श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य सदगुरू भगवान श्रीधर स्वामी महाराज यांचे “विस्मृती” या मूळ कानडी प्रवचनाचा मराठी अनुवाद.

(अनुवादिका - सौ. मीनाक्षी चंद्रशेखर, मैसूर.
सौजन्य - सौ वाणी शास्त्री, गुरुपूर, कान्सुर, सिरसी.
प्रुफरीडिंग - श्री रजनीकांत चांदवडकर, नाशिक)

 

जीवनामध्ये विस्मृती असल्याकारणाने ऐकलेले सर्व विसरले जाते. ऐकलेले, पाहिलेले ठीक रीतीने समजून त्यातील परमात्म्याचा अंश जाणून (ओळखून) न विसरतां, जर पुढे पुढे चाललो तर आपण, या भवसागररामधून पार होऊ शकू!! “लाखात एक भक्त, कोटीमध्ये एक मुक्त” असे पूर्वी म्हणत, पण आता ती संख्या अजून विरळ झाली आहे.

परमात्मा सर्व समृद्ध!! सर्व समर्थ!! तो काही पण करू शकतो! काही पण देऊ शकतो! ही गोष्ट माहित नाही असे लोक अगदी विरळ! परंतु ही गोष्ट आचरणामध्ये आणू शकणारे अगदीच विरळ आहेत. परमात्मा “सर्वशक्तिमान विभू आहे” असे केवळ समजल्यामुळे, कबूल केल्याने मात्र काही साधत नाही. तो परमात्मा खूप शहाणा सावकारा सारखा आहे. आपली संपत्ती हडपण्यासाठी येणाऱ्या चोरांच्या, वंचकांच्या वागण्याला तो कधी फसत नाही. बाहेरून, किंवा वरवर बाहेर असणाऱ्याला फसवू शकाल! परंतु सर्वांच्या आत  बसून सर्वसाक्षी असणाऱ्या परमात्म्याला फसवणे कोणाला शक्य आहे?  त्याला प्रसन्न करावयाचे असल्यास प्रथम अंतःकरण शुद्धी हवी! अरिष्ट वर्ग, जसे काम क्रोध लोभ मोह मद मत्सर यांना जिंकून असलेल्या मनोबलाने परिष्कृत दृष्टीने पाहिल्यास तो गोचर होतो. परिष्कृत हृदयाने भावना केल्याने, (भाव धरल्याने) तो भक्ताधीन कनवाळू मागितलेले देणारा दयासागर होतो!! शुद्ध चित्त, अनन्यता हे नसेल, तर तो पण नाही, त्याची कृपा पण नाही. विवेक बुद्धीला परमात्म्याची जाणीव होते. परमात्मा भक्तांची प्रार्थना ऐकतो! आपली स्तुती करणाऱ्यांच्या सकल संकटांचा परिहार करतो, नाश करतो. “यो मां स्मरति नित्यशः। तस्याहं सुलभः पार्थ” हे अर्जुन, जो मला अनन्य भावनेने नित्य स्मरण करतो त्याला मी अतिसुलभ असतो, असे भगवंताचेच म्हणणे आहे. “मत्-चित्तः सर्व-दुर्गाणि मत्-प्रसादात् तरिष्यसि ।” “माझ्यामध्येच जो मन ठेवतो, त्याचे आलेले सर्व कष्ट व संकट माझ्या प्रसादानेच तो पार करतो” असा त्याचा अर्थ. असेच भगवंताचे आश्वासन आहे. पण ते केव्हा??

समजा एक सावकार आहे, एक गरीब त्याच्याकडे उधार मागायला जातो, ते दान म्हणून नाही किंवा मदत म्हणून पण नाही, पण व्याजासहित तुमचे पैसे परत तुम्हाला देतो अशी त्याची प्रार्थना असते. तो कसा काय आहे, “बोले तैसा चाले” असा आहे का? चांगल्या स्वभावाचा आहे का? असे ठरवून त्यास तो सावकार उधार देतो. असे समजा. तसेच परमार्थातील भक्तांना पण काही अर्हता (योग्यता) हवी. सुसंस्कृत मन, परी शुद्ध आचरण, अनन्य शरणागती हे सर्व असतानाच भक्ताच्या भक्तीला किंमत असते. तेव्हाच त्याला परमात्म्याच्या भक्तीचा आसरा मिळतो. ते नसल्यास काही मिळणार नाही!! गरिबाला सावकारा जवळ जाऊन पैसे मागणे कष्टदायक आहे. काही वेळा बंधू मदत करतीलही, परंतु या सर्वांचे रक्षण करणाऱ्या परमात्म्याकडे माणूस जात नाही. कारण त्यांच्यामध्ये अशी अर्हता नसते, त्याला त्या परमात्म्याच्या शक्तीची जाणीवच नसते, त्यांचे मन तितके सुसंस्कृत नसते.

धनी माणसाजवळ अति विनयाने, आदराने स्तुती करेल, त्याऐवजी जर परमात्म्याची स्तुती केली, तर कोण मुक्त होणार नाही?? “ये यथा मां प्रपद्यन्ते” असे भगवदगीते मध्ये सांगितले आहे. तूच एक गती म्हणून पाठी लागल्यास, तो जरूर रक्षा करणारच. स्त्री, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आदी सर्वजण भगवंताची भक्ती करूनच परम गतीला प्राप्त होतात.

जय जय रघुवीर समर्थ!!