श्रींच्या शिष्या सौ बेबीताई लक्ष्मण जोशी

bebi tai
सौजन्य व शब्दांकन - श्री श्रीधर जोशी,कराड. 
विशेष आभार - श्री श्रीधर दीक्षित,पुणे.
टंकलेखन - श्री रजनीकांत चांदवडकर,नाशिक.

 

जय जय रघुवीर समर्थ!!

माझी आई, सौ बेबीताई लक्ष्मण जोशी पूर्व आश्रमातील बेबी, तिचा जन्म व बालपण श्रीक्षेत्र सज्जनगडावरच गेले. लहानपणापासूनच उपासनेची आवड. त्यामुळे शाळा झाल्यावर संध्याकाळी उपासना व दासबोध वाचन केले जाई. श्री स्वामी गडावर आल्यावर याबाबत मार्गदर्शन करायचे. माझी आई खरोखरच भाग्यवान. आई पोहायला गेली असताना अचानक पायाभोवती काहीतरी गुंडाळले असल्याचे जाणवले. साप असावा म्हणून पाहिल्यावर कळले की ती रुद्राक्षाची माळ होती. श्री स्वामी महाराजांनी “दत्ताचा प्रसाद मिळाला” असे सांगितले होते. काही वर्षांनी तिचा विवाह एल व्ही जोशी यांच्याशी झाला. श्री स्वामींच्या आशीर्वादाने लग्नानंतर दैनंदिन उपासनेत खंड पडला नाही. आई एकदा गडावर गेली होती. त्यावेळी श्री स्वामींचे वास्तव्यही गडावरच होते. आईच्या पोटात नेहमीच खूप दुखे. आजीने ही गोष्ट श्री स्वामींचे शिष्य श्री आगाशी बुवांना सांगितली. त्यांचे डॉक्टर म्हणजे श्री स्वामींचे तीर्थ. श्री समर्थांचा अंगारा त्यांनी आईला दिला व श्री स्वामींकडे नेले. श्री स्वामींनी शिष्याला तीर्थात बघण्यास सांगितल्यावर हिला बाधा झाली आहे असे सांगितले. पण आईची श्रद्धा श्री स्वामींवर. तिने श्रीस्वामी असल्यावर बाधा होणे शक्य नाही असे म्हटले. श्री स्वामींनी तीर्थ शिंपडले तेव्हापासून तिला पुन्हा त्रास झाला नाही.

उपासनेसाठी आईला श्रीस्वामींचे शिष्य सातारचे श्री दत्ता बुवा (महाराज) यांचे अध्यात्मिक मार्गदर्शनही लाभले. त्यांची एक आठवण. बाबा सरकारी कार्यालयात असल्याने तीन वर्षांनी त्यांची बदली व्हायची. पोफळी ला आम्ही असताना संध्याकाळच्या वेळेस महाराजांनी हाक मारली. पण समोर अचानक एक मोठे जनावर आले. महाराजांनी येण्याचे कारण विचारल्यावर यांनी (बाबांनी) मागल्या जन्मी त्याला मारल्याने त्यांना आपण मरणार असल्याचे कळले. तरीही त्याला मुक्ती मिळण्यासाठी काशीस जाऊन शंकराचा जप करण्यास सांगितले व पुढे श्री स्वामीं बरोबर काशीला आल्यावर मुक्ती मिळेल असे महाराजांनी म्हटल्यावर जनावर निघून गेले. बाबांच्यावरचे संकट टळले.

उपासना चालू होती तरीही आपल्या जवळ श्री स्वामींच्या पादुका असाव्यात असे आईला खूप वाटे. मफतलाल यांच्याकडे श्रीस्वामी असताना आई बाबा दोघेही गेले होते. खूप गर्दी असूनही श्री स्वामींनी आईला बोलावून दोघांनाही अनुग्रह व पादुका देणार असल्याचे श्री स्वामी म्हणताच आईला अतिशय आनंद झाला. तसेच यांची कुठेही बदली झाली तरी त्यांच्या राहण्याची सोय मी करीन असा आशीर्वाद दिला.

श्री स्वामी आईला बेबीच म्हणत. बाबांची बदली कोयनानगर ला झाली. जर कोणी तिथे आल्यावर L.V कुठे राहतात असे विचारले तर श्री स्वामी म्हणतात ज्या घराच्या समोर रांगोळी आहे ते माझ्या बेबीचे घर ज्याला श्री स्वामींनी माझे म्हटले अशी माझी आई खरंच भाग्यवान श्री स्वामी कोयनानगरला घरी आले आईने वाळले धरणावर श्रीस्वामी गेले कोयनेची ओटी भरली प्रार्थना केली व श्री समर्थ शिव स्मारक बसवा म्हणजे भूकंप जास्त प्रमाणात होणार नाहीत असा सर्वांना आशीर्वाद दिला आईची श्री स्वामींवर खूप श्रद्धा होती ती अखंड काम करताना रामनाम घेत असे गिरणीत गेल्यावर तिचा जप चालुच असे गिरणीच्या पण त्यातूनही तिला रामनाम ऐकू येत असे मला एकूण पाच बहिणी. एकदा श्री स्वामींना हे कळल्यावर त्यांच्या दर्शनासाठी आई गेली असता श्री स्वामींनी तिला प्रसादाचा नारळ दिला व होणाऱ्या मुलाचे नाव श्रीधर ठेवण्यास सांगितले आणि माझा जन्म झाला.

कितीही संकटे आली तरी तिची श्री स्वामीं वरची श्रद्धा कमी झाली नाही. ती नेहमीच हसतमुख असायची. जाण्यापूर्वी काही दिवस तिला उलटीचा त्रास सुरू झाला म्हणून तिला पुण्याला रुबी मध्ये दाखवले. आईने अंगावरचे सर्व दागिने बहिणीकडे, किशोरीताई कडे दिले. मंगळसूत्र पत्नीकडे दिले. आपल्या अंगावरचे साधे मंगळसूत्र घातले. ती असे का करते हे आम्हा अज्ञानाना कसे कळणार? आईचे म्हणणे “हे आपल्याला काय करायचे आहे? कोणत्याही गोष्टीचा मोह नको”. या दुखण्यात किशोरीताई ने खूप सेवा केली. तिच्या मते घर, सोने नसले तरी चालेल पण आई बरी झाली पाहिजे. पण आईला घरी आणल्यावर दोन दिवस ती होती. जाण्यापूर्वी माझ्याकडून तिने दासबोधातील सद्गुरु स्तवन समास वाचून घेतला व शांतपणे ती श्री स्वामींच्या चरणी विलीन झाली. सांगायच्या गोष्टी अनेक आहेत. पण फक्त एकच सांगावेसे वाटते की आम्ही भावंड खरंच खूप भाग्यवान आहोत की अशा आईवडिलांच्या पोटी जन्म घेतल्यामुळे आम्हाला श्री स्वामींचे नाव घेता येते व उपासना करता येते.

जय जय रघुवीर समर्थ!!

– श्री श्रीधर जोशी, कराड.

सौ बेबीताई लक्ष्मण जोशी यांची एक रचना –

 

भजने दीनदयाळा पतित-पावना, गुरूनाथा देवा।
अनन्य भावें वंदन करितें, चरणिं ठाव द्यावा ||१||

दर्शनार्थं हे चित्त तळमळे, अंत किती बघसी।
मनवारूवरि बसुनि झडकरी, शांत करी मजसी ॥२॥

शांतिसुखाचा अथांग सागर, तूं चि जगीं असतां।
तयामधी मी मीन एक ही, विरससि कां आतां ॥३॥

परिसुनि माझी नम्र विनंति ही, दर्शन झणिं देई।
पाप ताप हें विलया नेऊनि, मोक्ष-पदां नेई ॥४॥

अनाथ मी लेकरूं तुझें हें, तारि भवांतुनि या।
निजानंद-पदि रंगुनि राहो मन हे गुरूराया ||५||