श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य सदगुरू भगवान श्री श्रीधर स्वामी महाराज विरचीत संस्कृत श्री गुरुदत्तात्रेयाष्टकम् स्तोत्राचा मराठी पद्यबद्ध स्वैर भावानुवाद –
श्री गुरुदत्तात्रेयाष्टकम्
(रचना - श्री श्रीपाद केळकर,कल्याण,मुंबई)
(विशेष आभार - श्री श्रीधर बळवंत दीक्षित,पुणे)

सत्य असो वा असत्य जग हे,देह मीच वा नच मी।
एकच मी,ना दुजा,प्रकट वा नाना रूपामधि मी।।
स्पर्शी माया मुळि न अविद्या,विशुद्ध मति जे असती।
सद्गुरु दत्तात्रेया करि तू नम्र मनाने प्रणती..
तेच तुला जे इष्ट जगी या सदैव वर बहु देती।।१।।

त्रयमूर्तींचे विशुद्ध पद जे मायारहित सुविमल।
देण्या चित्सुख परम श्रेष्ठसे, निशिदिनि भक्तां सकल।।
प्रकट करिति जे,ब्रह्मात्मैक्या वितरित,त्रिमुखी भ्रमती।
सद्गुरु दत्तात्रेया करि तू नम्र मनाने प्रणती…
तेच तुला जे इष्ट जगी या सदैव वर बहु देती।।२।।

पुत्रेच्छेने कठोर तप ते आचरिता अत्रींनी
स्वतःस दिधले भक्तीवश त्या प्रेमकृपेने ज्यांनी
स्वये सुखनिधी करुणासागर प्रकट परात्मा असती
सद्गुरु दत्तात्रेया करि तू नम्र मनाने प्रणती…
तेच तुला जे इष्ट जगी या सदैव वर बहु देती।।३।।

व्यापक,शाश्वत,अक्षर ऐसे परब्रह्म जे असती।
श्रेष्ठ,सत्य जे अदेहसंभव बंधहीनही असती।।
वेदवंद्य जे सगुण होउनी मुक्ति स्वभक्तां देती।
सद्गुरु दत्तात्रेया करि तू नम्र मनाने प्रणती…
तेच तुला जे इष्ट जगी या सदैव वर बहु देती।।४।।

ना दानांनी वा भोगांनी वा यागे वश होती।
शास्त्रपाठ ना योगसाधने,कर्मे जिंकू शकती।।
एकच साधन करावया वश, कलियुगि केवळ,भक्ती!
सद्गुरु दत्तात्रेया करि तू नम्र मनाने प्रणती..
तेच तुला जे इष्ट जगी या सदैव वर बहु देती।।५।।

चराचर नसे जगही जेथे,नसे अविद्या माया।
पिंड नसे,ब्रह्मांडहि नसते.. सुटणे धरणे काया।।
करुणासागर,भवभंगक्षम,मुनींस वंद्यचि असती।
सद्गुरु दत्तात्रेया करि तू नम्र मनाने प्रणती…
तेच तुला जे इष्ट जगी या सदैव वर बहु देती।।६।।

केवळ स्मरणाने जे होती स्वमनी नित संतुष्ट।
विषयविषांचे बंधहि करिती ज्ञान देउनी नष्ट।
भवसागर हा तरून जाण्या जगी सेतु जे होती।
सद्गुरु दत्तात्रेया करि तू नम्र मनाने प्रणती…
तेच तुला जे इष्ट जगी या सदैव
वर बहु देती।।७।।

नुरे अविद्या,माया किंवा ईश-जीव हा भेद।
राही नच जग,तनु नच,मनि ना जन्ममृत्युचा खेद।।
स्त्रीपुरुषांची नुरे भिन्नता,समूळ जाती विकृती।
सद्गुरु दत्तात्रेया करि तू नम्र मनाने प्रणती..
तेच तुला जे इष्ट जगी या सदैव वर बहु देती।।८।।