श्रींच्या शिष्या लीलाताई पुजारी, कराड.

IMG-20200620-WA0002

 

सौजन्य व शब्दांकन - श्री श्रीधर जोशी,कराड. 
विशेष आभार - श्री श्रीधर दीक्षित,पुणे.
टंकलेखन - श्री रजनीकांत चांदवडकर,नाशिक.

 

जय जय रघुवीर समर्थ

“शुद्ध बीजापोटी । फळे रसाळ गोमटी” ह्या उक्तीप्रमाणे श्री समर्थ रामदास स्वामींनी पंढरपूरहून सज्जनगडावरील रामाच्या पूजेसाठी ज्या आराध्ये घराण्यातील पुजाऱ्यांना आणले त्याच आराध्ये घराण्यात कै. लीला ताईंचा जन्म झाला.

त्यांच्या वडिलांचे नाव पुरुषोत्तम (बंडू) व आईचे नाव चंपूताई पुजारी. म्हणजे माझे आजोबा आजी. माझी आजी अन्नपूर्णाच होती. गडावर फारशी घरे नव्हती. राहण्याची सोयही नव्हती. तेव्हा गडावरील बहुतेक रामदासी मंडळी यांच्याकडेच फराळाला येत. स्वामी गडावर आले की, श्री समर्थांच्या दर्शनाला जाताना आजीला दहीपोहे करण्यास सांगत. आजीच्या हातचे दहीपोहे त्यांना खूप आवडत.  किती भाग्यवान असेल ते घराणे?

याच घराण्यातील लीलाताई. त्यांना लहानपणापासूनच देवाची, अध्यात्माची आवड होती. दिवसभर शाळा झाली की संध्याकाळी उपासना केली जाई. लग्नाचा विषय काढल्यावर देवळात जाऊन बसे. एकदा आजीने ह्याबाबत स्वामीं पुढे तक्रार केल्यावर स्वामी नुसतेच हसून “मी बघतो” म्हणत.

स्वामी गडावर असताना ची गोष्ट. गंगाक्का करकी नावाच्या शिष्या स्वामींच्या सेवेसाठी असतानाच एके दिवशी त्यांना चक्कर आली आणि डॉक्टरांनी त्या स्वामी चरणी लीन झाल्याचे सांगितले. स्वामी ध्यानातून बाहेर आल्यावर त्यांना हे कळले. तेव्हा त्यांनी  श्रीसमर्थांची तीर्थ आणून मंत्रोच्चार करण्यास सुरुवात केली. काही काळातच गंगाक्का उठून बसल्या आणि त्यांनी स्वामींना नमस्कार केला. तेव्हा स्वामींनी हिच्या हातून पुढचे कार्य व्हायचे आहे म्हणून ब्रह्मदेवाकडून पुढील जन्मी चे आयुष्य मागून घेतल्याचे सांगितले.

त्याच वेळी लीलाताईंची मावशी, काशीताई काळे गडावर स्वामींच्या दर्शनाला आली होती. कराडला सोमवार पेठेत तिचे जुने घर होते. पण ती जागा बाधित होती. म्हणून स्वामींनी ती जागा स्त्रीयांच्या उपासनेसाठी देशील का विचारल्यावर मावशी लगेच तयार झाली. (बरोबर निष्ठा असल्यावर काय होते बघा. गंगाक्का यांना याचसाठी स्वामींनी जिवंत केले होते.) स्वामींनी कराडला राहण्यासाठी गंगाक्का यांच्याबरोबर लीलाताईंनाही पाठवले.

मग सर्वांनी स्वामींचा आशीर्वाद घेतला व खऱ्या अर्थाने उपासनेला सुरुवात झाली. स्त्रियांसाठी उपासनेसाठी स्वामींनी पहिला आश्रम कराडला स्थापन केला. एकदा स्वामी वरदपूरहून सज्जनगडावर जात असताना अचानक रात्री कराडच्या आश्रमात आले. त्याठिकाणी एक ब्रह्मराक्षस होता. त्याला स्वामींनी मुक्ती दिली.

एकदा लीलाताईंनी स्वामींना रुद्र येत नसल्याचे सांगितले असता स्वामींनी त्यांना “नमः शांताय” चा जप १०८ केल्यास रुद्राचे एक आवर्तन केल्याचे पुण्य मिळेल असे सांगितले. तसेच रोज दर्शनाला येणाऱ्यांचे मनोरथ पूर्ण व्हावेत असे म्हटल्यावर स्वामींनी तसा आशीर्वाद दिला. जोक मनोभावे स्वामींना नमस्कार करतो त्यांच्या कामना पूर्ण होतात असा येथील आश्रमात येणार्‍यांचा अनुभव आहे. लीलाताईंनी ह्या आश्रमासाठी खूप केले. गावोगावी भिक्षा मागणे, त्यासाठी प्रवचन, कीर्तनाद्वारे समर्थांचे, स्वामींचे विचार लोकांना सांगणे ह्या गोष्टी त्या स्वतः करीत. स्त्री म्हणून त्या मागे राहिल्या नाहीत. स्वामी आपल्या पाठीशी आहेत हीच त्यांची भावना होती. त्यांनी लहान मुलांना कीर्तन करायला शिकवले. इतकेच नव्हे तर त्यातील गाणी, त्यांच्या चाली त्यांनी लावल्या. शिक्षणाची आवड असल्याने पन्नासाव्या वर्षी M.A. झाल्या. विशेष म्हणजे त्या गेल्यानंतर त्यांची Ph.D ची पदवी आश्रमात आली. स्वामींच्या गोष्टी,  त्यांचे चरित्र सर्वांना कळावे म्हणून सोप्या भाषेत “ काही आठवणी” हे पुस्तक त्यांनी लिहिले व सध्या सर्वांना माहीत असलेली “श्रीधरस्वामी आरती करते तुजला गुरुराया” ही आरती त्यांनी केलेली आहे. त्यांना चित्रकलेची, भरतकाम, विणकाम इत्यादी ची आवड होती तसेच दुसऱ्यांना पदार्थ करून घालने यांचीही आवड होती.

स्वामींचा आशीर्वाद पाठीशी असल्याचा त्यांचा अनुभव नमूद करावासा वाटतो. एकदा कोल्हापूरहून भीक्षा झाल्यावर कराडला येताना आईने त्यांना पैसे नीट ठेव असे सांगून आई घरी आली. पण त्या रिक्षावाल्याने रिक्षा दुसरीकडे नेल्याचे लीलाताईंच्या लक्षात आल्यावर त्यांनी स्वामींचे स्मरण केले आणि अचानक दुसरे तीन रिक्षा वाले आले आणि त्यांनी त्यांना व्यवस्थित स्टँडवर सोडले. असे अनेक अनुभव आहेत. प्रत्येक ठिकाणी आईसारखीच स्वामींनी काळजी घेतली.

एकदा त्यांनी आपल्या भवितव्याबद्दल विचारले असता स्वामींनी त्या मागील जन्मी देवीची उपासक असून चांगली उपासना केल्यानेच आपल्यापर्यंत आल्याचे सांगितले आणि मोक्षपद प्राप्त होणार असून काळजीचे कारण नसल्याचे स्वामींनी सांगितले. त्याप्रमाणे विनासायास ८९ साली त्यांनी स्वामींच्या चरणी देह ठेवला. त्यापूर्वी ज्यांनी लहानपणापासून त्यांच्या सहवासात अनेक वर्षे काढली त्या श्री सुरेश कुलकर्णी यांना मानसपुत्र मानल्याने आश्रमाच्या व्यवस्थेसंबंधी बऱ्याच गोष्टींचे मार्गदर्शन केले.

सध्या आश्रमात याप्रमाणे वर्षात चार उत्सव होतात १. गुरुपौर्णिमा २. दत्त जयंती ३. दास नवमी ४. स्वामींची आराधना. त्या निमित्ताने लघुरुद्र,  दासबोध पारायण, प्रवचन कीर्तन आदी कार्यक्रम होतात. महाप्रसादासाठी ३००-४०० लोक येतात. रोज तीन्ही वेळेला आरती होते. रात्री आरतीनंतर रोज भीमरुपी आणि रामरक्षा म्हटली जाते. ह्यासाठी १५-२० माणसे हजर असतात. प्रत्येक गुरुवारी, दर पौर्णिमेला अभिषेक होतात. त्याबरोबर लीला ताईंच्या वेळी आठवड्यात दोन दिवस भजने होत. सध्या उत्सवाच्या निमित्ताने भजनाचे कार्यक्रम होत असतात. तसेच रोज सायंकाळी साडेपाच ते सात सामुदायिक उपासना होते. १०-१५ महिला यासाठी उपस्थित असतात. अर्थात हे सगळे लीलाताई ह्या आश्रमात आल्या व त्यांनी सर्वांच्या सहकार्याने हे कार्यक्रम सुरू केले. स्वतः स्वामींनी हा आश्रम स्थापन केला आहे. खरोखरीच आम्ही कराडकर खुप भाग्यवान आहोत. श्री श्रीधर दीक्षित, पुणे यांनी विचारल्यामुळे आणि स्वामींनी स्फूर्ती दिल्याने हे थोडेफार सांगत आहे. तसे पाहू जाता ज्यांनी संपूर्ण आयुष्य स्वामीं साठी घालविले त्यांच्याबद्दल किती सांगणार? शेवटी त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतो व थांबतो.

जय जय रघुवीर समर्थ!!

– श्री श्रीधर जोशी, कराड.

लीलाताई पुजारी यांनी रचलेली श्रींची आरती

श्रीधर स्वामी आरती करितो तुजला गुरुराया, श्रीधरा तुजला गुरुराया,
मनमानस हे चरणी अर्पूनी ओवाळीन सदया ॥धृ॥

तू विश्वंभर पूर्ण सनातन तू सर्व साक्षी, श्रीधरा तू सर्वसाक्षी,
भक्तांसाठी धावून येसी परब्रह्म लक्षी।
तुझ्या कृपेचा महिमा वर्णी भोळा शंकर, श्रीधरा भोळा शंकर,
चिन्मय व्यापक सर्वचराचर तू विश्वंभर ॥१॥

भक्तांचे तू हट्ट पुरविसी भक्ति पाहूनी, श्रीधरा भक्ति पाहूनी,
दयासागरा दीनानाथा येसी धावूनी।
शांतीसुखाची अखंड मूर्ती सद्गुरू श्रीधरा, स्वामी सद्गुरू श्रीधरा,
भक्तांवरती कृपा करूनिया चुकवी हा फेरा ॥२॥

श्लोक

समर्थांची मूर्ती पुनरपि जगी ही प्रगटली।
जनोद्धारासाठी सतत फिरली मेदिनितली।
जयाच्या वास्तव्ये वरदनगरी होत वरदा।
मनी त्या चिंतावे सतत भगवान श्रीधरपदा ।।

व्हावी पूर्ण कृपा गुरो मजवरी प्रार्थित भावे तुला।
वारी सर्व अरिष्ट नेऊनी लया संमोह जो वाढला।
अज्ञानांध जनांसी मुक्त करूनी शांती पदी बैसवी ।
विनती हीच असे न मागत दुजे भक्ति तुझी ही हवी।

॥सीताकांतस्मरण जय जय राम ।।