांनी अखंड भ्रमण केले. पुढे कर्नाटकातील कुमटा (उत्तर कन्नड) येथील श्री क्षेत्र गोरे येथील भक्तांच्या विनंतीला मान देऊन ते तेथे गेले व १९८५ ते २४ सप्टेंबर २००५ असे २० वर्षे त्यांनी श्री क्षेत्र गोरे येथील श्रीस्वामीजीं च्या पादुकांची सेवा व उपासना केली तसेच गोरे क्षेत्राचे सर्वांगीण वैभव वाढविले. ते स्वतः रणरणत्या उन्हाची परवा न करता तेथील वृक्षांची काळजी घेत, त्यांना पाणी घालीत, नवीन वृक्षारोपण करीत. ते कधीही कोणाकडून देणगी मागत नसत, फक्त जे पैसे गुरुभक्त पाद्यपूजेत अर्पण केलेली दक्षिणा ते स्वीकारीत असत. ते वर्षभर अनेक धार्मिक, अध्यात्मिक कार्यक्रम आयोजीत करीत असत. तसेच, गोरे क्षेत्रात त्यांच्या अध्यक्षतेखाली वर्षभर अनेक यज्ञ याग होत असत. ते कोणताही भेदभाव न करता सदैव भक्तांचे दुखः दूर करून त्यांना सन्मार्गाला लावीत असत.महानिर्वाणाचा दिवस जवळ आला आहे असे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी श्रीमत् प.प. श्री सदानंद स्वामींच्या महासमाधी जवळच आपल्या स्वतःच्या महासमाधीचे बांधकाम सुरु केले. २४ सप्टेंबर २००५ रोजी भाद्रपद (बहुला) महिन्यात गोरे क्षेत्रातील श्रीस्वामीजीं च्या पादुकांची व श्री गुरु गणपती मंदिरातील पूजा करून त्यांनी हिमालयाच्या यात्रे साठी प्रयाण केले. भारतवर्षातील १०८ नद्यांचे तीर्थ आणण्याचा त्यांचा मानस होता. पण, वाटेतच त्यांचे महानिर्वाण झाले. श्रीमत् प.प. श्री निर्मलानंद स्वामीजींच्या अथक प्रयत्नांमुळे आज गोरे क्षेत्रात भव्य यज्ञशाळा, गोशाळा, भक्तनिवास व अन्नछत्राची व्यवस्था आहे. आजही श्रीमत् प.प. श्री निर्मलानंद स्वामीजी अदृश्य रूपाने मार्गदर्शन करून त्यांचे दुखः दूर करतात असा कैक भक्तांचा अनुभव आहे.

जय जय रघुवीर समर्थ!!!