श्रींचे अंतरंग शिष्य, प पू श्री बापू उर्फ श्री पृथ्वीराज भालेराव ‘सुव्रत’

This slideshow requires JavaScript.

श्री पृथ्वीराज भालेराव उर्फ श्री बापूंचा जन्म हैदराबादच्या राजारायरायाण अमानतवंत यांच्या संपन्न राजघराण्यात राजा धुंडीराजबहाद्दूर व राणी कमलाराजे यांच्या पोटी १ जानेवारी १९३१ रोजी झाला. नववर्षाच्या पहिल्या दिवशी जन्मल्यामुळे बालकाचे नाव पृथ्वीराज असे ठेवले गेले. त्यावेळी हैदराबाद हे शहर निजामाची राजधानी असल्यामुळे सुरुवातीचे शिक्षण उर्दू माध्यमातून झाले. राजा धुंडीराजबहाद्दूर इंग्लंडला जाऊन Bar-at-law झाले होते त्यामुळे जहागिरीची व्यवस्था पाहातानाच ते निजामाच्या राज्याचे प्रमुख न्यायाधीश होते. घरात अत्यंत आधुनिक वातावारण होते परंतू पूर्वजन्मीच्या संस्कारामुळे छोटे पृथ्वीराज मात्र पूजाअर्चा करणे, जप करणे यात गढून जात. वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी त्यांना श्रीकृष्णाचे विराट स्वरुपात दर्शन झाले. त्यावेळीच त्यांच्या मनात विचार तरंग उमटले की आपण मागच्या जन्मात श्रीकृष्णाची राधाभावात उपासना केली आहे. घरातून काही संस्कार नसतानाही केवळ पुर्वसंस्कारामुळे त्यांची साधना अचूक होत गेली. आठव्या वर्षीपासूनच आपली मुंज करावी म्हणून आपल्या आईवडिलांकडे त्यांनी मागणी करायला सुरुवात केली. परंतू त्यावेळी पाश्चात्य विचारसरणीचा पडगा असलेल्या राजा धुंडीराजबहाद्दूर व राणी कमलाराजे यांना ते मान्य नव्हते. त्यांनी छोट्या पृथ्वीराजना समजाऊन सांगण्याचा प्रयत्न केला की मुंज केल्यामुळे तुझ्यात काहीच फरक पडणार नाही, मुंजीपूर्वी तू जसा असतोस तसाच मुंजीनंतरही राहतोस. पण त्यांना ते पटत नव्हते. अखेर वयाच्या १४ व्या वर्षी आपल्या राजोपाध्यांकडून मुंजीचे संस्कार करवून घेतले. वेद, वेदांगे व षड्दर्शने यांचा जिज्ञासुवृत्तीने अभ्यास करीत असतानाच कॉलेजमध्ये western philosophy हा विषय असल्यामुळे भारतीय व पाश्चात्य संस्कृती यांचा तौलनिक अभ्यास केला. त्यांनी बहुविध संतवाङ्मय आत्मसात केले. उदा. गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध इत्यादी. दासबोधाच्या अभ्यासानंतर समर्थ शिकवणीचा त्यांच्या मनबुद्धीवर एवढा काही प्रभाव पडला की प्रकाशित असे सर्व समर्थवाङ्मय त्यांनी अभ्यासले. संतदर्शन व संतसेवेची सतत ओढ त्यांना असे. १९५० च्या श्रावण महिन्यात ओळीने तीन सोमवारी शिवलीलामृत वाचनानंतर रात्री स्वप्नात एक संन्यासी दर्शन देत व मी श्रीधरस्वामी आहे असे सांगत. तिसऱ्या सोमवारी तर त्यांनी पृथ्वीराजांच्या ब्रम्हरंध्रावर अनामिकेने ओमकार रेखला व मोठयाने प्रणवाचा उच्चार केला तेव्हा पृथ्वीराजनी स्वामींना विचारले की आपण हे काय करीत आहात, तेव्हा अतीव वात्सल्याने पाहात स्वामींनी सांगितले “मी तुझी ब्रम्हपुजा करीत आहे”. जागे झाल्यावर लक्ष्यात आले की हा स्वप्नानुग्रह होता व स्वामींच्या कृपेने ब्रम्हप्राप्ती होणार आहे. या घटनेनंतर त्यांनी स्वामीदर्शानाचा ध्यास घेतला. पण बरेच महिने शोध घेऊनही त्यांचा पत्ता लागला नाही. पण त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत व शेवटी ‘सब्र का फल बडा मीठा होता है’ या म्हणीप्रमाणे पौष वाद्य चतुर्दशीस मंगळवारी जानेवारी १९५४ या दिवशी श्रीस्वामींचे प्रत्यक्ष दर्शन झाले व ४ एप्रिल १९५४ (चैत्र शु. प्रतिपदा, गुढी पाढवा) या दिवशी श्री स्वामींचा अनुग्रह प्राप्त झाला. त्यांचे वय तेव्हा अवघे २३ वर्षांचे होते. अनुग्रहानंतर त्यांनी श्री स्वामींची सेवा अत्यंत भक्ती भावाने व तत्परतेने केली. १९६३ साली ३२ वर्षांचे असतांना त्यांना आत्म साक्षात्कार झाला. त्यांनी श्री स्वामींवर अनेक कवणे तसेच गीते रचले आहेत. त्यांनी लिहिलेले काही ग्रंथ पुढील प्रमाणे आहेत – ‘श्रीधर महात्म्य’, ‘श्रीधर चरित्र उन्मेष’, ‘सुबोध उपासना’, ‘उपासना महात्म्य’ व ओवीबद्ध ‘श्री रेणुका महात्म्य’. १८ जुने २०१५ साली (आधिक आषाढ शु. द्वितीया) त्यांनी देह त्याग केला.

जय जय रघुविर समर्थ!!


 

प पू श्री बापू उर्फ श्री पृथ्वीराज भालेराव ‘सुव्रत’ यांनी रचलेली व संगीतबद्ध केलेली काही गीते त्यांच्याच आवाजात –
“श्रीधर सुप्रभातम”

❀~●~❁~●~❀~●~❁

“गुरु तू माझा आधार”

❀~●~❁~●~❀~●~❁

“सवाया”

❀~●~❁~●~❀~●~❁

“श्रीधर स्तवन”

❀~●~❁~●~❀~●~❁

“नमन”

❀~●~❁~●~❀~●~❁

“सद्गुरुविन कोई नही अपना”

❀~●~❁~●~❀~●~❁


प पू श्री बापू उर्फ श्री पृथ्वीराज भालेराव ‘सुव्रत’ यांची १९९४ साली काढलेली एक दुर्मिळ चित्रफिती –


प पू श्री बापू उर्फ श्री पृथ्वीराज भालेराव ‘सुव्रत’ रचित ऑनलाईन उपलब्द असलेले साहित्य –

१. श्रीधर नमन 

२. श्रीधर महात्म्य 

३. श्री सदगुरू मानस पूजा 

४. सेवा हे साधन 

५. पतित पावन स्तोत्रम् 

६. चरित्र उन्मेष

७. श्रीधाराष्टक स्तवः new

८. सिद्ध – पंचदशी new

९. गुरु करुणामूर्ती new