DNAAN YOG

१. परमार्थ

परमार्थ ह्या विषयावर आज मी चार शब्द सांगणार आहे. संसारी मनुष्यासच परमार्थाची विशेषेकरून जास्त आवश्यकता आहे. परमार्थ साधण्यासाठी जास्त प्रयत्न करणे अगत्याचे आहे . ‘सत्संगोहिभेषजम् ।’ भवरोग, संसाररूपी व्याधी नष्ट करण्यासाठी एकमेव उपाय म्हणजेच सत्संगति. ‘सत्संगतिरेवात्र कारणं प्रथमम् ।’ ह्यासाठी पहिले सुलभ साधन आपणांस माहीत असल्यास त्या अनुरोधाने संसाररूपी रोग नष्ट करता येईल. ते पहिले साधन म्हणजे ‘सत्सहवासच’. त्याखेरीज इतर कोणतेही साधन नाही. ‘मुक्तिःसम्पाद्यते राम दृढा ।’ ह्या सत्संगतीने मुक्ति प्राप्त होते. हा भवसागर तरून जाण्यास योग्य नाव म्हणजेच सत्संग. भागवतामध्ये असे म्हटले आहे की, ‘नृदेहमाद्यं सुलभं सुदुर्लभं प्लवं सुकल्पं गुरुकर्णधारम् । मयानुकूलेन नभस्वतेरितं पुमान्भवाब्धिं न तरेत्स आत्महा।।’ (भाग स्कंध११) हा नरदेह दुर्लभ आहे. पशूप्रमाणे त्या देहावर विषयसुखासाठी प्रेम करणे म्हणजे नरकमार्गाप्रत जाणेच. म्हणून विषयसुखाच्या लालसेसाठी देहास महत्त्व देऊ नये. विषयसुखकामनेसाठी देहप्रीति, ही पारमार्थिक सुखाच्या दृष्टीने निषिद्ध आहे. म्हणून ह्या देहाचा गौरव किंवा प्रेम निंद्यच. मानवी देह विषयसुखाचे साधन नसून तो परमार्थासाठीच उत्पन्न झाला आहे. ह्यासाठी त्याचा उपयोग पारमार्थिक सुखाचे साधन म्हणून केला पाहिजे. विषय तर सर्व ठिकाणी आहेतच. त्यासाठी नरदेहाचीच आवश्यकता आहे असे नाही. अशन, पिपासा वगैरे पशुंनाही आहे. परंतु गुरुकृपेच्या आधाराने भगवंताची कृपा संपादून ह्या संसारजालातून मुक्त होणे हेच नरदेहाचे वैशिष्ट्य आहे. श्रीमद्भागवतात असे म्हटले आहे की, हा देह संसारसमुद्र पार करणारी सुंदर अशी नाव आहे. ही नाव चालविणारे नावाडी सद्गुरूच होत. ही नाव योग्यरीतीने परतीरास नेण्यास सद्गुरूंची कृपा अत्यावश्यक आहे. सद्गुरूपेक्षा इतर कोणीही ह्या ब्रह्मांडात आपला हितचिंतक नाही. तत्त्व समजवून सांगणारा गुरूच. सद्गुरूंच्या सान्निध्याने व मार्गदर्शनाने हा संसारसागर पार होणे हे आपले कर्तव्य. आपल्या हितासाठी चिर सुखाची इच्छा धरून त्याप्रीत्यर्थ प्रयत्न न केल्यास देवानुग्रह दुर्लभच.

‘दुर्लभं त्रयमेवैतद्देवानुग्रहहेतुकम् । मनुष्यत्वं मुमुक्षत्वं महापुरूषसंश्रयः।।

जगांत दुर्लभ अशा तीन गोष्टी आहेत. केवळ मनुष्य जन्मास आला म्हणून कोणीही मुक्त होत नाही. उलट पशुवृत्तीने आयुष्य घालविल्यास तो दुःखपरंपरेच्या गर्तेतच सापडतो. ज्याला विषयसुख क्षणभंगुर वाटते, खया सुखाची ज्याला कल्पना असून विषयसुख नरकाचा मार्ग वाटतो अशा मनुष्याने योग्य असे धर्माचरण करून ह्याच जन्मी जीवनसाफल्य प्राप्त करून घेतल्यास त्यास पुनर्जन्माची शिदोरी प्राप्त होत नाही. ह्याच जन्मी ह्याच देही परमात्म्याची कृपा संपादन करून त्या सुखात विलीन होऊन, एकरूप होऊन जीवनमुक्त व्हावे असे ध्येय संपादणे हेच मनुष्य जन्माचे इतिकर्तव्य. ह्या उलट वागणे म्हणजे पशुवृत्ति किंवा राक्षसीवृत्तीच म्हणावी लागेल.

ह्या दृष्टीने विचार केल्यास मानव जीवनसाफल्य म्हणजे निर्विषय सुखप्राप्तीच. त्यासाठी जन्म घेतल्यापासून मृत्यू प्राप्त होईपर्यंत आपल्या शक्तीप्रमाणे प्रयत्नशील असले पाहिजे. सर्व जन्म घालविला तरीहि विषयसुखाने मनुष्य सुखी होतो असे कोणीही सांगू शकत नाही. खारट पाणी पिल्याने तहान भागल्याचे कोणी पाहिले आहे काय ? विषयसुखाने असमाधानच होते. पण त्या सुखाची चटक नाहीशी होत नाही. निरनिराळ्या साधनांमुळेहि सुखप्राप्ती होत नाही; असा विचित्र अनुभव संसारात पदोपदी येत असतो. म्हणून मानवास संसारापेक्षा दुसरा कोणीही शत्रु नाही. ह्या नरदेहात खरे सुख कोणते ? त्या सुखाने कोणती प्राप्ती होते ? त्याचे सत्यस्वरूप काय, हे सर्व समजावून घेण्यासाठीच हा नरदेह आहे. विषयापासून मिळणारे सुख हे खरे सुख आहे काय ? हा मानवजन्म कसा मिळतो ? जन्ममरणाच्या तडाख्यातून सुटण्यास काय केले पाहिजे ? ह्या सर्व गोष्टींचा विचार करणे हे मानवी जन्माचे आद्य कर्तव्य होय. परमात्मा जगनिर्मिती करून त्यातच लपून बसला आहे. जग हा एक खेळ आहे. त्यात नाना प्रकारचे जिन्नस उत्पन्न करून पशु, पक्षी, देव, गंधर्व, मानव अशा अनेक योनी निर्माण करून ह्यांपैकी आपणांस कोण शोधतो? हे समजून घेण्यासाठीच परमात्म्याने निर्मिलेला हा खेळ आहे. अनेक प्राण्यांची निर्मिती करून मग मनुष्य देह निर्माण झाला. आपले स्वरूप मनुष्य देहातच प्रगट होऊ शकते हे पाहून परमात्म्यास फारच आनंद झाला. ‘आत्ममयो ह्ययं पुरूषः ।’ आपल्यातच हे जग कल्पून संकल्परूपी पडद्यावर परमात्म्याचे हे जगच्चित्र रंगविले आहे. परमात्माच पडदा, चित्र, रंग, चित्रकार व पाहणारा आहे. म्हणजे सर्व कांही तोच आहे. व्यवहारदृष्ट्या ह्या सर्व गोष्टी निरनिराळ्या दिसतात. एखादा कादंबरीकार कादंबरी लिहितो त्यावेळी तो कादंबरीकारच निरनिराळ्या पात्रांच्या भूमिकांमधून स्वतःस गुरफटवितो. त्या कादंबरीत वर्णन केलेले उद्यान, सृष्टिसौंदर्य सुखदुःखे व ती अनुभवणारा तो लेखकच असतो. ह्या कल्पनेप्रमाणे कादंबरीकार प्रत्यक्षात नसलेले सत्यरूपात चित्रित करतो, त्याप्रमाणेच परमात्मा संकल्पाने सर्व निर्माण करून शेवटी मनुष्य-देह निर्मून त्यात आपले स्वरूप पहातो, आपले रूप म्हणजेच मानवरूप असे समजतो. परमात्मा हेच मानव देहाचे वैशिष्ट्य. मानवदेह व परमात्मा ह्यांचे संबंध कोणते ? ह्या देहात खऱ्या सुखाची प्राप्त कशी होऊ शकते ? असा विचार करणे हेच मानवबुद्धीचे योग्य काम. मानवीजन्मात रूढ अशी जी विषयसुखे आहेत त्यांत खऱ्या सुखाची प्राप्ती होत नसल्याकारणाने त्या खऱ्या सुखप्राप्तीसाठीच जीवनधारा वाहवणे हेच जन्माचे सार्थक होय. परमात्मप्राप्तीसाठीच आपले जीवन घालविणे ह्यालाच ‘परमार्थ’ असे म्हणतात. द्रव्यामुळे सुखप्राप्ती होत नाही. ह्यासाठी ‘अर्थमनर्थ भावय नित्यम्, नास्ति ततः सुखले शः सत्यम्’ असं श्रीमद्भगवत्पादानी म्हटले आहे. ह्या सुप्त धनामध्ये आपले मन गुंतवून, त्यात आसक्त होऊन आपला मेंदू बिघडवू नये. म्हणजेच ह्या क्षणिक सुखासाठी हा नरदेह वाया घालवू नये.

चित्रामधील जलाभासाने तहान शमत नाही. चित्रात पाणी दिसते. ते पिऊन कोणीतरी तृप्त झाला आहे काय ? दुसरे उदाहरण

मृगजलाचे देता येईल. मृगजलाकडे हरीण पाण्याच्या आशेने धावत सुटते. पण ते जसजसे जवळ जाते तसतसे मृगजलही दूर दूर भासत असते. मृग सारखा पळत असतो व खूप धावपळ करूनहि त्यास पाणी मिळत नाही व तहानेने व्याकुळ होऊन मरण ओढवण्याचीहि शक्यता असते. अशीच विषयी माणसाची गती ठरलेली आहे..

प्रथम मुलांचे उपनयन, मग लग्न, मग मुलींची लग्ने नंतर नातवंडांची उपनयने, लग्ने व हे संपल्यानंतर सर्वसंगपरित्याग करू असे मानव मनात ठरवितो. मुलींची लग्ने होतात, मग नातवंडे होतात व हे सर्व होऊन काही वर्षे लोटून गेली तरी त्यांचे पुढील संस्कार पहावेत ही आशा कायमच असते. ह्याप्रकारे विषयी जनांची आशा दिवसेंदिवस वाढत असते. आशारूपी अग्नि सर्वभक्षक आहे. संसारात सर्व काही ठाकठीक करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तो पूर्ण होत नाही. शेवटी मनुष्याचे आयुष्य संपते व अपेक्षा नसतानाहि त्यास यमराजाचे पाहुणे व्हावे लागते. पण वासना शिल्लक राहाते व तीमुळे त्याचे ‘पुनरपि जननं पुनरपि मरणम् ।’ हे चालूच राहाते.

संसार हे एक घड्याळ किंवा रहाटगाडगे आहे. मात्र निसर्गाचे वैचित्र्य पहाण्यासारखे आहे. तारुण्यात विशेष आशा नसते पण तीच वृद्धपणी वृद्धिंगत होते. नातवंडांनी शिव्या दिल्या तरी आपला प्रपंच कसा चालेल ह्याच चिंतेत तो मग्न राहातो आणि हीच वासना पुनर्जन्मास कारणीभूत असते. वासना नाहीशी झाल्यास जन्मप्राप्तीही नाहीच. परंतु निसर्ग, म्हातारपणीच जास्त आशा उत्पन्न करीत असतो. वैषयिक जीवनात सुख-समाधान नाही, कारण विषयसुखे समाधानकारी नाहीत. खरे सुख किंवा समाधान परमात्मकृपेनेच मिळते अन्यथा मिळत नाही. विषयनिवृत्तीत खरे सुख आहे. निरनिराळ्या त-हेने आपल्या जीवनात अनुभवास येणाऱ्या वासना नष्ट करण्यासाठी बुद्धीचा वापर करण्याचे भाग्य आपणास आपोआप प्राप्त होईल. इंद्रिये हा एक घोडा आहे अशी कल्पना केल्यास बुद्धी हा घोडेस्वार व मन हे लगाम आहे. घोडेस्वाराकडून लगाम नीटपणे वापरला गेल्यास घोडा इकडे तिकडे जाऊ शकणार नाही. देहरूपी रथास विवेक हा सारथी आहे. बरे वाईट कोणते ? प्रसंगोपात्त काय करावयाचे? हे ठरविणे विवेकाचे काम आहे. योग्यायोग्य ठरविणारी बुद्धी म्हणजेच विवेक. हा नरदेह परमात्म प्राप्तीसाठीच आहे असे निश्चितपणे समजून गुरुमुखाने सांगितलेली सत्कर्मे, सदुद्देश ह्यांचे विचार दृढ करीत करीत आत्मसुख मिळविणे हाच नरदेहाचा आदर्श असून हेच नरदेह साफल्य. बाकी इतर सर्व ठिकाणी अशांती, असमाधान, द्रव्याचा मोह व त्याचे दुष्परिणाम यांचे निरीक्षण करणारे काही उत्तर प्रदेशीय साधु मला भेटले होते. त्यांच्या तोंडी नेहमी उद्धेगाची भाषा असावयाची. मी त्यांना ‘असे का?’ असे विचारले असता त्यांनी, ‘स्वामी, अन्नाप्रमाणे मनुष्याची बुद्धी होते. कारण आमच्या छत्रासाठी जो पैसा येतो तो सर्व मारवाडी लोककांकडून येतो. मारवाडी लोक पैशाच्या थैल्या उरावर घेऊन प्राण सोडतात व त्यांच्या पैशांनीच आमची छत्रे चालतात. त्या छत्रातील अन्न आम्ही खात असल्यानेच आमची मने अशांत आहेत.’ असे उत्तर दिले.

पैशाचा मोह मरणापर्यंत आवरता येत नाही. मरणाच्या वेळीही पैशाकडे पहाण्याचा मोह होतोच. परंतु तो पैसा आपल्या बरोबर येऊ शकत नाही असा विचार मात्र त्यावेळी येत नाही. अशा स्थितीत कोणतेहि तप साधणे शक्य नाही. अनुष्ठानासाठी योग्य व परिपूर्ण असा वेळ जीवनात मिळू शकतो काय ? थोडेसे स्वास्थ्य मिळताच कोर्ट, कचेरी, व्यवहार इत्यादींचे विचार मनात येतात. ज्यावेळी जीवनसमस्याच बिकट होते त्यावेळी संसारत्याग कसा शक्य होणार ? असा प्रश्न निर्माण झाला असता शास्त्र ‘दान’ हा मार्ग सुचविते. दानामुळे भगवतकृपा होऊ शकते. देवपूजेसाठी द्रव्य खर्चणे, गरजूंना दानधर्म करणे हे सर्व भगवत्कृपेसाठीच. एकंदरीत कोणत्या तरी प्रकारे त्यागानेच सुखप्राप्ती होऊ शकते.

‘भिक्षुका नैव भिक्षन्ति बोधयन्ति ।’ भिकारी घरोघरी जाऊन ‘आई भिक्षा वाढ’ असे ओरडून भिक्षा मागतो. भिकारी दाराशी आला म्हणून आपण त्रासून जाऊ नये. कारण ते भिक्षेसाठी आले असले तरी ते एक तत्त्व समजून सांगत असतात. ‘भिक्षा वाढा’ ह्याचा ‘आम्ही दान न केल्यामुळेच आम्हास ही परिस्थिती प्राप्त झाली आहे. म्हणून तुम्ही तरी दान न करून आमच्या स्थितीस येऊ नका.’ हाच अर्थ नाही काय?

सर्वांत मोहकर वस्तू कोणती ? ह्याचा शास्त्राने शोध केला आहे. पैशासाठीच व्यवहारात भाऊबंदकी सुरू होते. गुरु शिष्यांतहि वाद निर्माण होतो. कमी जास्त खर्च केल्यास स्त्रीपुत्रांनाहि राग येतो, ‘पैसा फार वाईट रे बाबा’ अशा अर्थी कन्नड भाषेत एक म्हण आहे.

दान हे एक महान तप आहे. ब्रह्मचर्य, वानप्रस्थ व संन्यास ह्या आश्रमांत दान करणे शक्य नसते म्हणून गृहस्थाश्रमीयांसाठी दान करणे हा तपाचा विशेष प्रकार सांगितला आहे. दान घेण्यासाठी महात्मे आपणाकडे येतात. त्यामुळे कृतज्ञतेने, भक्तीने दान करा ! अन्नदान करा. मोह आदींच्या निरसनासाठीच दानधर्माचा विधि आहे. जगात सर्व काही चालू असते. आपणासाठी, आपल्या उद्धारासाठी परमेश्वरकृपेने हे सर्व चालले आहे. दानाने ज्ञान व सामर्थ्य देणाऱ्या श्रीगुरुरूपी परमात्म्याची सेवा तुम्ही काया, वाचा, मनाने करून आदर्श जीवन जगून कृतार्थ व्हा !!

इति शम् ।

❀~●~❁~●~❀~●~❁~●~❀~●~❁~●~❀

२. परमात्म्याचे प्रेम

परमात्मा ! परम म्हणजे श्रेष्ठ किंवा महान असा अर्थ. श्रेष्ठ आत्मा किंवा परम आत्मा कोणाला म्हणावयाचे ? अशी शंका येते तेव्हा हा विचार नीट समजावून दिल्याशिवाय निरसन, समाधान होणार नाही.

इतर कोणालाहि परमात्मा म्हटले जात नाही. सर्व जीवजात ज्याची अंशभूत बनली आहेत तोच परमात्मा. प्रदीप्त अग्नीपासून ज्याप्रमाणे ठिणग्या बनतात त्याचप्रमाणे परमात्मा नांवाच्या अग्नीपासून जीवरूपी ठिणग्या उत्पन्न होऊन सर्वत्र पसरल्या आहेत. अग्नीच्या ठिणग्या अग्नीचे अंशच असल्यामुळे त्यांना महत्त्व असते; त्याप्रमाणे परमात्म्याच अंश बनलेल्या जीवांनाहि महत्त्व. ठिणग्या अग्नीचा अंशच असल्याने जसा अग्नी आणि ठिणग्यांत फरक नसतो, त्याप्रमाणेच खऱ्या जाणिवेने परमात्मा व जीवात्मा ह्यामध्ये भेद नाही. असे असले तरीहि ‘तूं मात्र माझा, मी तुझा अंश नव्हे’ असे म्हणणेच व्यवहारांत प्रचलित आहे. तरंग, समुद्र हे एकच. तरंग समुद्राचा एक अंशच, त्याप्रमाणे परमात्म्यापासून जीवांची उत्पत्ति झाली आह, ही जरायुज, अंडज, स्वेदज व उद्भिज अशा चार रूपानी झाली असे विष्णुपुराण व भगवद्गीतेत म्हटले आहे.

अग्नि हा अपार स्वरूपी, ठिणगी ही पार म्हणजेच लहान स्वरूपी. तत्त्व एकच, पण उपाधी भेदामुळे भेद दाखविला जातो. ज्याच्यापासून ज्याची उत्पत्ति झाली ती उत्पन्न झालेली गोष्ट लहान असते. मळ वस्तु श्रेष्ठ, पूर्ण. ह्या दृष्टीनेही परमात्मा सर्वांच्या पूर्वीच आहे. त्याने स्वतःच्या संकल्पानुरूप अनेक रूपे निर्माण करून, ती चैतन्यभरित होण्यासाठी तो स्वतःच त्यांच्यांत प्रविष्ट झाला आहे असे भगवद्गीता सांगते.

देहाची निर्मिती करून त्याच्यात प्रवेश केल्यावरच तो जीव ‘जीव’ म्हणवून घेतो. आत्मस्वरूपात प्रविष्ट झाल्यानंतर देह धारणेच्या पूर्वसंकल्पानुसार अनेक देहांमधून तो वावरतो. प्रत्येक देहातून ‘मी वेगळा आहे, मी भिन्न भिन्न आहे’ असे ओळखून तो वागतो. त्यावेळी पूर्व संकल्प पूर्ण होतो असे जर झाले नसते तर अनेक रूपे धरून जगाचे कार्य कसे साधले असते ? सर्व शरीर ‘मीच’ असे समजल्यानंतर आता असणारा भिन्न भिन्न व्यवहार निरनिराळ्या पद्धतीनुसार करणे असाध्यच. अनेक प्रकारच्या कार्यासाठी अनेक देह धारण करावे लागतात. त्या त्या देहाचा अभिमान धरून ते सर्व ‘माझा देह’ ‘माझा देह’ असे समजून घ्यावे लागेल. तसे न केल्यास भिन्न भिन्न कर्मे साधणार नाहीत. अशा प्रकारे अनेकानेक पात्रे त्याने घेतली तेव्हांच पूर्व संकल्प पूर्ण झाला. ‘अजायमानो बहुधा विजायते ।’ वस्तुतः तो जन्म घेत नसला तरी आपल्या संकल्पाने हा जो खेळ रचिला आहे ती स्वप्नातील भावनाच होय. आचारात दिसत नाही ते स्वप्नात दिसते. पण डोळे उघडून पाहिल्यावर मनातील कल्पनाच, मनातील भावनाच ते रूप धारण करते असे आढळून येते. तात्पर्य – मी बहु व्हावयास पाहिजे असा संकल्प केला गेला त्यावेळी हे सर्व लोक, लोकपालक वगैरे काहीही नव्हते. त्यामुळे आपल्या मूळ-मायेने आपणच अनेक रूपांचा संकल्प करून तो परमात्मा त्याप्रमाणे झाला. स्वप्नदृष्टांताप्रमाणे हे सर्व कांही मनोमय. मनोधर्म, संकल्पमात्राचा विचार, अशाप्रमाणे कामना निर्माण होणे, विचार, अलोचना करणे हे सर्व मनाचेच धर्म, मन व बुद्धि ही काही ठिकाणी एकच तर काही ठिकाणी वेगवेगळी असे म्हटले जाते. महत् तत्त्वाने समष्टि, बुद्धि निर्माण झाली म्हणजे परमात्मा तेथे त्या रूपाने राहून त्याने संतति निर्माण केली. जगांत हेच दिसून येते.

आपल्या संकल्पापेक्षा आपला आत्मा श्रेष्ठ होय. मन, कल्पना ह्याहूनहि श्रेष्ठ असणाऱ्या जीवाच्या ह्या आत्म्यापेक्षाहि श्रेष्ठ असणारा असा जो कोणी आहे तोच परमात्मा अथवा श्रेष्ठ आत्मा. आणखी इतर दुसरे कांहीहि न पाहता आपल्याशीच ‘आपण कोण ?’ असा विचार केल्यास आढळणारे नामरूपरहित असलेलेच आत्मस्वरूप. ‘तोच मी’ असे प्रथम त्याच्या तोंडून ‘सोऽहं’ असे बाहेर पडले तेच सर्वांमध्येहि आहे. श्वास घेताना ‘सो’ व सोडताना ‘हं’ असा आवाज येतो. परमात्म्याचे स्वरूप अशाप्रकारे ‘सोऽहं’ असे असतानाच त्याच्यापासून निर्मित प्रतिकार्यहि होत असते.

सर्व कार्ये बुद्धीने होतात असे म्हटल्यावर कोणत्या योगशक्तीने परमात्म्याने सृष्टिकार्य केले ? अनेक देहरूप धारण केले. त्याच्या अभिमानाने ‘जीव’ म्हणवून घेतले ! त्याच्या संकल्पापेक्षा महान, श्रेष्ठ असणारी, शब्दांनी दाखविली जाणारी दुसरी शक्ति म्हणजे बुद्धीच. परमात्मा हा सर्वापेक्षा श्रेष्ठ. त्याचे स्वरूप व विशालता अनंत असल्यामुळे त्याचे जे काही बुद्धिस्वरूप आहे तीच त्याची शक्ति.

सकल विश्व अनेक वैचित्र्याने निर्माण करणारी शक्तीच बुद्धि. त्याची ही बुद्धीशक्तीच महत् तत्त्व. संकल्परूप बीजाने उत्पत्ती पावलेल्या अनेकतेवर शासन करावयाचे असल्यास त्याच्या शक्तीची आवश्यकता आहे, त्याच्या मनाचीहि आवश्यकता आहे. त्याच्यापासून होणारे असे म्हटल्यानंतर त्याच्याच पूर्णत्वाने परिपूर्ण होणाऱ्या जीवांना त्यानेच स्वतः दिल्याशिवाय पूर्णत्व नाही.

न जन्मलेल्यांना स्त्री-पुरुष अशी दोन रूपे आहेत असे कसे म्हणता येईल ? तो स्त्री नाही व पुरुषहि नाही अशी लिंगभेदरहित ‘मी’ अशी स्फूर्ती असल्याने दोन्ही भिन्न देहाहून वरचढ असाच तो लिंगदेह झाला. अन्नापासून रेत-रज, रेतापासून पुरुष व रजापासून स्त्री. परमात्म्यानेच आपणास दोन प्रकारांत विभागिले आहे. आपला डावा भाग ‘स्त्री’ व उजवा भाग ‘पुरुष’. देहाला जननमरण आहे पण ‘मी’ ह्या परमात्मस्वरूपाला ते नाही. व्यवहारामध्ये ‘मी’ असे जे बोलले जाते ते वेगळे. मूळ मायेच्या आश्रयात ‘मी’ ही गोष्ट निराळी. व्यवहारामध्ये ह्या देहाला ‘मी’ असे म्हणतात तर मूळमायाश्रमामध्ये ईशाला ‘मी’ असे म्हणतात. पण ह्या दोघांहूनहि श्रेष्ठ असणारा, ‘मी’ असे म्हटला जाणारा परमात्मा वेगळाच. तोच श्रेष्ठ आत्मा..

‘मी’ ह्या जाणिवेत भोगणाया, भोगसाधन असणाऱ्या ह्या देहापासून ‘मानव’ अशा भावनेने स्त्री, पुरुष एकत्र येऊन परमात्म्याच्या इच्छेनुसार शास्त्रात सांगितल्याप्रमाणे त्यांनी व्यवहार करणे हा प्रवृत्तिमार्ग. परमात्म्यास प्राप्त करण्यासाठी दोन मार्ग आहेत. सगुण व निर्गुण प्रवृत्ति. सृष्टिपूर्वीच्या सघन अशा सत्यस्वरूपाला निर्गुण असे नाव तर हे सर्व दृश्य आकारयुक्त असणारे तेच सगुण. ब्रह्म म्हणजे म्हणजे अमूर्त, निर्गुणाकार. ते साधावयाचे म्हणजे शास्त्रामध्ये त्याला संन्यास असे नांव आहे आणि ह्या मार्गाचे श्रमिकच संन्यासी.

एकंदरीत पाहातां परमात्म्याचे स्वरूप शोधणे हाच योग्य मार्ग होय. आपले स्वरूपच असलेल्या, एकजिनसी असलेल्या सत्यस्वरूपावर प्रेम करणे हे ‘मनुष्य’ असणाराला व ‘मनुष्य’ होणाऱ्याला अगदी सहजसुलभ आहे. विषयसुख दूर करून परमात्म्याला मिळविण्यासाठी हेच साधावयाचे आहे. आपले स्वरूप हे शुद्ध स्वरूप आहे. तेच आपले मूळ, अशी भावना बाळगून त्या अनंततेत तळपणारा परमात्माच, निराकारात्मक, सर्व सुखस्वरूप ‘मी’ अशी भावना धरून त्याला प्राप्त करून घेतले पाहिजे. कल्पनासृष्टीमध्ये आपणाला सुख कोटचे ? तो सुखाचा निव्वळ आभासच. ते मिळवावयास गेलो तर प्राप्त होणारे ते केवळ दुःखच होय. अद्वैत म्हणजे परमात्म्याला प्राप्त करून घेणे, परमात्माच सुखस्वरूप असे जाणून घेऊन त्याच्यांत एकत्व पावणे हाच खराखरा उद्देश होय. त्याच्या प्राप्तीसाठी करावयाची भक्तीच खरीखरी निजभक्ति, परमात्म्याचे प्रेम, परमात्म्याचे दर्शन करून देणारा मुख्य मार्ग; हे जे समजवून देतो तोच गुरु ! गुरुकृपेनें सत्यस्वरूपाचा निश्चय होतो; खात्री पटते; म्हणूनच गुरुकृपा ही अत्यंत महत्त्वाची आहे, असे श्रुति, स्मृति व साधुसंत सांगत आले आहेत. सर्व दृष्टिजातामध्ये परमात्म्याच्या एकाच दृष्टीने पाहिले पाहिजे. आपल्या सर्व कर्मांचे ध्येय परमात्मप्राप्तीसाठीच असले पाहिजे.

अशा प्रकारे परमात्म्याच्या अनुसंधानाने केलेल्या कर्माच्या फलरूपानें परमात्माच प्राप्त होतो हे जाणून घेऊन आपण सर्वजण सुखाने जगा !!

इति शम् ।

❀~●~❁~●~❀~●~❁~●~❀~●~❁~●~❀