श्री नित्यानंद स्वामीजी
rsz_rsz_img-20151107-wa0015(1)

 

श्री नित्यानंद स्वामी (पूर्वाश्रमीचे श्री शंकर पंडित) यांचा जन्म ज्येष्ठ शु. पौर्णिमा या दिवशी तत्कालीन सांगली संस्थान च्या राजधानीत १९२५ साली अत्यंत सत्शील मातापित्यांचे पोटी झाला. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे अष्टप्रधान मंडळातील धर्मदाय खात्यातील पंडित रामचंद्रपंत अमात्य यांचे वंशातील त्यांचा जन्म असून त्यांनी शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून “औटोमोबाइल इंजिनिअरिंग” चि पदवी सन्मान पूर्वक प्राप्त करून घेतली. त्यानंतर लगेचच दिल्ली येथे योगायोगाने श्रीमत परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी महाराजांची सर्व प्रथम भेट झाली. पुढे श्रीक्षेत्र वरद्पूर ला अनुग्रह हि प्राप्त झाला. १९७० साली श्रीक्षेत्र औदुंबर येथे दीड वर्षाचे कालावधीत त्यांनी गायत्री पुरश्चरण संपन्न केले. १९७१ साली स्वामी चिन्मयानंद यांच्या आश्रमातील “गीताज्ञानयज्ञात” २१ दिवस त्यांचा सहभाग होता. त्यावेळी “जीव-शिव-ऐक्या” चि प्रत्यक्ष अनुभूती त्यांना मिळाली. त्यावेळे पासून त्यांनी प्रामुख्याने निर्गुण उपासना अंगिकारली. १९७३ साली बेळगाव जवळ हलकर्णी या गावी ताम्रपर्ण नदी किनारी केवळ फलाहारावर राहून त्यांनी श्रीगुरूचरित्राची २१ पारायणे केली. त्यामुळे त्यांना साक्षात श्री दत्त गुरूंचे दर्शन झाले. त्यांच्या या ‘निष्काम कर्म’ साधने मुळे व अखंड नामस्मरणा मुळे त्यांना शांती स्वरूप परब्रह्म प्राप्त झाले. पुढे श्रीगणपतीपुळे येथे त्यांनी श्री स्वामीजींच्या आदेशावरून दासबोधाची २४ महिन्यात १२० पारायणे गणपती मंदिरात पूर्ण केल्याने त्यांना श्री स्वामीजींनी सन्यास आश्रम स्वीकारण्याबद्दल दृष्टांत दिला. त्यानुसार त्यांनी श्रीक्षेत्र गोकर्ण नजीक श्री धारेश्वर येथे १९७९ मध्ये सन्यास दीक्षा ग्रहण केली. त्यानंतर श्री स्वामींच्या आदेशानुसार पहिले दोन चातुर्मास त्यांनी श्री समर्थ रामदास स्वामींच्या समाधी मंदिरात सेवाव्रती राहून व त्यानंतर श्रीक्षेत्र सज्जनगडावर कठोर तपश्चर्या केल्याने त्यांना समर्थांचे परम शिष्य प.पु श्री कल्याण स्वामींचे प्रत्यक्ष दर्शन व मार्गदर्शन लाभले. १९८२ साली गुरुदक्षिणा म्हणून त्यांनी नर्मदा किनारी गुजरात मध्ये बडोदा जवळील करनाली येथे “श्री समर्थ श्रीधर सेवा आश्रम” स्तापन करून भाविक, भक्त, साधक, साधुसंत व संन्यासी यांना ध्यानधारणा, सत्संग व पुरश्चरणे करण्याची उत्कृष्ट सोय करून दिली. त्यानंतर जवळजवळ २५ वर्षे त्यांनी भारतभर अखंड संचार करून अनेक शहरात व गावात श्री दासबोध, मनाचे श्लोक व रामदासी संप्रदायाचा प्रचार व प्रसार केला.

श्रीक्षेत्र नाशिक येथे २२ जून २०२० रोजी संध्याकाळी ७ वाजता ते श्री स्वामींच्या चरणी लीन झाले. त्या दिवशी आषाढ शुद्ध प्रथमा ही तिथी होती.

जय जय रघुविर समर्थ!!