Shri Ramacha Dhava
by Shrimat PP Sadguru Bhagwan Shri Shridhar Swami Maharaj
(Many thanks to Shri Ananta Dev of Wai, Maharashtra for sharing the doc file of this stotra)
श्रीरामाचा धांवा

 

हे रामसख्या तुज भक्‍तछळण कां साजे ।
तव ब्रीद तोडरीं ‘राम दयार्णव’ गाजे ॥धृ०॥

या कलियुगिं सकलहि दुर्बल हे श्रीरामा ।
नच देहशक्‍ति बा मानसीक हि आम्हां ॥
जरि इच्छिसि तपहि न होतें आम्हां कडुनी ।
झट ज्वरादिकें तनु पीडित थोडें करुनी ॥१॥

एकाग्र मनहि नच जपध्यानादिकिं होय ।
तव प्राप्‍तिस्तव या कोणतीहि नच सोय ॥
नच धनधान्य हि बा विपुल असे या आम्हां ।
कलिं सकल दृष्टीनें हीन भक्‍त बहु रामा ॥२॥

असहाय बालका देखुनि माता धावे ।
मम भक्‍त म्हणुनिया त्वरितचि आम्हां पावे ॥
तूं देव त्रयाचा चालक पालक अससीं ।
जगिं अघटित करण्या शक्य असुनिया तुजसी ॥३॥

या कलिकालाचे निमित्त पुढती करुनी ।
नच फसवी आम्हां भोळे भाविक म्हणुनी ॥
असहाय निरंकुश वीर श्रेष्ठ तूं होसी ।
तव सम न शक्‍त बा कोणिहि गोचर मजसी ॥४॥

तव विरह व्यथेनें बहुत दुःख या होई ।
चिर दुःखित आम्हां झडकरि दर्शन देई ॥
तव दासाम आम्हां विघ्न कायसें रामा ।
तव उदासीनता कारण या सुखधामा ॥५॥

मी निर्गुण निष्क्रिय अरुप म्हणुनि न राहे ।
नित स्थूल कार्य जगिं स्थूलचि रुपें बाहें ॥
बहु भक्‍तां दर्शन देऊनि पावन केलें ।
आतांचि असें कां मौन जाडय बा धरिलें ॥६॥

तव परम प्रीतिचा आर्यधर्म हा आतां ।
जगिं लुप्‍त प्राय बा होत कुणि न या त्राता ॥
कितीकांच्या मानी सुर्‍या पडति कितिकांच्या ।
निजधर्मासाठीं पाठीं पोटिं भोळ्यांच्या ॥७॥

किति पादत्राणें कुंकुमसतिचें पुसुनी ।
सति पुढति पतीचा खून बहू छळ करुनी ॥
नव युवति कुमारिहि तदीय हे रघुनाथा ।
किति भ्रष्ट करुनि मग केल्या भ्रष्ट सुमाता ॥८॥

किति असति बिघडल्या सति पति मज ना गणती ।
किति अंगावरचीं पोरें पयाविण रडती ॥
मायबापाविण बा कितिक बालके दीन ।
किति त्यक्‍त-ग्रामगृह विदेशी धनकणहीन ॥९॥

हे कितिक सुधार्मिक कुलीन बळजबरीनें ।
परधर्माचें जूं वागवीति भीतीनें ॥
त्या दुष्टांच्या करि हताश होउनि रामा ।
अति करुण अश्रुनें बाहति तुज सुखधामा ॥१०॥

किति कोमल कुलिना बाल बालिका युवती ।
किति पतिव्रता सति यवनांच्या दुर्नीतीं ॥
बहु नीच छळण बा सोसुनि मनिं कढताती ।
मग निराशतेच्या दीर्घश्‍वासिं तुज बाहती ॥११॥

कुणि दिव्य शक्‍तिचा साधु वा संन्यासी ।
अभिमान बाळगुनि सोडवील आम्हांसी ॥
हे दीन हिंदुजन आशा करिती रामा ।
आम्हांसि तरी दे योग्य शक्‍ति सुखधामा ॥१२॥

मज ऐकवेन हे नयनातुनि जल वाहे ।
बहु हृदयि पीळ बा पडुनी प्रार्थित आहे ॥
झणिं धाव पाव बा धर्माच्या अभिमानें ।
जरि ना तरी दे बळ आम्हां या करुणेनें ॥१३॥

बहु नियम वर्तवुनि धर्म मालवूं बघती ।
सामान्य जनहि हे ’धर्मशल्य हा’ म्हणती ॥
बहु अनीतिसी बा ऊत आलासे जगतीं ।
अवतार घेई जरि ना, दे शक्‍ति आम्हां ती ॥१४॥

हा धर्म सनातन महत्त्व परि याचें हें ।
जगिं नेणुनि सकल हि अंध जाहले पाहे ॥
या धर्माचें बा महत्व वठवुनी दावी ।
स्वतःची ना तरी करवी आम्हां करवीं ॥१५॥

झणिं देह धरुनि क्षणिं वाढुनिया सुखधामा ।
हा अधर्म हाहाःकार शान्तवी रामा ॥
हा आवडीचा तव धर्म आतां नच राहे ।
जरि वेळ लाविसि म्हणवुनि तुज बहु बाहे ॥१६॥

हे रामसख्या तुज भक्‍तछळण कां साजे ।
तव ब्रीद तोडरीं ’रामदयार्णव’ गाजे ॥धृ०॥

रचनास्थळ – श्रीराम मंदिर, गिरनार पर्वत, १९४७

श्रीसीतारामचंद्रार्पणमास्तु

जय जय रघुविर समर्थ!!

श्री सद्गुरू समर्थ रामदास स्वामी महाराज कि जय!!

श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी महाराज कि जय!!!

 

 

(Tags - भगवान श्रीधर स्वामी महाराज,श्रीधर साहित्य,श्रीधर स्वामी,ಶ್ರೀಧರ್ ಸ್ವಾಮಿ,ಭಗವಾನ್ ಶ್ರೀಧರ ಸ್ವಾಮಿ,bhagavan,bhagawan,sridhara,bhagvan,sridhara,sreedhara,Ramdasi,ramadasi,sajjanagada,sajjanagarh,sajjangad,sajjanagada,Sajjangarh,Samarth Ramdas,sheedhara sahitya,Shreedhar Swami,shreedhar swamy,Shreedhara Swamy,sridhara sahitya,Shridhara Swamiji,sreedhar swami books,sreedhar swamy,sreedhara sahitya,sreedhara swami,sreedhara swamy,sreedhara swamy books,sridhar sahitya,sridhara sahitya,sridhara swami,sridhara swami books,Varadahalli,varadalli,Varadapur,varadapura,Varadpur,Vardalli,)