श्री भास्कर बुवा रामदासी
rsz_bhaskar

 

श्री भास्कर बुवांचा जन्म बडोद्याचा. त्यांचे पूर्ण नाव श्री भास्कर जुन्नरकर असे होते. त्यांचे वडील आणि काका श्री सयाजी राव गायकवाड यांच्या कडे राजगुरू म्हणून होते. वडील श्री साई बाबा यांचे शिष्य होते तर काका श्री टेंबे स्वामी महाराजांचे. श्री भास्कर बुवांची मुंजी श्रीक्षेत्र गिरणार ला झाली होती. त्यांनी शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून त्या काळ ची B.Sc हि पदवी संपादन केली होती. १९४० ते १९४६ या काळात ते भारतीय सेनेत नौकरीला होते. पुढे वैराग्य अंगी बाणल्यामुळे त्यांनी नौकरी सोडून दिली आणि गुजरात च्या जुनागड चा रस्ता धरला. जुनागड ला येता येता संध्याकाळ झाली, नंतर त्यांनी गिरणार ची गाडी धरून गिरणार पर्वताचा पायथा गाठला. तो पर्यंत रात्र पडली होती. गिर जंगलातील सिंह व इतर हिंस्त्र पशु या मुळे वन विभागातील लोकांनी पुढे जाण्यास त्यांना मज्जाव केला, पण त्यांनी कोणाचे काही न ऐकता पर्वत रात्रीच चढण्यास सुरुवात केला. पहाटे ते श्री गोरक्षनाथांच्या पादुकांन जवळ जाऊन पोहोचले व पुढचे ६ महिने ते तेथेच एका आश्रमात राहिले. पुढे श्री स्वामीजी त्यांची हिमालयातील बद्री केदार यात्रा आटोपून श्री ऐय्या बुवा व श्री दत्ता बुवा यांच्या बरोबर परतीचा प्रवास करीत असतांना त्यांना श्री समर्थांची आज्ञा झाली कि श्रीक्षेत्र गिरणार ला जावे. त्याप्रमाणे श्री स्वामीजींचे आगमन लवकरच गिरणार पर्वतावर झाले. एकदा श्री भास्कर बुवा माध्यान्न आरती घेऊन आश्रमा बाहेर पडले असता समोरच एका ओट्यावर श्री स्वामीजी बसलेले त्यांना दिसले. श्री स्वामींनी त्यांना जवळ बोलाविले व “चल माझ्या बरोबर सज्जनगडा वर, श्री समर्थांनी तुला बोलाविले आहे” असे म्हंटले. श्री भास्कर बुवा गोंधळले. ते म्हंटले कि “मला तर तसा काही संकेत मिळाला नाही, मग मी कसे मानु कि हे खरे आहे?” श्री स्वामीजींनी त्यांना एक ७ दिवसांचे अनुष्ठान करण्यास सांगितले. ते केल्यावर श्री भास्कर बुवांना दृष्टांत झाला कि स्वामीजीच त्यांचे सदगुरु आहेत म्हणून. त्यांनी तात्काळ जाऊन श्री स्वामीजींच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम केला. पुढे श्री स्वामीजी दक्षिणेत गेल्यावर श्री भास्कर बुवा त्यांच्या बरोबर जवळ जवळ २ वर्षे होते. नंतर त्यांचा आधिक काळ गडावरच गेला. पुढे त्यांनी श्री नर्मदा परिक्रमा अयाचित वृत्ती ने केली. श्री भास्कर बुवांनी २० मार्च १९८१ ला देह ठेवला.

जय जय रघुविर समर्थ!!