श्री दिनकरबुवा रामदासी
DINKAR

 

स.भ. दिनकरबुवा रामदासी यांचे पूर्ण नाव दिनकर बिवलकर होते. त्यांचे मूळगाव नांदिवडे, ता. जिल्हा रत्नागिरी, महाराष्ट्र. ते इ.स. १९३४-३५ या कालावधीत साधनेसाठी सज्जनगडावर आले व त्याच वेळी त्यांना सर्व प्रथम श्रीमत् प.प. सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी महाराजांचे दर्शन झाले व त्यांना श्री स्वामीजींनी अनुग्रहही दिला. त्यावेळी ते तरुण होते. तेव्हापासून ते अखेरपर्यंत ते सज्जनगडावरच होते. १९५० साली श्री स्वामीजींच्या प्रेरणेने श्री समर्थ सेवा मंडळाची स्थापना झाली. त्या कार्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. सुरवातीपासूनच ते मंडळाचे कार्यवाह होते. ते उत्तम आर्किटेक्ट होते. त्यांनी सज्जनगडाच्या जीर्णोद्धाराची रूपरेषा आखून मठ मंदिराचा जीर्णोद्धार केला. श्री स्वामीजींचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास होता. एकदा श्री स्वामीजी त्यांच्या बद्दल म्हटले “श्री समर्थ भक्त दिनकरा चा परिचय त्याच्या गुणांनीच सर्वांना होत आहे. श्रीसमर्थांच्या मनात नावाप्रमाणेच याच्या हातून क्रिया घडवून आणावयाची आहे. कसलाही संशयात्मक अंधार याच्या दर्शनाने रहात नाही.” १९३५ ते १९७३ पर्यंत श्री स्वामीजींचा सहवास त्यांना लाभला. श्री स्वामीजींनी त्यांना अनेक पत्रे लिहिली आहेत. २३ एप्रिल १९७९ रोजी (चैत्र एकादशी) त्यांनी समर्थसेवा करीत असतांनाच सज्जनगडावर आपला देह ठेवला.

जय जय रघुवीर समर्थ!!!