श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य सदगुरू भगवान श्री श्रीधर स्वामी महाराज विरचीत

श्री विघ्नविनाशक स्तोत्रम्‌

अनुवादक : सौ नलिनी प्रभाकर पाटिल,इंदूर
आभार : सौ सोनाली उपेंद्र दसरे,पुणे

*ईशानो ढुंढिराजो गणपतिरखिलाघौघनाशो वरेण्यो देवानामग्रगण्यः सकलगुणनिधिर्योग्रपूजाधिकारी।*
*विद्याधीशो बलिष्ठःषडरिविदलनः सिध्दिबुध्दिप्रदाता। जीवानां मुक्तिहेतुर्जयति भवहरः श्रीगुरुः सौेख्यसिन्धुः।।1।।*

ईशान, धुंडिराज, गजवदन, गणपति इत्यादि नांवानीं प्रसिद्ध असलेला, अखिल पापसमूहाचा समूळ नाश करणारा, देवांचा प्रमुख, सर्व गुणसम्पन्न, अग्रपूजेचा अधिकारी, सकल विद्यांचा अधिपति, बलाढ्य षड्‌्‌शत्रुंचा नाश करणारा, सिद्धि व बुद्धि चा देणारा, अशा, जिवांच्या मुक्तीला कारण होणार्‌या भवनाशक सुखसागर श्रीगुरुंचा जयजयकार असो. ।।1।।

*विघ्नान्हन्तीति योसौ श्रुतिषु निगदितो विघ्नहेतिप्रसिद्धो व्यक्ते वाव्यक्तरुपे प्रणववपुरयं ब्रह्मरुपः स्वमात्रः।*
*यो व्यक्तो भक्तहेतुर्निरवधिरमलो निर्गुणो निष्क्रियोपि भक्तांनां मुक्तिहेतौ विदलयति कृृृतं मायिकस्याद्वयः सः ।।2।।*
संकटाचा नाश करणारा म्हणून वेदांनी ज्याची सार्थ स्तुति केलेली आहे असा विघ्नहर्ता म्हणून जगद्विख्यात असलेला, आपल्या व्यक्त वा अव्यक्तरुपामध्येंहि जो प्रणवदेहधारी साक्षत ब्रह्मच आहे, अनंत, शुद्ध, निर्गुण व निष्क्रिय असूनहि जो भक्तांसाठी प्रकट झालेला आहे आणि भक्तांना मोक्ष देण्याकरितां जो मायेच्या फापटपसार्‌यांचे निराकरण करणारा आहे तो (प्रभु विनायक इतकें सर्व करुनहि) मूळ चिद्वस्तूपासून भिन्न नाहीं. ।।2।।

*सर्पो रज्जुर्हि यद्वन्न भुजग इति सा कथ्यते रज्जुसर्पे विश्वं ब्रह्मैव तद्वन्नच जगदिति तत्खल्विदं ब्रह्म वाक्ये।*
*सत्तासामान्यसरुपात्कथितमपि च यो दृृश्यरुपो न तादृग्‌ दृृश्यं यद्विघ्नकृत्स्यात्तदपनति यो बोधतो विघ्नहायम्‌।।3।।*

दोरीचा साप हीं खरोखर दोरीच असून तो साप नव्हे हें जसे दोर— सर्पाबद्दल सांगितले जातें, तसेंच ब्रह्माच्या ठिकाणीं भासमान होणारें विश्व हें खरोखरी विश्व नसून ब्रह्मच होय असें, ”सर्व खल्विदं ब्रह्म”
या वाक्यानें स्पष्ट केले आहे. सत्तेच्या सामान्यरुपतेमुळें ब्रह्म हेंच दृृश्य विश्व आहे, असे सांगून सुद्धां तें ब्रह्म तशा प्रकारें दृश्य होत नाहीं. ज्या दृश्यामुळें द्रष्टा बद्ध होतो ते आत्म प्रचीतीच्या मार्गांत विघ्न उत्पन्न करणारें दृश्य (दृश्यभाव) आत्मबोधाच्या द्वारां नष्ट करण्यामुळें तें ब्रह्मच विघ्नहराच्या रुपानें साकार म्हटलें गेलें आहें. ।।3।।

*सर्वं ब्रह्मस्वरुपं परमपरयुतं विश्वमाभाति यच्च चैतन्यस्याद्वयत्वात्‌ गदित इति च यो दृृृश्यरुपोप्यरुपः।*
*माया तत्सर्वकार्यं जडमिति कथितं यं विनाभावमेति सर्वत्रावस्थितत्वात्तदनुभव इति स्वादनाद्योद्वयः सः ।।4।।*

सर्व कांही ब्रह्मस्वरुपच आहे या श्रुतिवाक्यानुसार श्रेष्ठ कनिष्ठ असें जें हे विश्व प्रतीत होतें, तें चैतन्यापेक्ष भिन्न नसल्यामुळें दृश्य रुप असून सुद्धां निराकारच आहे. माया व तिचें सर्व कार्य हें जड म्हटले असल्यामुळें तेंहि चैतन्याशिवाय राहूं शकत नाहीं. त्या चैतन्याच्या सर्वव्यापित्वाचा जो अनुभव येतो त्यावरुनच हा (गजानन) अनादि व अद्वितीय होय. ।।4।।

*भात्यस्त्यानंदरुपोसदसुखजडतारुपदृृश्येस्ति यो वै नित्यो नित्यादिकानां भवति किल तथा चेतनश्यचेतनानाम्‌।*
*सर्वस्यैतस्य मायाकृतसुखमिह यत्‌र्पार्थ्यते तद्‌गणेशो यस्तं सर्वादिभूतं भजत जगति भो! सारभूतं वरेण्यम्‌।।5।।*
दृष्टिगोचर व मनोगोचर अशा या सर्व असत्‌, असुख व जडतारुपी दृृश्यातून जो आनंदरुपाने असतो, आकाशादि नित्य मानल्या गेलेल्या पदार्थातहि जो नित्य असतों, प्राण इंद्रियादिक सचेतन मानल्या गेलेल्या पदार्थांतील जीे चेतना आहे, आणि या सर्व मायाकृत सुखासाठी ज्याची प्रार्थना केली जाते, त्या सर्व—सुख—समुदायाचा जो स्वामी आहे त्या सर्वभूतांचा आदि असलेल्या सारभूत वरेण्याची —श्रीगणेशाची— भक्ति करा. ।।5।।

*नित्यं यन्निर्विकारं निरतिशयसुखं ब्रह्म तन्मत्स्वरुपं ज्ञात्वा विश्वातिभूतः सकलविदलयन्‌ स्वार्चिषास्वस्थ आसे।*
*माया तत्कार्यमेतत्‌ स्पृशति न मयि वा दृृश्यते नाविरासीन्‌ मयायाः सर्वशक्तेः पर इति सततं यः स एवाद्वयोहम्‌।।6।।*

जे नित्य, निर्विकार, निरतिशय आनंदरुप ब्रह्म तेंच माझे खरे—खुरे स्वरुप आहे, असें समजून विश्वातीत होऊन आपल्या ठिकाणीं असलेल्या सर्व देहबुद्धीचा ज्ञानाग्नीनें समूळ नाश करुन मी स्वस्थ झालों आहे. भ्रामक माया व तसेंच तिचें कोणतेंहि कार्य मला स्पर्श करुं शकत नाहीं अथवा माझ्‌या ठिकाणीं तें कोणत्याहि प्रकारें दिसूनहि येत नाहीं. मायेच्या सर्व शक्तीच्या पलीकडे जो सतत असणारा अद्वितीय असा हा (विनायक) तेंच मी परब्रह्म आहे. ।।6।।
*ब्रह्मानंद करोयमात्ममतिदः श्रीढुंढिराजस्तवः विघ्नाघौघघनप्रचंडपवनः कामेभपञश्चाननः।*
*मायाव्यालकुलप्रमत्तगरुडो मोहाटवीहव्यवाड्‌ आानान्घ्यनिवारणैकतरणिर्भेदाब्धिकुम्भोद्‌भवः ।।7।।*

हे धुंडीराजस्तवन ब्रह्मानंद उत्पन्न करणारें, आत्मज्ञान देणारें असून संकटं व पाप यांना दूर पळवून लावणारा भयंकर झांझावात व कामरुपी हत्तीला ठार मारणारा हा सिंह आहे. हा मायारुपी सर्पिणीचे निःसंतान करणारा बलशाली गरुड असून मोहाचें अरण्य जाळून भस्म करणारा दावानल आहे. अज्ञानांधकाराचा नाश करणारा हा सूर्य भेदभावरुपी महासागराला आटवून टाकणारा अगस्ती आहे. ।।7।।

।।इति श्रीमत्‌परमहंस परिव्राजकाचार्य सद्‌गुरु भगवता श्रीधरस्वामिना विरचितं श्री विघ्नविनाशक स्तोत्रम्‌ संपूर्णम्‌।।