श्री स्वामी रामानंद अवधूत
rsz_1img-20170418-wa0022(1)

 

नमः श्री रामानन्द अवधूताय रामदूताय स्वरूपिणे ।
सदा रामध्यानाय गुरूवर्याय नमो नमः ।।

सद्गुरू श्री स्वामी रामानंद अवधूत हे श्रीमत प.प. सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी महाराजांचे सद्या विद्यमान असलेले शिष्य आहेत. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव रामचंद्र हेगडे होते. त्यांच्या आईचे नाव सौ. लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव श्री नारायण हेगडे होते. त्यांचा जन्म कर्नाटक राज्यातील उत्तर कनडा या जिल्ह्यातील तट्टीकाय या ग्रामात माघ महिन्यातील शु. सप्तमी (रथ सप्तमी) शुक्ल संवत्सर, १९३० साली झाला. यांना ‘कमलाकर’ या नावाचा एक धाकटा बंधू हि होता. बाल वयात हि त्यांना विडीलांच्या मांडीवर बसून पोथी-पुराण श्रवण करण्याची आवड होती. त्यांच्या बालपणीच त्यांचा धाकटा बंधू व आई चे कांजिण्या रोगामुळे देहावसान झाले. त्यांना स्वतःला व त्यांच्या वडिलांना हि हा रोग जडला होता, पण अंतिम क्षणी त्यांच्या आज्जीने त्यांची व त्यांच्या वडिलांची योग्य ती देखभाल व सुश्रुषा करून त्यांना या रोगातून बरे केले. त्यांचे शिक्षण पहिली ते चौथी सर्कुली ग्रामातील प्राथमिक शाळेत झाले. त्याही वयात शालेय पुस्तके वाचण्यापेक्षा त्यांना भगवद गीता, योग वासिष्ठ आदी ग्रंथ वाचने आधिक आवडत असे तसेच यक्षगानातील अभिनय करून पहाणे, भजन कीर्तन करणे असे छंद त्यांना होते. त्यांनी पाचवी व सहावी चे शिक्षण कल्कुनी शाळेत घेतले. त्यांचे मौंजी बंधन झाल्यावर त्यांनी संध्यावंदन व देवपूजेचे सर्व मंत्र मुखोद्गत केले. मौंजी बंधन झाल्याने वैदिक शिक्षण घेण्याबद्दल त्यांना आकर्षण निर्माण झाले म्हणून त्यांनी शिगेहल्ली ला वेद्पाठाचे शिक्षण घेण्यास सुरु केले. तेव्हा ते सहावीत शिकत असत. त्यांचे पिताश्री श्री नारायण हेगडे (श्री स्वामी सहजानंद अवधूत) हे स्वतः परमार्थाचे साधक असल्याने त्यांचा ह्यांच्यावर खूप प्रभाव पडला. त्यांचे वडील पुराण वाचनादी सत्संग आयोजित करीत असत, लोक दूरदुरून पुराण श्रवण करण्यास येत असत व त्यांना ‘गुरुनाथ’ या नावाने ओळखीत असे. ते तरुण रामचंद्र यांना एकाग्र चित्ताने पुराण श्रवण करत असलेले पाहून त्यांना ‘रामनाथ’ म्हणू लागले. त्याच काळी त्यांचे वडील शिगेहल्ली ला गेले तेव्हा त्यांची भेट श्रीमत प.प. सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी महाराजांशी झाली. कांही दिवस श्री स्वामीजींची सेवा केल्यावर त्यांना तीव्र वैराग्य प्राप्त झाले. हे पाहून श्री स्वामीजींनी त्यांना मंत्रानुग्रह व महावाक्याचा उपदेश केला व पुढे ते काही काळ ‘दिगंबर’ झाले. श्री स्वामीजींच्या आज्ञेने ते सिरसी तालुक्यातील कोळगेबीस ला आले व तेथे त्यांच्या भक्तांनी ८ महिन्याच्या आत एक आश्रम व मंदिर बांधून उभे केले व तेथेच ते पुढील अनेक वर्षे त्या भागातील गुरुभक्तांचे मार्गदर्शन करीत राहिले. वडिलांचे अनुकरण करीत, वैदिक मंत्रांचा आभ्यास व वैदिक जीवनाचा सराव आणि अध्यात्माचा खोल विचार, यावर रामनाथ यांनी पूर्ण लक्ष केंद्रित केले. सोळा वर्षांचे असताना रामनाथ नेलेमावू, शिगेहळ्ळी आणि गोकर्ण इत्यादि ठिकाणी राहिले. याच सुमारास त्यांना श्रीमत् प.प. सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी महाराजांचे दर्शन झाले. वयाच्या बाविसाव्या वर्षी श्री.सहजानंद अवधूत स्वामीजींनी माघ महिन्यातील अमावस्या, खर नामक संवत्सर या दिवशी, रामानंद यांना सन्यास दिक्षा दिली. आणि रामचंद्र तेव्हा पासून सद्गुरू श्री.रामानंद स्वामी अवधूत झाले. श्री. स्वामीजींच्या समवेत श्री.रामानंद स्वामीजींनी संपूर्ण देशातील अनेक तीर्थक्षेत्रांना भेट दिली. नंतर श्री.रामानंद स्वामीजींनी गोकर्ण जवळ असलेल्या गुहेत राहून तपस्या केली. रोज एकदा ते महाबळेश्वर मंदिरात जाऊन, तेथील खांबातील मारुतीची उपासना करीत. कुमटा जवळ असलेल्या दिवगी गावातील काही पुढाऱ्यांनी, देवी कनिका परमेश्वरी हिच्या सूचनेनुसार दिवगी गावाच्या कल्याणासाठी, श्री.रामानंद स्वामीजींना, दिवगीला येण्यास विनंती केली परंतु त्यांनी ऐकली नाही. तेव्हा भक्तांना श्री स्वामीजींची मदत घ्यावी लागली. एकदाचे श्री स्वामीजींनी त्यांना दिवगीला जाण्यासाठी सांगितले तेव्हा ते तेथे गेले. जेव्हा श्री.सहजानंद अवधूत स्वामीजींना मोक्षप्राप्ती झाली तेव्हा श्री रामानंद स्वामीजींना कोळगेबीस येथील आश्रम चालवण्यासाठी जावे लागले. पण ते लवकरच कोळगेबीस सोडून पुन्हा दिवगीला आले. नंतर सद्गुरू श्री.श्रीधर स्वामीजींनी त्यांना वरदपूर येथे बोलावून घेतले आणि भक्तांची काळजी घेणे व सन्यास धर्मा संदर्भात वर्षभर त्यांचे मार्गदर्शन केले. सद्गुरू श्री.श्रीधर स्वामीजींना मोक्षप्राप्ती झाली तेव्हा दिवगी गावाच्या कल्याणासाठी दिवगी येथील काही पुढारी मंडळींच्या विनंती मुळे श्री रामानंद स्वामीजींना पुन्हा दिवगीला यावे लागले. दिवगी येथील एका भक्ताला स्वप्नात झालेल्या प्रेरणेनुसार त्यांनी मल्लिकार्जुन मंदिरा शेजारील त्यांची जमीन दान दिली. तेथेच आश्रम बांधण्यात आला. आणि सद्गुरू श्री.श्रीधर स्वामीजींच्या पादुका वेदी वर ठेवण्यात आल्या. एका भक्ताने बॅगोना येथे पुल बांधण्याचे काम चालले असताना एक मूर्ती घेतली होती तेव्हा तिथे १९७३ च्या आसपास वीरा मारुती मंदिराची स्थापना झाली. स्वामीजींनी विविध पूजा, हवन व पारायण करण्याची परंपरा सुरू केली. अधिकाधिक भक्त येऊ लागले तशी आश्रमाची व्याप्ती वाढू लागली. अनेकांनी त्यांची जमीन आश्रमाला दान दिली तर अनेकांनी नियमित स्वतः आश्रमाच्या बांधकामासाठी व आश्रम चालवण्यासाठी पुढाकार घेतला. आजतागायत, दर पौर्णिमेला मारूती मंदिरात, सत्यनारायण व्रत, गण हवन व सुंदरकांड पारायण होत आहे. लांबून दुरुन येणाऱ्या सर्वच भक्तगणांना त्यांच्या जात, पंथ संपत्ती ची पर्वा न करता स्वामीजींचे त्यांना आशिर्वाद देणे सुरू आहे. स्वामीजींच्या आशीर्वादाने असंख्य भक्तांच्या प्रकृतीत विलक्षण रित्या सुधारणा झाली तर अनेकांच्या संसारिक समस्या सुटल्या. फार काही प्रसिद्धी किंवा गाजावाजा न करता देखील काही वर्षांत स्वामीजी व दिवगी आश्रमाची प्रगती झपाटय़ाने झाली आहे. नियमित आश्रमाला भेट देणार्‍या हजारो भक्तांना स्वामीजी सजीव रूपातील परमेश्वरच वाटतात.

जय जय रघुवीर समर्थ!!!