श्री रामास्वामी
rsz_rsz_62(1)

 

श्री रामास्वामी उर्फ श्री सज्जनगड रामास्वामी यांचा जन्म १९२५ साली कर्नाटकातील शिमोगा येथे कार्तिक शु.दशमी या दिवशी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मल्लारअप्पा असून आई चे नाव पद्मावती अम्मा असे आहे. त्यांचे आई वडील दोघेहि श्री रामाचे निस्सीम भक्त होते म्हणून त्यांचे नाव त्यांनी रामास्वामी असे ठेवले. लहानपणा पासून श्री रामास्वामींना भजन व पूजन अतिशय आवडे. इतर मुलांसारखे त्यांना विविध खेळ खेळायला आवडत नसे. विद्यार्थी दशेतहि अभ्यास झाल्यावर ते त्यांच्या आईंना रामायण आणि भागवत वाचून दाखवीत असे. एकदा त्यांची भक्ती इतकी तीव्र झाली होती कि कुठेही पहिले तरी, मारुतीरायाची छबी सतत ३ दिवस त्यांच्या डोळ्यासमोर एकसारखी तरळत होती. गावात कुठेही भजन, कीर्तन, हरिकथा किंवा काहीही धार्मिक कार्यक्रमात भाग घेण्यास ते बाल वयात हि नेहमी उत्सुक असत. एकदा त्यांच्या वाचण्यात असे आले कि “आत्मज्ञान जो पर्यंत होत नाही तोपर्यंत जीवन व्यर्थ आहे” तेव्हा पासून त्यांना ‘आत्मज्ञान कसे होईल’ हाच एक ध्यास लागला. ते ह्या बाबतीत बरेच साधु, वैरागी व संन्यासी यांच्याशी बोलले पण त्यांचे काही समाधान झाले नाही. अखेर १९४८ साली सुदैवाने त्यांची भेट श्री स्वामीजींशी कर्नाटकातील सागर या गावा जवळील एका गावात झाली. श्री स्वामीजींचे नुसते दुरून दर्शन घेऊनच श्री रामास्वामींना अतीव आनंद व परमशांती चा अवर्णनीय अनुभव आला. त्यांनी श्री स्वामीजींच्या जवळ येऊन नमस्कार करून दर्शन घेतले व श्री स्वामीजींच्या एका बाजूस जाऊन उभे राहिले. श्री स्वामीजींनी त्यांना विचारले “बाळ, काय हवे आहे तुला?” श्री रामास्वामी तात्काळ म्हणाले “मला आत्मज्ञान हवे आहे”. श्री स्वामीजींनी विचारले “तुला आत्मज्ञान हवे आहे??” श्री रामास्वामी म्हणाले “होय, मला आपल्या कडून फक्त आत्मज्ञानच हवे आहे”. मग श्री स्वामीजींनी त्यांना आशीर्वाद देत “बरे ठीक, तुला जे हवे आहे तेच तुला प्राप्त होईल” असे उद्गार काढले. हे ऐकून श्री रामास्वामींना अति हर्ष झाला. त्यांना वाटले जणू कांही प्रत्यक्ष ईश्वरानेच आपल्याला वर प्रदान केला आहे. त्यांनी आपले मस्तक श्री स्वामीजींच्या चरणकमलांवर ठेवले. त्याच बरोबर श्री स्वामीजींनी आपला हात त्यांच्या पाठीवर फिरवला. त्याच क्षणी श्री रामास्वामींना असे वाटले जणू काही विजेचा प्रवाह आपल्या शरीरात श्री स्वामीजी प्रवाहित करीत आहेत. पुढे काही दिवसांनी श्री स्वामीजी कुरवपुर ला जाण्यास निघाले तेव्हा श्री रामास्वामींनी श्री स्वामीजींना कळकळीची विनंती केली कि “मला हि आपल्या सेवे साठी आपल्या बरोबर घेऊन चालावे” पण श्री स्वामीजी म्हणाले “गुरूंची इच्छा हीच आपली आज्ञा असे खऱ्या शिष्याने मानले पाहिजे, तरी तू येथे राहूनच एकांतात अनुष्ठान करावे तसेच गायत्री मंत्राचा रोज १२०० जप करावा”. पुढे श्री स्वामीजी कुरवपुरहून श्री क्षेत्र काशीला गेले आणि तेथे हि २ वर्षे राहिले. या काळात, म्हणजे जवळ जवळ ३ वर्षे श्री रामास्वामी श्रीक्षेत्र सज्जनगडा वर होते. तेथे त्यांना कर्की गंगाक्का यांचे खूप सहकार्य लाभले कारण फक्त त्यांनाच कानडी येत होते. १९५२ साली श्री स्वामीजी काशीहून परत शिमोग्याला आले, त्याच बरोबर श्री रामास्वामी हि परत शिमोग्याला आपल्या घरी आले. पुढे श्री स्वामीजींनी श्री रामास्वामींना श्रीक्षेत्र नरसोबावाडी ला ६ महिन्याचे अनुष्ठान करण्यास पाठविले. या काळात एकदा ते मानस पूजा करतांना त्यांना एक अद्भुत दिव्य दृश्य दिसले. श्री स्वामीजी, श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या पादुकांवर विराजमान झालेले त्यांनी पहिले. या दर्शन मुळे त्यांची खात्री झाली कि श्री स्वामीजींची कृपा आपल्यावर आहे. या वाडीच्या मुक्कामातच श्री रामास्वामींची भेट कर्नाटकचे श्री देवराय कुलकर्णी यांच्याशी झाली. यांनीच श्री रामास्वामींना श्रीक्षेत्र पीठापुरम ला जाऊन श्री दत्त श्रीपादवल्लभ मंदिराचा जीर्णोद्धार करावा अशी विनंती केली. पण श्री रामास्वामी थोडे साशंक होते. जावे कि नाही इतक्या लांब तसेच तिथली भाषा हि येत नव्हती, म्हणून बरेच दिवस त्यांनी मनावर घेतले नाही. पुढे एक दिवस अचानक त्यांचा उजवा कानाला पूर्ण पणे बहिरेपण आले. खूप औषध उपचार करून हि काहीच गुण येत नव्हता. मग त्यांना लक्षात आले कि कदाचित आपण श्रीक्षेत्र पीठापुरम ला जाण्याचे टाळतो आहे म्हणून असे झाले असावे. मग त्यांनी तेथे जाण्याचे मनावर घेतले आणि एके दिवशी तिथली माहिती गोळा करण्यासाठी बंगळूर हून देवनहल्ली ला जातांना अचानक त्यांच्या उजव्या कानात मोठा आवाज झाला आणि त्याच बरोबर त्यांना पूर्वी प्रमाणे व्यवस्थित ऐकू येऊ लागले. त्यांना या गोष्टी चे खूप आश्चर्य वाटले. योगायोगाने त्याच दरम्यान श्री स्वामीजी बंगळूर ला आलेले होते. श्री रामास्वामींनी जाऊन श्री स्वामींची भेट घेतली व हा किस्सा त्यांना सांगितला. श्री स्वामीजी म्हणाले ” हि सगळी श्री दत्ताचीच लीला आहे, त्यांना तुला स्वप्नात दृष्टांत देऊन श्रीक्षेत्र पीठापुरम ला बोलावून घेता आले असते पण त्यांनी तुला ह्या कष्टप्रद प्रसंगात घालून तुला तेथे बोलाविले. ईश्वर हा कधी कधी कठीण प्रसंग निर्माण करतो पण नंतर आपल्या भक्तावर तो प्रेमाम्बृताचा वर्षाव हि करतो, हीच तर त्याची अवर्णनीय लीला आहे”. १९६६ साली सर्व प्रथम श्री रामास्वामींनी श्रीक्षेत्र पीठापुरम मध्ये आगमन केले. पुढे त्यांनी तेथे ‘श्रीपादश्रीवल्लभ महासंस्थानम’ स्थापन केले व श्री दत्त श्रीपादवल्लभ मंदिराचा जीर्णोद्धार करून त्या क्षेत्रात एक नवीन उर्जा व नवचैतन्य निर्माण केले. आज श्री रामास्वामींचे वय जवळजवळ ९१ वर्षे आहे व ते अजूनहि श्रीक्षेत्र पीठापुरम येथेच राहतात.

जय जय रघुविर समर्थ!!