श्री सदानंद स्वामीजी
rsz_1rsz_sadananda_swamiji(1)

 

॥ सदानंद राम चिदानंद राम सदानंद राम सच्चिदानंद राम ॥

श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्री सदानंद स्वामीजी यांचे पूर्वाश्रमीचे नाव श्री ईश्वर भट असे होते. त्यांचा जन्म कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यात झाला. त्यांच्या आई चे नाव सौ. परमेश्वरी व वडिलांचे सुब्राय भट असे होते. त्यांनी वेदाध्यायन शिक्षण श्री क्षेत्र गोकर्ण येथील वेदमूर्ती श्री परमेश्वर भट शंकरलिंग यांच्या कडे घेतले. त्यांनी आठवी पर्यंत लौकिक शिक्षण घेतले व पुढे ते पाचीरू ग्रामात ‘ग्रांट स्कूल’ मध्ये शिक्षक म्हणून नौकरीला लागले. ते पंचवीस वर्षांचे असतांना त्यांना सर्व प्रथम श्रीमत् प.प. सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी महाराजांची प्रवचने ऐकण्याचा योग आला. श्री स्वामी महाराजांचे तेजस्वी व्यक्तिमत्व पाहून व त्यांची अत्यंत प्रभावी प्रवचने ऐकून श्री ईश्वर भट यांच्या मनात तीव्र वैराग्य निर्माण झाले. पुढे लवकरच त्यांनी सर्वस्वाचा त्याग केला व ते साधु जीवन व्यतीत करू लागले. त्यांना लोक ‘ईश्वर साधू’ या नावाने ओळखू लागले. पुढे ते शिगेहळ्ळी येथील प्रसिद्ध संत श्रीमत् प.प. श्री शिवानंद स्वामीजी यांच्याकडे गेले. त्यांनी त्यांना अनेक उपनिषद रहस्यांचा उपदेश केला. या न्यायाने श्री शिवानंद स्वामीजी श्री ईश्वर भट यांचे प्रथम गुरु होते. पुढे श्री शिवानंद स्वामीजींनी त्यांना सिद्धापूर येथील कोडीगड्डे येथील एका मंदिरात साधने साठी पाठविले. हे मंदिर अतिशय निर्जन स्थानात होते. दिवसातून फक्त एक वेळ तेथे पुजारी पूजा करण्यास येत असे. अशा एकांतात त्यांनी दोन वर्षे कडक तप केले. पुढे श्री शिवानंद स्वामीजींनी त्यांना परत शिगेहळ्ळीला बोलावून घेतले. त्याच दरम्यान श्रीमत् प.प. सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी महाराज शिगेहळ्ळीला आले व त्यामुळे श्री ईश्वर भट यांना त्यांची सेवा करण्याची संधी अनायासे प्राप्त झाली. लवकरच त्यांना श्री स्वामीजींकडून अनुग्रह होऊन पादुका प्राप्त झाल्या. पुढे चातुर्थाश्रम स्वीकारल्यानंतर परिव्राजक असतांना त्यांनी याच पादुकांची पूजा भारत भ्रमंती च्या वेळी ठिकठिकाणी केली. पुढे गुरुआज्ञेनुसार ते श्री क्षेत्र गोरे येथे जाऊन साधना करू लागले. भाविकांना मार्गदर्शन करून त्यांचे दुखः दूर करू लागले. भाविकांच्या सहयोगाने त्यांनी श्री क्षेत्र गोरे येथे श्री श्रीधर पादुकाश्रमाची स्थापना केली. श्रीमत् प.प. श्री निर्मलानंद स्वामीजी त्याकाळी श्री क्षेत्र बद्रीनाथ येथे साधना करीत असत. ते गोरे क्षेत्रांत वर्षातून दोन वेळा येत असत. श्री ईश्वर भट यांनी त्यांच्या कडून सन्यास दीक्षा घेतली होती व ‘श्रीमत् प.प. श्री सदानंद स्वामी महाराज’ असे योगपीठ त्यांना प्राप्त झाले. पुढे काही काळानंतर एकदा गोरे क्षेत्रांतल्या श्रीकृष्ण मंदिराच्या उत्तर भागात असलेल्या काळ्या पाषाणातील स्वयंभू गणपतीने त्यांच्याकडे स्वतःचे अस्तित्व प्रगट केले. तेव्हा पासून श्रीमत् प.प. श्री सदानंद स्वामीजींनी तेथे त्रिकाळ पुजेची व्यवस्था लावून दिली. पुढे त्यांना आपले महानिर्वाण जवळ आल्याचे लक्षात येऊन त्यांनी महासमाधी चे स्थान निर्माण केले. श्रीमत् प.प. श्री सदानंद स्वामीजींनी क्रोधन संवत्सरातील चैत्र बहुला एकादशीस (एप्रिल १९८५) त्यांची नित्यपूजा आटोपल्यावर महासमाधी घेतली. त्या दिवशी श्रीमत् प.प. श्री निर्मलानंद स्वामीजी श्री क्षेत्र बद्रीनाथला जाण्यास बंगळूरला निघण्याच्या तयारीत होते. त्यांना तत्काळ सूचित केले गेले. महासमाधी चे सर्व विधि शास्त्रोक्त पद्धतीने त्यांच्याच हस्ते झाले. समाधीवर स्थापन केलेले लिंग व पादुका श्रीमत् प.प. श्री सदानंद स्वामीजींनी स्वतःच आणून ठेवल्या होत्या व त्याच स्थापन करण्यात आल्या व तेथे रोज त्रिकाळ पुजेची व्यवस्था केली गेली. आजही अगणित भाविक भक्तजन या समाधीवर पूजा अर्चा करून त्यांच्या चिंता, दुःख व क्लेशातून मुक्त होतात.

जय जय रघुवीर समर्थ!!!