श्री नीलकंठ बुवा रामदासी
rsz_rsz_1rsz_2img-20151010-wa0006

श्री नीलकंठ बुवांचा जन्म श्रीक्षेत्र नाशिक येथे २६ डिसेंबर १९२३ साली झाला. वयाच्या बाराव्या वर्षा पासून त्यांची वृत्ती अध्यात्मिक व पारमार्थिक अशी झाली. त्यांना श्री स्वामीजींचा अनुग्रह श्रीक्षेत्र सज्जनगडावर, श्री समर्थांच्या शेजघरात महाशिवरात्रीला प्राप्त झाला. “श्रीसमर्थ शेजघरात, प.पू. श्री स्वामीजी उत्तरेस मुख करून बसले होते व माझे तोंड पूर्वेस होते. मंत्र दिल्यावर मी श्रींच्या चरणावर फुलं वाहून पूजा केली” असा उल्लेख श्री नीलकंठ बुवांनी त्यांच्या ‘श्रीधरपर्व’ नामक स्मरणिकेत करून ठेवला आहे. श्री स्वामीजींचा मुक्काम श्रीक्षेत्र सज्जनगडावरील श्रीधर कुटीत असतांना श्री नीलकंठ बुवांची निवड त्यांच्या नित्यसेवे साठी झाली होती. ते श्रीधर कुटीतच खाली मुक्काम करीत. श्री स्वामीजी सकाळी साडे चार वाजता उठल्यावर त्यांची पाठ पाच मिनिटे चेपून देत असे. कधी कधी लोणी वापरून श्रींच्या अंगाची मालीशहि करीत असे. नंतर स्वतः स्नान करून श्रींच्या स्नानाकरता पाणी गरम करीत असे. नंतर ते श्री स्वामीजींना स्नान घाली. नंतर ते श्री समर्थ समाधी ची पूजा, श्रीरामाराया ची पूजा, तीर्थ उपसणे, मंदिराची फरशी पुसणे, पुजेची वस्त्रे धुवून वाळत घालणे, संध्याकाळी दासबोध वाचन व रात्री शेजारती अशी नानाविध सेवा करीत असे. बरेच वेळा श्री स्वामीजी फिरती वर असतांना त्यांच्या बरोबर श्री नीलकंठ बुवा हे एकमेव ‘सेवेकरी’ असत, त्यामुळे त्यांना श्री स्वामीजींच्या अनेक चमत्कारिक घटना व अनुभवांचे साक्षी राहता आले. ज्या घटनांचा उल्लेख श्री स्वामीजींच्या प्रकाशित चरित्रात हि आढळत नाही असे कैक घटना श्री नीलकंठ बुवांनी अनुभाविल्या आहेत व ते त्यांनी त्यांच्या स्मरणिकेत व्यवस्थित लिहून ठेवल्या आहेत. मैसूर मुक्कामी, त्यांनी श्री स्वामीजींकडे स्पर्श पूर्वक शक्तिपाता चा अनुभव देण्याविषयी हट्ट केला. आधी श्रींनी टाळाटाळ केली पण नंतर त्यांचा भक्तीभाव व गुरुनिष्ठा पाहून त्यांच्या मस्तकावर आपला हात ठेवला. त्याच बरोबर “आकाशीची वीज काड्कन लवली. कानठळ्या बसवणारा आवाज झाला. माझ्या भोवतीचं भौतिक जग लोपलं. अननुभूत भावविश्वात मी तरंगत होतो. देहाला वजन राहिलं नव्हतं. गुरुत्वाकर्षण विरघळून गेलं. हलका झालो. उंच जात चाललो. गगन कधीच मागं पडलं. मी आहे तिथेच असून विश्वव्यापी मोठा झालो. लोहो परीसेसी लागला । ठेंबूटा सागरी मिळाला । गंगा सरिते संगम झाला । तत्क्षणी ॥” असा त्या अनुभवाचा उल्लेख श्री नीलकंठ बुवांनी करून ठेवला आहे. जवळ जवळ ६० वर्षे त्यांनी दर वर्षी कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील सामानगड किल्ला येथे दासनवमी चा उत्सव साजरा केला व तो आजतागायत चालू आहे. श्री नीलकंठ बुवांनी ६ डिसेंबर २००६ रोजी देह ठेवला.

जय जय रघुविर समर्थ!!