श्रींचे सतशिष्य – श्री गोविंद नरहरि वैजापुरकर
vaijapur.jpg

 

जन्म – २०.८.१९२०
शिक्षण – एम.ए., न्याय वेदान्त साहित्याचार्य, वाराणसी.
पेशा- शिक्षक, वर्तमान पत्र संपादक,संस्कृत भाषे चे विद्वान
संपादक – सन्मार्ग दैनिक वृत्तपत्र.

प. पू. सद्गुरु भगवान श्री श्रीधर स्वामी महाराज अनुग्रह – १९५२ वाराणसी व १९५३ साली श्री समर्थ सांप्रदायिक दिक्षा, काळेराम मंदिर, अयोध्या.

विशेष योगदान –

  • प. पू. श्रीस्वामींच्या काशी वास्तव्यात, श्रीस्वामींच्या हिन्दी, संस्कृत लेखन कार्या चे संपादन, हिन्दी अनुवाद व प्रकाशना ची सर्व जबाबदारी श्री गोविंद राव यांनी घेतली होती. त्यात मुख्यत: “आनंद तत्व मिमांसा” मुळ हिन्दी ग्रंथ, “दत्त करुणार्णव”, मुमुक्षु सखा , दिव्य संदेश यांचे हिन्दी भाषांतर व संपादन आहे.
  • चारी वेदांचा अनुवाद – पु. गंगेश्वरानंद यांच्या मार्गदर्शना खाली.
  • ग्रंथ संपादन- श्री अखंडानंद सरस्वती, वृन्दावन, श्री करपात्री स्वामी महाराज , वाराणसी.
  • हिन्दी अनुवाद – सहा सोनेरी पाने (अंतिम भाग) लेखक श्री वि.दा.सावरकर.
  • राष्ट्रिय शिक्षक पुरस्कार (भारत सरकार)

निर्वाण – ०४.०६.१९८६, वाराणसी

प. पू. सद्गुरु भगवान श्री श्रीधर स्वामी महाराज यांची प्रथम भेट कशी झाली ते या खालील लेखात विस्तृतपणे सांगितलेले आहे. हा लेख काही वर्षांपूर्वी ‘श्रीधर संदेश’ मासिकात छापून आला होता. –

“असे येती सद्गुरु”

लेखक – श्री श्याम गोविंद वैजापूरकर, जोधपुर, राजस्थान.

सद्गुरु हा शब्द कानावर येताच नकळतच एक तेज:पुंज, शांत, आनंदाने परिपूर्ण असे प्रभावी व्यक्तिमत्व डोळ्यापुढे उभे राहते. ते म्हणजे आमची परम श्रद्धेय गुरुमाऊली सद्गुरु भगवान श्री श्रीधर स्वामी महाराजच. अवघा महाराष्ट्र त्यांना समर्थ या नावानेही ओळखतो. लेखकाची या महान विभूति शी प्रत्यक्ष भेट 1965 झाली श्रीक्षेत्र काशी येथे झाली. एक विलक्षण असे आकर्षण ज्यामुळे स्त्री-पुरुष, आबालवृद्ध सर्वच आपोआप त्यांच्याकडे आकर्षित व्हावे. गोविंद नरहरी वैजापूरकर यांना त्यांच्या पहिल्याच भेटीत गुरुमाऊली म्हणाली होती  “अरे, मी तुझ्यासाठीच काशीला आलेलो आहे.” ज्या व्यक्तीसाठी हे उद्गार काढले ती व्यक्ती किती मोठी आणि तिची पात्रता किती असावी? सद्गुरु भगवान श्री श्रीधरस्वामी महाराज आणि गु.भ. वैजापूरकर (ज्यांना काशी आणि आसपासच्या परिसरामध्ये शास्त्रीजी म्हणून ओळखले जात असे). ह्या दोन व्यक्तिमत्त्वानंविषयी जी चर्चा येथे केली जाणार आहे त्यांचे स्तूल रूप केव्हाच पंचतत्वात विलीन झाले आहे. आता आहे ती केवळ त्यांची स्मृती!

गुरु-शिष्यांच्या भेटीचा अपूर्व संगम जेथे घडला ते श्रीक्षेत्र काशी सगळ्यांना ठाऊक आहेच.  गु.भ. वैजापूरकर हे श्रीक्षेत्र काशी येथील एक बहुमान्य शास्त्रीय पंडित होते. संस्कृत भाषा, त्यातील साहित्य, न्यायशास्त्र, वेदांत, उपनिषदे यात त्यांचा अधिकार फार मोठा होता. आदरणीय प्रभृति स्वामी श्री करपात्रीजी, स्वामी श्री अखंडानंद जी, स्वामी श्री गंगेश्वरानंदजी, पूज्य प्रभू दत्त ब्रह्मचारी जी, श्री जयदेवलाल गोयंका जी या व्याक्तीमत्वांशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. प्रगाढ विद्वत्तेमुळे आपण कधी गुरु करावा हा विचार त्यांच्या मनात कधी आलाच नाही. वैजापूरकरांच्या पारिवारिक कारणांमुळे अल्पवयातच (कोवळ्या वयातच) त्यांची आई वारली होती आणि घरातील सगळ्यात वडील या कारणांमुळे सांसारिक जबाबदारी अल्पवयातच त्यांच्यावर येऊन पडली होती. पण सांसारिक सुख मात्र फारसे त्यांच्या नशिबी नव्हते. कारण सत्तावीस वर्षांचे होईपर्यंत एकामागे एक अशा त्यांच्या दोन बायका निवर्तल्या. आई आणि दोन पत्नी, अतिशय अल्पशा वयातच गेल्यामुळे घरात भुताटकी सदृश्य प्रकार सुद्धा होता. इतक्या अडचणी असतानाही, त्यावर मात करत पुनश्च एकदा संसाराचा गाडा यशस्वीपणे हाकण्याची कवायत आपल्या तिसऱ्या पत्नीसह त्यांनी सुरू केली. काळाच्या उदरात काय साठवून ठेवले आहे हे त्या ईश्वरा शिवाय आणखी कुणाला ठाऊक असणार? प्रापंचिक अडचणींवर मात करत जगण्यातच उद्याच्या उष:कालाची चाहूल, सद्गुरु रूपामध्ये अवतरण्याची चाहूल वर्तमानाला लागली तर नव्हती ना? वैजापूरकरांच्या तिसऱ्या पत्नीला विवाहानंतर दोन-तीन संतती राहिल्यात. पण त्यापैकी जगली कुणीच नाही. पर्यायाने शास्त्रीजी व त्यांच्या सासुबाई अतिशय काळजीत होत्या.

1953 साली श्रीक्षेत्र काशी येथे, गंगा महालात श्री स्वामीजींचा चातुर्मास सुरू होता. साखरेचा साठा जसा मुंग्यांना कळून भराभर त्या गोळा व्हायला लागतात तद्वतच श्री गुरुमाऊलींच्या सामर्थ्याची बातमीही संपूर्ण काशीभर पसरत चालली होती. श्री स्वामीजींच्या सामर्थ्याची माहिती शास्त्रीजींच्या सासूबाईंच्या कानावर आली आणि त्यांनी लगेच आपल्या कन्येला त्यांच्या दर्शनासाठी जायला सांगितले. गंगा महाल, स्वामीजींचे निवासस्थान शास्त्रीजींच्या घरापासून फारसे दूर नव्हतेच. त्यामुळे शास्त्रीजीं च्या पत्नी चे नियमितपणे दर्शन व तीर्थ प्रसादासाठी जाणे सुरु झाले. त्यादरम्यान त्या पुनश्च एकदा गर्भार होत्या. रोज जाण्याचा नियम सुरु झाला. जायचे व निमूटपणे एका कोपऱ्यात श्रीगुरुमाउली कडे बघत बसून राहायचे. माऊलींचे ते ब्रह्मतेज, आनंदाने तृप्त शांत मुद्रा, ह्यामुळे इतके त्या भारावून जात असत की आपल्याला घरी जायचे आहे याचाही त्यांना विसर पडे! अवघे 23 वर्षांचे कोवळे वय! सगळे दर्शन घेऊन परतल्यानंतरही त्या जणू मोहित झाल्याप्रमाणे तिथेच बसून असत. शेवटी मग श्रीगुरुमाऊली स्वतः “बाळ, आता घरी जा” असे संबोधून परत पाठवत असे. आपल्या आईचे म्हणणे ऐकून शास्त्रीजींच्या पत्नीने श्री गुरुमाऊलीस त्यांना अनुग्रह देण्याची विनंती केली. श्री गुरुमाऊली म्हणाली “तुझे यजमान फार मोठे शास्त्री पंडित आहेत व कुणालाच गुरु करत नाहीत आणि मी केवळ एकट्या पत्नीला अनुग्रह देत नाही. गुरु, दीक्षा या विषयी तुला काही अंदाज आहे का? मात्र शास्त्रीजींची पत्नी हट्टच धरून बसली कि “मी आपल्यालाच गुरु करणार आणि आपणच मला अनुग्रह द्या”. गंमत अशी की या अवघ्या 23 वर्षांच्या मुलीचे यजमान नेमके कोण याची माहिती स्वामीजींनाही नव्हती. त्यांनी त्या मुलीला तिच्या पतीचे नाव विचारले. गोविंद वैजापूरकर! अरेचा! माझ्या लेखनावर संस्कार करण्याची, ते शास्त्रशुद्ध दुरुस्त करून प्रकाशित करण्याची जबाबदारी ज्या विद्वान पंडिताला दिलेली आहे, तीच व्यक्ती या मुलीचा पती! श्री गुरुमाऊली पुन्हा म्हणाली “अगं, तुझा नवरा मला नेहमी भेटतो पण साधा नमस्कार सुद्धा करत नाही आणि तू म्हणतेस की मी त्याच्यासकट तुम्हा उभयतांना दीक्षा द्यावी! हे कसे घडणार?” पण शास्त्रीजींच्या पत्नी हट्टालाच पेटल्या. “महाराज मी अनुग्रह आपलाच घेणार आणि आपल्यालाच गुरु करणार”. शेवटी श्री गुरुमाऊली म्हणाली “ठीक आहे, उद्या सकाळी चार वाजता तू आपल्या यजमानांना घेऊन गंगा स्नानासाठी घाटावर ये. मी तेथेच असेन, पुढे मग जशी परमेश्वराची इच्छा!” दुसऱ्या दिवशी सकाळी चार वाजता आपल्या यजमानांसह  शास्त्रीजींच्या पत्नी गंगास्नानाला गेल्या. मात्र तिथेच श्री गुरुमाऊली ही तेव्हां स्नानाला येणार आहेत हे मात्र त्यांनी आपल्या यजमानांना सांगितले नाही. श्री स्वामीजी गंगेमध्ये पोहत होते. दुरूनच त्यांनी उभयतांना येताना बघितले. तसे ते बाहेर आले आणि अंग पुसून, घाटावरच एका दगडी चौथऱ्यावर विराजमान झाले. डोळे मिटले आणि श्री गुरुमाऊली ध्यानस्थ झाली. संन्यासी, साधू विषयी शास्त्रीजींचे मत बरेचसे कलुषित होते. आपल्या कार्यकलापाच्या दरम्यान बऱ्याचशा असल्या भोंदू लोकांना त्यांनी जवळून बघितले होते आणि आणि त्यामुळे त्यांचा विश्वास केवळ आपल्या पत्नीच्या म्हणण्याखातर आणखी एका साधू वर त्यांचा विश्वास लगेच एकाएकी बसणे शक्यच नव्हते. स्वामीजींभोवती बरीच गर्दी होती आणि त्यात मोठ्या प्रमाणात बायकाही होत्या. गंगा स्नानानंतर पत्नीच्या आग्रहास्तव एकदा राधाकृष्ण मंदिरात दर्शनासाठी जाणे शास्त्रीजींना आवश्यक होते आणि मंदिरात जाण्याचा रस्ता श्रीस्वामीजी जिथे बसले होते त्या जागेवरूनच होता. बायका माणसांच्या गर्दीत श्री स्वामीजींना ध्यानस्थ बसलेले बघताच थोडे पुढे जाऊन आपल्या पत्नीस अद्वातद्वा बोलणे सुरू केले. “तीर्थ आणि विभूती दिल्याने काही कल्याण होते काय? काय भोंदूगिरी माजविली आहे? लोक दुःखी असतात, बिचारे आशेने येतात आणि हे भोंदू साधू त्या गरीब बायकांना, पुरुषांना लुबाडत असतात. असे आणि बरेचसे बोलत-बोलत उभयता मंदिराच्या दारातखाली आणि आत प्रवेश करणार इतक्यात आपल्या दोन शिष्यांना पाठवून श्री स्वामीजींनी या दोघांना आपल्या जवळ बोलावून घेतले. निरोप मिळताच शास्त्रीजी श्रीस्वामींजवळ येऊन उभे राहिले. श्री गुरुमाऊलींनी शास्त्रीजींना विचारले “आपण मला किती शिव्या घातल्या?” आणि जे जे शास्त्रीजी आपल्या पत्नीला म्हणाले होते ते सर्व बोलून दाखविले. पण तरीही शास्त्रीजींनी प्रामाणिकपणे उत्तर दिले “होय आपण म्हणता ते योग्य आहे. मी असे बोललो. माझी बऱ्याच अशा भोंदू साधूंशी गाठ पडली आहे आणि त्यामुळे माझे ठाम मत आहे की तीर्थ विभूती असल्या गोष्टींनी लोकांचे दुःख दूर तर होत नाही उलट ते लुबाडले जातात.” श्री गुरु माऊली ने स्मित हास्य केले व म्हणाली “बाळ, अरे हे लोक आपले दुःख मला सांगतात आणि मी त्यांचे दुःख परमेश्वराला सांगतो. परमेश्वर दुःख निवारणाचे माझ्यावर सोपवतो आणि मी त्यांना तीर्थ, विभूती, अक्षता देऊन त्यांचे दुःख नाहीसे करतो. यामध्ये माझा काही स्वार्थ नाही, बरे! आणि शास्त्रीजी जर आमचे हे काम तुम्हाला करता येत असेल तर तुम्ही करा, आम्ही काय, आम्ही आपले एकांतात, आनंदाने राहू”. शास्त्रीजी श्री गुरुमाऊलींच्या अंतर्दृष्टी व स्पष्टवक्तेपणा ने अतिशय प्रभावित झाले व म्हणाले “जो मला प्रत्यक्ष आत्मसाक्षात्कार घडवुन देईल, त्यालाच गुरु करणार आहे. तसे शास्त्राचे पुष्कळ ज्ञान मला आहे. पण अनुभवाचा आत्मसाक्षात्कार हा गुरुकृपेनेवीण होत नाही आणि तसे व्हायला तुमचा सद्गुरु हा श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठच असायला पाहिजे असे श्रुतीचे सांगणे आहे आणि त्याला अनुसरूनच सद्गुरु करणार आहे” आणि सगळ्यात शेवटी स्पष्टपणे शास्त्रीजी म्हणाले “पानी पियो छान कर गुरु करो जानकर”. श्री स्वामीजींनी मंद स्मित केले आणि उपस्थित शिष्यांना चार लोट्या भरून गंगेचे पाणी आणण्यास सांगितले. स्वामीजींनी शास्त्रीबुवा व त्यांच्या पत्नीचे डोके आपल्या उजव्या पायाच्या अंगठ्यावर ठेवायला सांगितले आणि त्या दोघांच्या डोक्यावर पाणी घालायला सुरुवात केली. पहिली घागर ओतून झाल्यावर शास्त्रीजी “रुपयात चार आणे” इतकेच बोलले आणि शेवटीची चौथी घागर ओतून होताच अर्धा तास शास्त्रीजींचे भान हरपले,जणू समाधी लागली म्हणाना. शुद्धीवर आले तसे श्री गुरुमाऊलींचे पाय धरून हंबरडा फोडला. अश्रू पुरीत शुद्ध अंतःकरणाने म्हणाले “ मी आपल्यालाच सद्गुरु करणार. जी आत्मशांती किंवा साक्षात्कार आपण मला घडवला आहे ते सामर्थ्य आणखी कोणाही मध्ये नाही. आपण मला आपला शिष्य म्हणून कबूल करावें, ही करबद्ध प्रार्थना आहे. श्री स्वामीजी म्हणाले “बाळ, अरे उठ. मी तुझ्यासाठीच काशी ला आलेलो आहे. मला सतशिष्य हवा होता आणि तुला सद्गुरु. चमत्कार बघून तर बरेच जण शिष्य होतात पण सद्गुरूंची परीक्षा घेऊन त्यांचा शिष्य होणारा एखादाच असतो. चमत्कार पदोपदी होतीलच असे नाही. मात्र आत्मानंदाची, स्वानंदा ची गोडी तर चिरकाल टिकते, सतत वाढतच जाते. ती शब्दात व्यक्त करता येत नसली तरीही साखरेच्या गोडीप्रमाणे तिची स्मृती कधीच नष्ट होत नाही. तुला मी नक्कीच शिष्य करणार. पण त्याआधी तुला काही विशेष सांगायचे आहे. तुझ्या मागे तुझ्याच घराण्यातील ब्रह्महत्या लागली होती आणि सोबतच गेल्या एकवीस पिढ्यांचे राम उपासनेचे बळ सुद्धा होते आणि तू याच दोघांच्या मध्ये अडकून होतास. हा ब्रह्म हत्येचा दोषच तुला माझा अनुग्रह होऊ देण्यामागे फार मोठा अडथळा होता आणि तुझ्या घराण्यातील राम उपासना मला तुला अनुग्रह देण्यात प्रयत्नरत होती. तू या दोघांमध्ये असा सापडलास की तुला स्वहिताची विस्मृती झाली. मात्र ब्रह्म हत्येचा दोष मी माझ्या स्वसामर्थ्याने घालवला तर पूर्वजांच्या राम उपासनेचे फळ ब्रह्मनिष्ठ श्रोत्रिय सद्गुरूंची प्राप्ती हा योग श्रीराम कृपेनेच घडवून आणला. गुरुवारी सकाळी मी तुझ्या घरी तुम्हा दोघांना अनुग्रह देण्यास येईन. आणि मी जे बोललो आहे त्याची सविस्तर माहिती तुझ्या वडिलांना आहेच, तू त्यांना विचारून घे” श्री गुरु माउलीने गुरुवारी घरी येऊन अनुग्रह देण्याचे सांगितले. त्याच वेळी बनारस मधील पंडित राजाराम शास्त्री यांच्या पत्नी ही तेथेच उपस्थित होत्या. त्यांनीही श्री गुरु माऊलीस् त्यांना अनुग्रह देण्याची विनंती केली होती. त्यामुळे श्री गुरु माऊली त्यांना म्हणाली “मी आधी शास्त्रीय बुवांकडे जाणार आणि त्यानंतर तुमच्या घरी येईन” आणि ह्या उपर शास्त्रीबुवांचा पत्नीला सांगितले कि तुम्ही त्या दिवशी उपाशी राहू नका. दूध, साबुदाणा घ्या, तुम्ही जर काही खाल्ले नाहीत तर तुमच्या पोटात जो गर्भ आहे तो उपाशी राहिल आणि त्याचे पाप मला लागेल.” अजून जन्मही न झालेल्या त्या जिवाबद्दल ही किती करुणा!! अशी करुणा एका माऊली जवळच असू शकते आणि म्हणूनच सद्गुरूंना माऊली म्हणतात. किंबहुना ते सार्थच आहे. असो.

शास्त्रीबुवांनी सकाळी माऊलीच्या भेटीच्या दरम्यान घडलेला समग्र वृत्तांत घरी गेल्यावर आपल्या वडिलांना सांगितला आणि यापुढील सविस्तर माहिती तुझे वडीलच तुला सांगतील हेही सांगितले. शास्त्री बुवांचे वडील म्हणाले की माऊलींनी दिलेली माहिती अगदी तंतोतंत बरोबर आहे. शास्त्री बुवांचे आजोबा ग्वालियर दरबारातील एक सल्लागार होते. त्यामुळे घरदार, शेती, ऐश्वर्य कशाचीच कमी नव्हती. वडिलोपार्जित केशवराव राम मंदिर (जिथे पिढीजात राम उपासनेचे बीज पेरले गेले होते) तेही वैजापूरकर घराण्याचे होते आणि त्या देवळाला राजाश्रयही मिळालेला होता. रामनवमीचा उत्सव मोठ्या प्रमाणावर तेथे साजरा होत असे. पण कधीकधी एखाद्या घराण्यालाच दृष्ट लागते तसा प्रकार इथेही घडला. पूर्वजांनी महालक्ष्मी घरी बसविली होती आणि एकदा चुकून घराची भिंत काही कारणाने महालक्ष्मी विग्रहावर पडली आणि घराण्याचे महालक्ष्मीचे विग्रह मोडले / भंगले. रात्री पूर्वजांच्या स्वप्नात येऊन भगवतीने सांगितले की घराण्यातीलच कुठल्याशा दोषामुळे हा प्रकार घडलेला आहे आणि त्यामुळे मी आता परत जाते आहे. भगवतीने सांगितल्याप्रमाणे वैजापूरकर घराण्याला क्रमाक्रमाने अवकळा यायला सुरुवात झाली आणि लवकरच शास्त्रीजींच्या आजी मुळे घराण्याला ब्रह्म हत्येचा डागही लागल्याचे कळून आले. राम उपासना कालांतरा पासून चालू असल्याने परिस्थिती अगदीच हलाखीची झाली नव्हती. पण आजीने लावलेल्या ब्रह्महत्येच्या दोषामुळे मात्र त्यात आमूलाग्र बदल व्हायला लागला. शास्त्री बुवांच्या आजीने स्वतःच आपल्या हाताने आपल्या सात अपत्यांचा बळी घेतला होता. कारण त्यांचे त्यांनाच ठाऊक, पण त्या आपल्या स्तनांवर विष लावून त्यानंतर आपल्या अपत्यांना दूध पाजीत. शास्त्री बुवांचे वडील त्यांचे आठवे अपत्य होते. पण तोवर आपल्या पत्नीची हकीकत शास्त्रीजींच्या आजोबांना कळून चुकली होती. त्यामुळे जन्मल्यापासूनच त्यांनी आपल्या मुलास दूध पाजायला दाई ठेवल्या होत्या व त्या साधारण पाच वर्ष पर्यंत शास्त्री बुवांच्या वडिलांना दूध पाजायला घरी येत असत. लेखकाच्या आजोबांनी म्हणजे शास्त्री बुवांच्या वडिलांनी ही हकिकत प्रत्यक्ष लेखकासही सांगितली आहे. शास्त्रीबुवांचे आजोबा त्यांचे वडील तीन वर्षाचे असतानाच वारले होते. मारुती मंदिरात नमस्कार करताना त्यांना देवाज्ञा झाली होती. आपल्या मामाबरोबर शास्त्रीजींचे वडील लहानपणीच ग्वालियर वरून काशीला आले. पुढे शास्त्रीजींची आई आणि त्यांच्या दोन बायका अल्पवयातच निवर्तल्या आणि पुढे त्या पिशाच्च योनीत गेल्या. त्यामुळे शास्त्रीजींच्या तिसऱ्या पत्नीला दिवस राहिले की लगेच गर्भपात होत असे. त्याला या दोन बायका कारणीभूत असत. एक अपत्य तर दीड वर्षाचे होऊन देवाघरी गेले होते.

ठरलेल्या दिवशी गुरुवारी श्री गुरु माऊलींना सन्मानाने घरी आणण्यात आले. रस्ताभर पावलापावलावर गंगेचे पाणी शिंपडून त्या मार्गाने श्री गुरुमाऊली आली. घरी आल्यावर कोमट पाण्याने परत एकदा श्री गुरुमाऊलींनी आंघोळ केली. त्यांना दिलेली नवीन वस्त्रे नेसली आणि उभयता पती-पत्नींना अनुग्रह दिला. त्या दिवसानंतर हळू हळू वैजापूरकर घराण्याची गेलेली कळा परत ऊर्जितावस्थेला आली. श्री सद्गुरू कृपेने त्यानंतरचे सर्व अपत्य जगले आणि त्यांची पुढील पिढी सुद्धा वृद्धिंगत होत आहे. त्यानंतर श्री गुरुमाऊलींचे 1957 साली आणि 1965 साली परत काशीला येणे झाले. 1957 साली श्री गुरुमाऊलींचे वास्तव्य काशीला तीन-चार महिने होते आणि लेखकाचा जन्मही त्याच कालावधीत ला आहे. लेखकाला श्री गुरुमाऊलींचा हस्तस्पर्श बालपणातच बरेचदा लाभलेला आहे ही परमेश्वराची एक मोठी कृपाच.

जय जय रघुवीर समर्थ!!

राष्ट्रगुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय!!

श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरु भगवान श्री श्रीधर स्वामी महाराज की जय!!!