श्रींचे शिष्य श्री जनार्दन बुवा रामदासी

माहिती सौजन्य - श्री शेषाचाल होणणगी,बेळगाव.
शब्दांकन व विशेष आभार - श्री विनायक कुलकर्णी,बेळगाव.
टंकलेखन - श्री रजनीकांत चांदवडकर,नाशिक.

श्री जनार्दन बुवा यांचे पूर्ण नाव जनार्दन नारायण भट असे असून त्यांचा जन्म कर्नाटकातील होन्नावरच्या जवळ असलेल्या सालकोड गावाजवळील गाणगेरे ह्या ग्रामी झाला. त्यांच्या आई वडिलांचे नावे नारायण व महादेवी असे होते व ते उभयता खूप धार्मिक वृत्तीचे होते. बालपणापासूनच जनार्दन बुवांचा स्वभाव  खूप धार्मिक होता.  ते 7-8 वर्षांचे असतानाच त्यांना सालकोड ग्रामी श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य सदगुरू भगवान श्री श्रीधर स्वामी महाराज यांचे सर्वप्रथम दर्शन घडले होते व तदनंतर कोळगीबिस येथे एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान पुन्हा एकदा परम पूज्य श्री स्वामीजींचे दर्शन त्यांना घडले होते. १९६०-६१ साली श्रीक्षेत्र सज्जनगडावर पुन्हा परम पूज्य श्री स्वामीजींचे दर्शन घडल्यावर त्यांच्या गुरुसेवाचा प्रारंभ झाला. जनार्दन बुवांना परम पूज्य श्री स्वामीजींचा अनुग्रह १९६१-६२ साला दरम्यान बंगळुरू येथे झाला. तेव्हा अष्ट ग्रह योग होता. परम पूज्य श्री स्वामीजींचा जेव्हा कधी एकांत होत असे तेव्हा जनार्दन बुवांना त्यांची पडेल ती सेवा करण्याची संधी प्राप्त होत असे व ते परम पूज्य श्री स्वामीजींची संपूर्ण समर्पण बुद्धीने सेवा करीत असे. परम पूज्य श्री स्वामीजींच्या छाटया धुणे, त्यांना पूजेसाठी पानी आणून देणे, गोसेवा करणे इत्यादी विविध स्वरूपातील सेवा ते मन लावून करीत असे. परम पूज्य श्री स्वामीजींची सेवा करण्याचा योग त्यांना प्रदीर्घ काळापर्यंत प्राप्त झाला. म्हणजे १९६०-६१ ते थेट परम पूज्य श्री स्वामीजींनी समाधि घेई पर्यन्त, म्हणजे एकोणावीस एप्रिल 1973 सालापर्यंत. परम पूज्य श्री स्वामीजींच्या प्रवचनांना त्यांच्याच आज्ञेनुसार ग्रंथरूपात प्रकाशित करण्याचे महतकार्य देखील श्री जनार्दन बुवांनी केले आहे व सध्याही करीत आहेत. सध्या त्यांचा मुक्काम कर्नाटकातील होन्नावर येथील रामतीर्थ जवळील श्रींच्या पादुका मंदिरात असतो.

जय जय रघुवीर समर्थ!!