श्रींच्या शिष्या कु. जानकी अक्का

माहिती सौजन्य - श्री शेषाचाल होणणगी,बेळगाव.
विशेष आभार - श्री विनायक कुलकर्णी,बेळगाव.
शब्दांकन व टंकलेखन - श्री रजनीकांत चांदवडकर,नाशिक.

 

जानकी अक्का यांचा जन्म 1928-29 सालचा असून त्यांचे जन्म ठिकाण कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यातील सागर तालुक्यातील केरकै ग्राम हे आहे. त्या आपल्या आईवडिलांच्या पाचव्या अपत्य होत्या. त्यांच्या आईचे नाव भवानी अम्मा व वडिलांचे नाव रामैय्या असे होते. बालपणापासूनच त्यांची अध्यात्माकडे प्रवृत्ती होती. त्या बारा-तेरा वर्षांच्या असताना त्यांना श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य सदगुरू भगवान श्री श्रीधर स्वामी महाराज यांचे श्रीक्षेत्र वरदपूरला सर्वप्रथम दर्शन घडले होते.  त्यानंतर हळूहळू  त्यांची संसारातील आसक्ती कमी होत गेली. विवाहयोग्य वय झाल्यानंतर एकदा परम पूज्य श्री स्वामीजी त्यांच्या आईंना म्हटले होते की “तुमच्या ह्या मुलीच्या प्रारब्धात विवाहयोग  नसल्याने  तिची अध्यात्मात असलेली रुची अधिक  वाढीस लागण्या करिता तिला गुरुसेवा, सत्संग, प्रवचने, उपासना, जप आदी कार्यात अधिकाधिक वेळ व्यतीत करू द्यावा तिला विरोध करू नये.” त्यानुसार जानकी अक्का तीर्थाटन, प्रवचने आदी कार्यक्रमात सदैव परम पूज्य श्री स्वामीजींच्या परमपावन सहवासात असत. परम पूज्य श्री स्वामीजींच्या भिक्षान्नाचा स्वयंपाक करणे, त्यांच्या आन्हीकाची अथवा पूजेची सर्व पूर्वतयारी करून ठेवणे इत्यादी सेवांची जबाबदारी त्यांनी स्वतःवर घेतली होती. जानकी अक्का यांनी त्यांच्या वयाच्या बारा-तेराव्या वर्षापासून थेट परम पूज्य श्री स्वामीजींनी समाधि घेई पर्यन्त, म्हणजे 1973 सालापर्यंत त्यांनी श्रींची अव्याहतपणे सेवा केली. सध्या त्यांचा मुक्काम कर्नाटकातील होन्नावर येथील रामतीर्थ जवळील श्रींच्या पादुका मंदिरात असतो.

जय जय रघुवीर समर्थ!!