शुक्ला देवी जी

शुक्ला देवीजी यांचा जन्म १९४४ साली अमृतसर, पंजाब येथे झाला. श्रीमत् प.प. सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी महाराजांच्या महिला शिष्यांपैकी प्रमुख शिष्या, श्री क्षेत्र काशी येथील ‘श्रीधर स्फुर्ती निवास’ येथील सौ. सावित्रीअक्का भागवत या शुक्ला देवीजी यांच्या प्रथम गुरुमाता होत्या. सौ. सावित्रीअक्का भागवत एकदा पंजाब येथे गेल्या असता शुक्ला देवींना त्यांचे सर्वप्रथम दर्शन झाले व त्यांना श्री स्वामीजींचा महिमा कळला. त्यामुळे त्यांना श्री स्वामीजींच्या दर्शनची तीव्र इच्छा निर्माण झाली. त्यांनी ती सौ. सावित्रीअक्का भागवत यांच्याकडे बोलून दाखवली. पण सौ. सावित्रीअक्का म्हटल्या कि “पंजाब मध्ये वैदिक आचार विचारांचा अभाव असल्याने श्री स्वामीजी येथे येण्याची कधी शक्यता नाही!!” हे ऐकून शुक्ला देवीजी मनात खिन्न झाल्या व दुखः व्यक्त करू लागल्या. त्यावर सौ. सावित्रीअक्का म्हटल्या “मुली, चिंता करू नकोस, तुझ्यावर श्री स्वामीजींची कृपा होईल आणि त्यांच्या दर्शनाचा योगही निश्चित जुळून येईल”. पुढे सहा महिन्याच्या आतच असे झाले कि शुक्ला देवींच्या वडिलांनी त्यांचा व्यवसाय मुंबई ला स्तलांतरित करावा लागला व त्यामुळे त्यांचे संपूर्ण कुटुंब मुंबईला राहण्यास आले. त्या काळात श्री स्वामीजींचा श्री क्षेत्र सज्जनगड येथे एकांत चालू होता. पुढे १९६३ साली एके दिवशी अचानक सौ. सावित्रीअक्का शुक्ला देवींच्या घरी आल्या व त्यांनी सांगितले कि श्री स्वामीजी मुंबईला श्री मामा काणे यांच्याकडे आले आहेत. त्याच दिवशी शुक्ला देवीजी तेथे श्री स्वामीजींच्या दर्शनास गेल्या व त्यांना अनुग्रह हि झाला. त्यावेळी त्यांचे वय अवघे १८ वर्षांचे होते. पुढे त्यांना वेळोवेळी श्री स्वामीजींच्या सेवेची संधी प्राप्त होत गेली. त्यांनी श्री स्वामीजी व त्यांच्या इतर शिष्यांबरोबर नाशिक, काशी, कनकेश्वर व अलिबाग आदी ठिकाणच्या यात्रा केल्या. मागील चाळीस वर्षांपासून त्या स्वतः गुरुसेवेत रत असून गुरुभाक्तांना मार्गदर्शन करीत आहेत. सध्या ते मुंबई येथे राहतात.

जय जय रघुवीर समर्थ!!!