श्री दत्ता बुवा रामदासी
rsz_rsz_img_4279

 

श्री स्वामीजींनी सर्व प्रथम जर कोणाला अनुग्रह दिला असेल तर तो श्री दत्ता बुवांना. श्री स्वामींचे आद्य शिष्य होण्याचा मान मिळविणारे श्री दत्ता बुवांचे पूर्ण नाव श्री दत्तात्रेय बाळकृष्णपंत जेरे असे होते. त्यांचा जन्म भाद्रपद पौर्णिमा शके १८३५ (१५ सप्टेंबर १९१३) रोजी श्रीक्षेत्र नरसोबावाडी येथे झाला. त्यांच्या जन्माचेवेळी त्यांचे पिताजी, प.पू. श्री टेंबे स्वामी महाराजांच्या सेवेत श्रीक्षेत्र गरुडेश्वरी मुक्कामी होते. पुत्र जन्माचे वर्तमान सांगून श्री टेंबे स्वामींनी त्यांना वाडीस जाण्याची आज्ञा केली. पुढे श्री टेंबे स्वामींनी समाधी घेतली. पुढे वाडीत प्लेग पसरल्याने श्री दत्ता बुवां कुटुंबा सहित बेळगावला स्थाईक झाले, म्हणून श्री स्वामीजी त्यांना श्री दत्ता बुवा बेळगावकर म्हणून संबोधित. श्री दत्ता बुवांचे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी काही काळ अक्कलकोट ला शिक्षकाची नौकरी केली, पण मन न रमल्यामुळे परत बेळगाव ला आले व पुढे लवकरच बेळगाव च्या श्री गणपत महाराजांच्या बरोबर पंढरपूर च्या वारीत सामील झाले. पंढरपूर ला चातुर्मास चे चार महिने मुक्काम केल्या नंतर बेळगावला परत न जाता ते मंगळवेढा, नगर या मार्गे श्रीक्षेत्र नाशिकला जाऊन पोहोचले. नाशिकला श्री काळाराम मंदिरात काही काळ मुक्काम केल्यावर त्यांना श्रीरामाने दक्षिणेस जाण्याची आज्ञा केली. त्यानुसार ते तेथून निघून सातारा येथे आले. सातारा येथील कमानी हौदा जवळील विठ्ठल मंदिरात त्यांचा काही दिवस मुक्काम होता. जवळच श्री समर्थांचा सज्जनगड आहे असे कानावर होतेच. सातारहून निघाले व सज्जनगडावर दुपारी पोहोचले. श्रीरामरायाचे, श्रीसमर्थांचे दर्शन घेऊन खंबाळा तळ्यावर पाण्यात पाय सोडून बसले होते. ती वेळ श्री स्वामीजींची माध्यान्ह स्नानाची होती. ते तळ्यावर आले व ह्या श्रांत तरुणाकडे पाहिले व विचारले “बाळ, कोठून आलास? भोजन प्रसाद घेतला कां?” हीच श्री स्वामीजींची व श्री दत्ता बुवांची पहिली भेट. १९३९ चे साल होते ते. पुढे लवकरच त्यांना अनुग्रह प्राप्त झाला व ते श्री स्वामींच्या सेवेत रुजू झाले. पुढे जेव्हा श्री स्वामीजी परत दक्षिणे कडे गेले तेव्हा श्री दत्ता बुवा एकटेच त्यांच्या बरोबर होते. श्री स्वामीजींनी जेव्हा श्री बद्रीनाथ केदारनाथ ची यात्रा २ महिन्यात पाई केली तेव्हाही श्री दत्ता बुवा एकटेच त्यांच्या बरोबर होते. श्री स्वामीजींच्या या काळातील सर्व रचनांचे लेखक श्री दत्ता बुवाच असत. श्री स्वामीजीं चरित्र श्री दत्ता बुवांनी कुरगड्डी कुरवपुर ला श्री स्वामींबरोबर एकांतात असतांना लिहिले. त्यातील शब्दनशब्द श्री स्वामींनी तपासला. श्री स्वामीजींनी रामपाठ व समर्थपाठा ची रचना केल्यानंतर ती श्री समर्थांपुढे सादर करण्यासाठी श्री दत्ता बुवांना सांगितले तेव्हा त्यांनी सज्जनगडा वर येऊन श्रीसमर्थ समाधी पुढे श्रीसमर्थ पाठ म्हटला. तेव्हा श्री समर्थांनी त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिले. गडावर श्रीधरकुटी चे बांधकाम काढले तेव्हा श्री दत्ता बुवांनी कर्नाटकात जाऊन देणग्या मिळविण्याचे काम केले. पुढे त्यांनी निरंजन वृत्तीने नर्मदा परिक्रमा हि केली. १९७८ साला पासून त्यांचे दीर्घकाळ वास्तव्य सातारा येथील भक्तीधाम येथे झाले. श्री दत्ता बुवांनी माघ शु.२ गुरुवार दि.२६ जानेवारी २००१ ला देह ठेवला.

जय जय रघुविर समर्थ!!