प पू. सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी महाराजांचे शिष्य,
त्रिकालज्ञानी थोर सत्पुरुष पू. श्री. बाळकृष्ण अष्टेकर महाराज

पू. श्री. अष्टेकर महाराजांचे मूळ नाव बाळकृष्ण कुलकर्णी. सातारा जिल्ह्यातील मायणी (भिकवडी) गावचे हे देशस्थ ऋग्वेदी कुटुंब. श्रीदत्तप्रभूवर श्रद्धा असणाऱ्या बाळकृष्ण महाराजांचा स्वभाव शिघ्रकोपी व हट्टी. बालपणी दगड, धोंडे जमवून भजन पूजन करण्यात मग्न असत. वयाच्या आठव्या वर्षी महाराज घराबाहेर पडले. कोल्हापूर येथे मारुतीच्या मंदीरात त्यांची उठबस असे. एकदा शाहू महाराजांनी त्यांना सन्मानपूर्वक प्रासादात येण्याविषयीचे आमंत्रण पाठवले. परंतु महाराज जागचे हालले नाहीत. त्यांनी शाहू महाराजांना उलट निरोप पाठवला. “माझे आपल्याकडे काहीच काम नाही, आपले माझ्याकडे काही काम असल्यास मला देवळात येऊन भेटावे”. शाहू महाराजांनी शिपायाबरोबर पाठवलेले रुपयांचे ताटही त्यांनी परत केले. फक्त त्यातील फक्त दोन रुपये घेऊन ते मारुतीच्या पुढे ठेवले.

अर्थातच या गोष्टीचा शाहू महाराजांना खुप राग आला. शिपाया करवी त्यांनी महाराजांना देवळातून हुसकावून लावले. महाराज कोल्हापूर स्टेशनला येऊन प्लॅटफॉर्मवर बसून राहिले कारण रेल्वे स्टेशनवर तर संस्थानची हुकूमत नव्हती ना. महाराजांचे काहीच बिघडले नाही परंतु इकडे राणी सरकारांचे काम अडून बसले. राणी सरकारनी विनंतीपूर्वक आग्रह करून महाराजांना सन्मानाने दरबारात नेले. महाराजांची यथासांग पूजा करून वाचासिद्धी असलेल्या या बालकाला आपली अडचण सांगितली. त्यावर महाराज म्हणाले, “मारूतीला काही जमीन व उत्पन्न कायमचे दिल्यास आपले काम होईल माझ्या समोर अत्ताच उदक सोडा…” अशा रीतीने कोल्हापूरच्या ज्या मारुतीच्या मंदीरात महाराज बसले होते त्या मंदीराला त्यांनी कायमचे उत्पन्न व जमीन मिळवून दिली. राणीसाहेबांचे काम अर्थातच महाराजांच्या कृपेने सफल झाले.

कोल्हापूरच्या शाहू महाराज व राणी साहेबांची मर्जी संपादन केली. राणीसरकारांचे काम झाले. ब्राह्मण फार हट्टी आहे, हट्टी आहे, त्याचे अपभ्रंश रुप अष्टी असे होऊन पुढे महाराजांचे अष्टीकर अष्टेकर असे नामाभिधान रुढ झाले. हा किस्सा महाराजांच्या वयाच्या नवव्या वर्षी घडला. त्यानंतर महाराजांची सतत भ्रमंती, तीर्थाटन सुरु होते. या भ्रमंतीत महाराजांनी अनेक लोकांच्या व्याधी निवारण केल्या. योग्य साधना व मार्गदर्शन करून अनेकांना सन्मार्गाला लावले. महाराज कोल्हापूरहन निघाले ते अनेक सत्पुरुषांची सेवा, संत संग करीत, तीर्थक्षेत्री हिंडत जनसेवा करीत राहिले. आळंदी मलवडी येथे खंडोबाचे जागृत देवस्थान आहे. हे स्थान नेमके कोणाचे याबाबत दोन ब्राह्मणांचा वाद होता. तो वाद महाराजांनी मिटवला. त्यांनी निर्णय दिला की, “ज्यांच्याकडे गंगा पडेल त्याने उत्पन्न घ्यावे व सेवा करावी”. परंतु त्या ठिकाणाहून गंगा केव्हाच लुप्त झाली होती. कित्येक वर्षे तिचा पत्ता नव्हता. तेव्हा हा वाद मिटणार कसा अशी सर्वत्र चर्चा होती. महाराजांचे नामस्मरण, भजन, पूजन चालू होते. त्यांनी मनोभावे प्रार्थना करताच गंगा प्रकट झाली. त्यामुळे हा वाद कायमचा मिटलाच परंतु महाराजांची कीर्ती झाली. त्यांचे सामर्थ्य त्यांच्यातील दैवी शक्तीचा लोकांना प्रत्यय येऊ लागला.

लहानपणी महाराजांचा मुक्काम गोंदवल्यात होता. गोंदवलेकर महाराजांच्या ते अंगाखाद्यावर खेळलेले. ब्रह्मचैतन्य पू. श्री. गोंदवलेकर महाराजांनी श्री. अष्टेकर महाराजांना, ‘तू इथे न रहाता सदैव भ्रमंती करून लोकसेवा कर’ असा आदेश दिला. त्याप्रमाणे महाराज तिथून बाहेर पडले. पुन्हा भ्रमंती सुरु झाली. वेळोवेळी मिळणाऱ्या दृष्टांतानुसार महाराजांनी संपूर्ण महाराष्ट्रात तसेच भारतातल्या विविध प्रांतात लोक सेवा कार्यासाठी दुःखी पीडीतांच्या सेवेसाठी भटकंती केली. त्यांनी वाडी आणि गाणगापूर श्री दत्तक्षेत्रात तपश्चर्या केली. जपजाप्य, भजन, पूजन, अन्नदान हे आयुष्यभर व्रत म्हणून स्वीकारले. यानंतर महाराज नृसिंह वाडीला आले. तिथे गुरुचरित्राची पारायणे व साधना केली. त्याच्या भक्तीला फळ येऊन दत्तगुरुचा साक्षात्कार झाला व तेथून ते एका डोंगरावर जाऊन तपश्चर्येला बसले. पुढे पुन्हः दृष्टान्त होऊन ‘तू सज्जनगडावर जा, तेथे तुझे काम आहे’ असा संदेश मिळाला. नृसिंहवाडी येथे त्यांची पू. श्री. भगवान श्रीधर स्वामींची भेट झाली. अंतरीची खुण पटली आणि अष्टेकर महाराज भगवान श्रीधर स्वामींच्या सेवेसाठी सज्जनगडावर गेले आणि तिथे स्वामी सेवेचे कार्य सुरु झाले.

सज्जनगडावर पू. श्री. भगवान श्रीधर स्वामींच्या सेवेत महाराजांनी अनेक वर्षे घालवली. भगवान श्रीधर स्वामींची सेवा म्हणजेच पू. श्री. रामरायाची सेवा अशी त्यांची धारणा होती. भगवान श्रीधर स्वामींना गडावर भेटण्यासाठी आलेल्या लोकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याची, त्यांचे शंका निरसन करून त्यांना मार्गदर्शन करण्याचे काम अष्टेकर महाराज नम्रपणे करीत असत.

समोरील माणसाच्या घराण्याचा इतिहास त्यांची कुलदेवता, कुलदैवत, मागील तीन पिढ्यांचा इतिहास, घराण्यात राहून केलेला कुलाचार, नवस, घडलेल्या चुका सर्व काही सांगून त्या व्यक्तिला योग्य ते मार्गदर्शन करीत. अष्टेकर महाराजांना वाचासिद्धी होती. तसेच भूत, भविष्य, वर्तमानाचे पूर्ण ज्ञान होते. ते जन्मसिद्ध अवतारी पुरुष होते. समोरील व्यक्ती त्यांचे बोलणे ऐकून आश्चर्यचकित होत. आपल्याला सन्मार्ग दाखविल्याबद्दल त्यांना नमस्कार करण्यासाठी पुढे होत तेव्हा महाराज, त्या व्यक्तींना भगवान श्री. श्रीधर स्वामींना नमस्कार करायला सांगून त्यांचा आशीर्वाद व अक्षता घेण्यास सांगत. एवढे ते भगवान श्रीधर स्वामींच्या चरणी लीन होते.
अनेक आर्त भक्तांची कामे अष्टेकर महाराजांनी चुटकी सरशी केली आहेत. त्यांच्या दर्शनासाठी सदैव गर्दी असे. महाराजांनी आजन्म ब्रह्मचर्य व्रताचे पालन केले. स्त्रीला ते मातेसमान मानत. लहानपणापासून परमेश्वर भक्तीत, रामनाम जपात लीन असणाऱ्या महाराजांवर परमेश्वराची अखंड कृपा होती. संपूर्ण महाराष्ट्रभर महाराजांनी अनेक तीर्थयात्रा केल्या. करणी, भूत पिशाच्च बाधा उतरवण्यात महाराजांचा हातखंडा होता. अनेक बाधितांना त्यांनी आपली सर्व शक्तीपणाला लावून या बाधेतून मुक्त केले. त्यांना जीवनदान दिले. बेळगावला महाराजांचे खूप वास्तव्य होते. तिथेही त्यांचे शेकडो भक्त असून महाराजांचे कार्य त्या शिष्य मंडळींनी पुढे चालू ठेवले आहे.

सुप्रसिद्ध मराठी गीतकार, ‘जगदीश खेबूडकर’ यांच्या मातोश्रींची असाध्य रोगातून महाराजांनी व भगवान श्रीधर स्वामींनी मुक्तता केली. तेव्हापासून खेबुडकरांच्या आई व सौभाग्यवती महाराजांच्या नि:स्सीम भक्त झाल्या.

महाराजांनी आपल्या ऊभ्या आयुष्यात कधी द्रव्य संचय केला नाही. ब्रह्मचर्य व्रताचे निष्ठेने पालन केले. श्रीगणेश सहस्त्रावर्तन, लघु व महारुद्र, अन्नदान, वस्त्रज्ञान, संतसंग यांना विशेष महत्त्व देऊन तीर्थक्षेत्री सतत भ्रमण व वास्तव्य केले. महाराज उंचपुरे धिप्पाड व तगड्या शरीरीचे होते. देहाप्रमाणेच त्यांचा आवाजही खणखणीत होता. गडावरील मोठे अवजड दगड आपल्या दोन ढोपरांमध्ये घेऊन सहजासहजी उडवीत, की जे दगड चार चार जणांनाही सहज उचलता येणार नाहीत इतकी महाराजांच्या अंगात ताकत होती. जे काही करायचं ते रग्गड, थोड थोडंक नाही. भरपेट हा त्यांचा खास शब्द, खाणपिणं, काम, साधना, सर्व काही भरपेट व्हावे अशी त्यांची इच्छा असे. मानवी देहाची इतिकर्तव्यता परमेश्वर प्राप्तीमध्ये असते परंतु परमेश्वर प्राप्ती, सहजासहजी होत नाही त्यासाठी खडतर साधना करावी लागते. प्रखर उपासना, शुद्ध आचरण, परमेश्वरावर निष्ठा आणि मनात सदैव प्रेमभाव, दयावृत्ती असावी लागते. ज्याला जी देवता आवडते त्या देवाची वा देवतेची उपासना त्याने करावी. श्रद्धा, भक्ती, प्रेम व निष्ठा या चतु:सुत्रीच्या बळाने ईश्वर प्राप्ती करून घेऊन या नर देहाचे सार्थक करावे असा मोलाचा उपदेश महाराजांनी आयुष्यभर केला.
प्रत्यक्ष दत्तप्रभू प्रसन्न व्हावेत त्यांची आपल्यावर कृपा व्हावी म्हणून ब्रह्मचारी राहून गाणगापूर येथे श्री अष्टेकर महाराजांनी उग्र तपश्चर्या केली. खडतर साधना केली आणि प्रत्यक्ष दत्तात्रेयांच्या या श्री क्षेत्री साक्षात दत्तगुरूंची प्राप्ती करून घेतली. सिद्धी प्राप्त करून घेतल्या अन् त्यांचा वापर स्वत:च्या स्वार्थासाठी न करता सर्व सामान्य प्रापंचिक भाविकांसाठी केला. महाराजांनी आपल्या हयातीत, अनेक यज्ञयाग केले. गाणगापूर, बद्रीनाथ, केदारनाथ, औदंबर, कोल्हापूर, पुणे, नृसिंहवाडी, सज्जनगड अशा अनेक ठिकाणी तीर्थाटन करून, अनुष्ठाने केली. खिडकाळी येथे आपल्या हयातीत अनेक लघुरुद्र करून हजारो लोकांना अन्नदान केले. दानात दान अन्नदान. स्वतः अत्यंत कमी आहार घेत परंतु इतरांना मात्र भरपेट जेवू घालत. श्रीराम नामाचा जप अखंडपणे चालू असे. त्यांच्या छातीवर डोके ठेऊन अनेक लोकांनी ‘श्रीराम’ ‘श्रीराम’ असा ध्वनी आपल्या कानांनी ऐकला होता. जसा हनुमंत राममय झाला होता तसेच महाराजही श्रीराम स्वरुप झाले होते.

महाराजांचा पदस्पर्श झाला नाही असे क्षेत्र नाही. जेथे ते जात तेथे त्यांना कोणी ओळखत नाही असे होत नसे. त्र्यंबकेश्वर, नाशिक, टिटवाळा, गणपतीपुळे, खडकेश्वर, पाली इत्यादी ठिकाणी महाराज ज्यावेळी तीर्थयात्रेसाठी जात त्यावेळी महाराजांसोबत या क्षेत्री जाणे म्हणजे भक्तांच्या दृष्टीने पर्वणीच असे. महापूजेसाठी घागरीच्या घागरी उसाचा रस तर आंब्याच्या दिवसात शेकडो आंब्यांचा रस, केळी, श्रीखंडाचा चंदनाचा लेप, उत्तमोत्तम सुगंधी फुले, अत्तरांचा लेप, दूध, दही, तूप, मध, साखर यांची रेलचेल असे. हे सारे पूजा साहित्य पाहून उपस्थित भाविकांच्या नेत्रांचे पारणे फिटायचे. अशी ऐश्वर्य संपन्न पूजा आजच्या काळात खरोखरच दुर्लभ. ब्राह्मणांना भरपर दक्षिणा, उत्तम सुग्रास भोजन, वीडासुपारी, धोतरजोडी, उपरणे अशी वस्त्र प्रावरणे सर्व देवून तृप्त करीत. पूजेत जरा देखील चुकारपणा आळस त्यांना चालत नसे.

चेंबुर येथील गुरुप्रसाद या श्री. के अ करंबेळकर (महाराजांचा तात्या) यांचा निवासस्थानी महाराजांचे काही काळ वास्तव्य होते. श्री. करंबेळकरांनी महाराजांबरोबर अनेक ठिकाणी प्रवास केला. गोंदवल्याला गेले असताना महाराजांच्या भेटीसाठी असंख्य भावीकांनी गर्दी केली. तेथून महाराजांनी फलटण येथील ज्ञानेश्वर मंदीर पासून पू गोविंदाकाका उपळेकर महाराजांचीही भेट घेतली. महाराज पू. श्री. काका महाराज पुराणिक यांच्या राजापूर जवळील धोपेश्वर या गावीही महाराजांनी अनेक जणांची संकटे दूर केली.

आपले गुरु पू. भगवान श्री. श्रीधर स्वामींच्या निर्याणाची वार्ता कानी येताच, श्री. करंबळेकर व श्री. पुनाळेकरा सोबत तातडीने महाराज वरदहळ्ळीला निघाले. चोवीस तासाचा खडतर प्रवास करून सर्व जण तिथे पोहोचले. परंतु भगवान श्रीधर स्वामींच्या पार्थीवाचे दर्शन झाले नाही. दुर्दैवाने सर्व विधी नुकतेच आटपून समाधीस्थानी पादुका ठेवल्या होत्या, सर्वांनी पादुकांवर मस्तक ठेऊन वंदन केले. परंतु अष्टेकर महाराजाना गुरुवियोग असह्य झाला ते तसेच परत फिरले व खाली देवीच्या देवळात मुक्कामाला राहिले. परत येताना गोकर्ण महाबळेश्वर येथे अभिषेक, पूजा-अर्चा, अन्न संतर्पण, ब्राह्मणभोजन करून मनावरील दडपण कमी झाले. गुरुप्रेमाचा आणि गुरुवियोगाचा हा प्रसंग सांगतांना श्री. करंबेळकर यांचे नेत्र आजही पाणावतात. महाराजांच्या वास्तव्यात श्री. दादा महाराज उत्तेकर (म. पीरवाडी-सातारा), राष्ट्रसंत पू. श्री. पाचलेगावकर महाराज, गाणगापूरचे गायत्री उपासक श्री. दंडवते महाराज, इंदूरचे श्री नाना महाराज तराणेकर, पू. श्री. भक्तराज महाराज अशा अनेक संतांची पायधूळ करबेळकर यांचे घरास लागली. ही सर्व श्रेष्ठ संत मंडळी अष्टेकर महाराजांच्या भेटीस येऊन गेली होती..

तुळजापर मंदीरात दर्शनासाठी गेले असता. तेथील पूजाऱ्याने “वेळ झाली आता दरवाजा बंद झाला” असे सांगून महाराजांना देवीच्या दर्शनासाठी नकार दिला. महाराजांनी देवीची करुणा भाकली. मंदीराचे दार उघडून साक्षात तुळजाभवांनीने महाराजांचा हात आपल्या गळ्यात घेतला व महाराजांना दर्शन दिले. पंढरपूर येथे पांडुरंगाच्या गाभार्यात पुजा करण्यास बडव्यांनी नकार दिला. त्यावेळी सर्व बडवे मंडळींच्या चांगले व वाईट गोष्टींचा पाढा वाचून महाराजांनी त्यांचे पितळ उघडे केले. त्यासरशी त्यांचे त्रिकालज्ञानी स्वरुप ओळखून साऱ्यांनी त्यांची क्षमा मागीतली आणि पूजेसाठी मंदिराचा गाभारा मोकळा करून दिला. आयुष्याच्या अखेरची पाच वर्षे श्री. अष्टेकर महाराजांचे वास्तव्य डोबिवली येथे सौ. शुभदा आणि रमेश जावकर यांचे घरी होते. वृध्दावस्था म्हणजे दुसरी बाल्यावस्था. शुभदा ताईनी पोटच्या मुलाप्रमाणे अत्यंत मनोभावे सेवा-सुश्रुषा करून महाराजांची पूर्ण कृपा संपादन केली. महाराज त्यांना आई म्हणत. २६ मे १९७९ रोजी जावकरांच्या निवासस्थानातच पू. अष्टेकर महाराजांचे महानिर्वाण झाले.

लेखिका – सौ. नम्रता भट.
हृद्य स्मृति.

श्री सद्गुरू अष्टेकर महाराज पुण्यामध्ये श्री. शेवाळे यांच्या वाड्यात शक्रवार पेठेत बरेच वर्षे रहात होते. आम्हीही तिथेच १०-१२ मिनिटांच्या अंतरावर भाड्याच्या खोलीत राहात होतो. महाराज व त्यांचे बंधू एका लहानशा खोलीत अंदाजे १०x१० राहात. रात्री झोपायला मंडईत गाळ्यावर किंवा एखाद्या शिष्याकडे जात. पण तेवढ्या लहानशा खोलीत ही महाराजांचा देव्हारा मोठा होता देवही खूप होते.

श्री. शेवाळे यांच्या वाड्यात महाराज राहात असताना मी जवळ जवळ रोज महाराजांकडे जात असे. त्यावेळी मला डोकेदुखी व सर्दीचा खूपच त्रास होत असे. अनेक तऱ्हेची फुले व इतर पूजेची तयारी करून महाराज ११ च्या सुमारास पूजेला बसत. पूजा तासन् तास – सायंकाळी ६ पर्यंत चाले. मी ऑफीस सुटल्यावर व इतर सुट्टीच्या दिवशी तास १॥ तास बसून राही. पूजा बघताना मन शांत होई. लोकांची ये-जा सारखी चालूच असे. जागा लहान होती तरीही महाराजांनी कधी कोणाचा तिटकारा केला नाही. पूजा संपल्यावर सायंकाळी ६-७ च्या सुमारास महाराज तीर्थाने प्रोक्षण करीत त्यामुळे मन अगदी शात होई.

एकदा मला सर्दी व भयानक डोकेदुखी सुरु झाली. महाराजांनी १५-२० मिनिटांच्या अंतराने दोन वेळा तीर्थ प्रोक्षण केले. तरी डोकेदुखी थांबली नाही. तेव्हा महाराजांनी गाणगापूरचे भस्म घेऊन भस्माने प्रोक्षण केले. डोकेदखी एकदम थांबली व डोके शांत झाले. महाराजांनी आशीर्वाद दिला व मी घरी आलो. एकदम शौचाला लागली. एक मोठा जंत पडून गेला व शांत झोप लागली. एकदा श्री शेवाळे यांच्या वाड्यात असताना दोन गृहस्थ आले. त्यापैकी एकाने दीर्घकाळ साधना करूनही त्याला श्री ज्ञानेश्वरांचे दर्शन झाले नव्हते. महाराजांनी, त्याची इच्छा ओळखून, त्याच्या उजव्या पायाच्या आंगठ्यावर आपल्या पायाचा आंगठा ठेवून त्याची कुंडलिनी जागृत केली व त्याला श्री ज्ञानेश्वर महाराजांचे दर्शन दिले. नंतर त्याची समाधी उतरविली. त्याने महाराजांना साष्टांग नमस्कार घातला. ते गृहस्थ घामाने ओलेचिंब झाले होते. त्यांनी सांगितले, “मी अनेक उपवास करून ज्ञानेश्वरीची कितीतरी पारायणे केली. अनेक साधु-संतांना भेटलो पण इच्छा पूर्ण झाली नाही. आज मात्र इच्छा पूर्ण होऊन मनाचे समाधान झाले. महाराज म्हणाले, “गुरु भेटावा लागतो, शिष्यालाही योग्यता यावी लागते.”

१९५४-५५ सालची ही गोष्ट. काही घरगुती व इतर त्रासामुळे मन अगदी अस्थिर होते. महाराज म्हणाले, राम टेकीडीला येतोस कां? मी होकार दिला. आम्ही दोघे राम टेकडीला गेलो. त्याला उदासीन गड म्हणत. तेथे एक शिख साधू राहात. नेहमी मौनात असत. त्यांचा शिष्य वर्गही मोठा होता. लोक आपापल्या अडचणी सांगत व तो एक अंगाऱ्याची पुडी देई. वेळ सायंकाळी ६-७ ची होती. आम्ही तेथे गेलो तेव्हा सभोताली गर्दी बरीच असल्यामुळे महाराज खाली बसू लागले. तो काय आश्चर्य? त्या साधूची दृष्टी महाराजांकडे गेली. त्याने लगेच हाताने खूण करून, महाराजांना जवळ बोलावले. दोघेही अत्यंत मोकळेपणाने हसले. महाराजांनी श्री दत्तात्रेयांचे स्मरण करून दर्शन घेतले. त्याने महाराजांना एक अंगाऱ्याची पुडी दिली. नंतर श्री शंकराचे दर्शन घेऊन आम्ही घरी आलो.

१९५८ साली महाराजांनी त्यांच्या शिष्यांना सज्जनगडावर नेले व भगवान श्रीधर स्वामीजींचे दर्शन घडविले. त्यावेळी यात्रेचे दिवस होते. भगवान श्रीधर स्वामीजींच्या दर्शनास मोठी लाईन असायची. अनेक लोकांची दुःखे व अडचणी समजून घेऊन त्यावर स्वामीजी उपाय सांगत, आशीर्वाद देत. रात्री १-१॥ वाजायचा. फारच रात्र झाली तर स्वामीजी अष्टेकर महाराजांना बोलावून आणण्यास सांगत, व ‘पुढे तू बघ’ असे सांगत. त्यावर महाराज म्हणत “तुम्ही गुरु आहात तेव्हा तम्हीच लोकांना सांगा” तेव्हा स्वामीजी श्री अष्टेकर महाराजांना आज्ञा देत व महाराज पुढील कार्य करीत. त्यामुळे श्री स्वामीजींना थोडी विश्रांती मिळे. भगवान श्रीधर स्वामीजींकडे महाराजांचे फार वजन होते व भगवान श्रीधर स्वामीजी महाराजांना फार मानीत. पुण्यामध्ये महाराजांचा सहवास लाभून अनेक लोक कृतार्थ झालेले आहेत. काही शिष्य आज दुर्दैवाने हयात नाहीत. काही शिष्य वार्धक्याचे जीवन, महाराजांनी दिलेले आशीर्वाद हृदयाशी बाळगून व महाराजांनी दाखविलेल्या मार्गाने उपासना चालवित, जीवन कंठीत आहेत. श्री सद्गुरु ज्याला जो मंत्र व ग्रंथ देत त्यात त्याचे सामर्थ्य व उपदेशाचे सार भरलेले असे. त्यावेळी या गोष्टीची जाणीव त्या शिष्याला असेलच असे नाही. परंतू कालांतराने जशी प्रगती होते तशी याची प्रचिती मात्र येते. मग आपले अंत:करण शुद्ध व स्वच्छ असेल तर सद्गुरुरुपी परब्रह्माचा ठसा आपल्या मनावर जशाच्या तसा उमटल्या शिवाय रहात नाही. याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे सौ. शुभदाताई जावकर. डोंबिवलीस महाराज असताना व नंतरही सौ. जावकर ताई व श्री. शिखरे गुरुजी सेवा करीत. वार्धक्याच्या अत्यंत कठीण काळात सौ. ताईनी महाराजांची जी सेवा केली त्यामुळे आम्ही तेथे नत-मस्तक होतो व महाराजांची कृपा भाकतो. कारण तेथे गुरुतत्त्व ओतप्रत भरलेले आहे. पू. श्री अष्टेकर महाराजांचे दीर्घ चरित्र, ‘सकल संत चरित्र गाथा’ १९९८ भाग १ मध्ये प्रकाशित झाले आहे. वाचकांनी ते अवश्य वाचावे ही नम्र विनंती.

लेखक – श्री. वि.ना. गोखले.
खोली नं.९०, फुले नगर,
आळंदी रोड, येरवडा, पुणे