श्री दादा गोडसे रामदासी 
rsz_rsz_god

 

रामदासी श्री दादा गोडसे यांचे पूर्ण नाव गोविंद शंकर गोडसे असे होते. त्यांचा जन्म २५ जानेवारी १९२९ साली शुक्रवारी, पौष पौर्णिमेला रात्री सव्वा अकरा वाजता चाळीसगाव, महाराष्ट्र येथील डोंगरी आणि कितकुर या नद्यांच्या संगमावर झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव शंकर गोपाळ गोडसे (जन्म 13 जून १८८७ पुणे) व आईचे नाव सौ. पार्वती (माहेरचे नाव यमुना सखाराम भणगे, कर्जत, नगर जिल्हा) असे होते. त्यांना श्रीमत प.प. सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी महाराजांचे पहिले दर्शन, श्री क्षेत्र सज्जनगडावर १९४९ सालच्या मार्च महिन्यात झाले होते. पहिल्या भेटीत, श्रीस्वामीजी त्यांना म्हणाले “जा, आधी पदवी शिक्षणाचा शिक्का घेऊन परत ये!!” अर्थात, आधी शिक्षण पूर्ण करून पदवी घेऊन ये. नंतर ते शिक्षण पूर्ण करण्यास मुंबई ला गेले. पुढे ५ फेब्रुअरी १९५३ साली, गुरुवारी, श्री क्षेत्र सज्जनगडावर श्रीस्वामीजींनी त्यांना श्रीसमर्थ समाधी पुढे सकाळी ९ वाजता अनुग्रह दिला होता. रामदासी श्री दादा गोडसेना श्रीस्वामीजींचे सान्निध्य एकून २५ वर्षे प्राप्त झाले होते. १९५८ साली महाबळेश्वरला ‘केट्स पॉईंट’ या ठिकाणी अक्षय तृतीयेला श्रीस्वामीजींनी त्यांचे नामकरण करून ‘निश्चलशांत स्वामी’ असे नवीन नाव ठेवले होते व पुढे ३ जानेवारी १९६३ ला श्री क्षेत्र वरदपुरला त्यांना सन्यास दीक्षा प्रदान केली होती पण भगवी वस्त्र न घालण्यास आज्ञा दिली होती. श्री गोडसे बुवांनी श्रीस्वामीजींवर प्रचुर मात्रात काव्यादी लिखाण केलेले आहे. त्यात श्रीस्वामीजींवर एक ५०० ओव्यांचे काव्य, श्रीस्वामीजीं चा पाळणा, आरती, श्रीस्वामीजींच्या बद्दल ४५० गोष्टी असे एकून दीड हजार पाने भरतील इतके लिखाण केलेले आहे. तसेच श्रीस्वामीजींच्या आठवणी त्यांच्या स्वतःच्या आवाजात ध्वनिमुद्रित करून २९ कॅस्सेट्स तयार केल्या आहेत. रामदासी श्री दादा गोडसे पुणे येथील पद्मावती येथे स्वामींच्या स्वयं निर्मित आश्रमात राहत असत. त्यांनी दिनांक १० ऑक्टोबर २०१९ रोजी रात्री ८.३० वाजता देह ठेवला.

जय जय रघुवीर समर्थ!!!